अभिनेता सलमान आणि शाहरूख खान यांनी मंदिरात चपला घालून चित्रीकरण केल्याप्रकरणी हिंदू महासभेने या दोघांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केली आहे. टेलिव्हिजनवरील ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या डिसेंबर महिन्यात प्रसारित झालेल्या भागात सलमान आणि शाहरूख कालीमातेच्या मंदिरात उभे राहून एकमेकांना हात मिळवताना दिसत आहेत. मेरठमधील काली मंदिरात हा भाग चित्रीत करण्यात आला होता. यावेळी दोघांनी पायांमध्ये बूट घातलेले दिसत आहे.
यामुळे हिंदू धर्मियांची भावना दुखावल्याची तक्रार मेरठमधील हिंदू महासभेचे अध्यक्ष भारत राजपूत यांनी केली आहे. धार्मिक स्थळी कोणालाही पादत्राणे घालून प्रवेश करण्याची संमती नसल्याचे राजपूत यांनी तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान, न्यायालयाने राजपूत यांची याचिका दाखल करून घेतली असून १८ जानेवारीला याप्रकरणाची सुनावणी ठेवण्यात आली आहे. आपण खासगी वाहिनीच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद न मिळाल्यामुळे ही तक्रार दाखल करत असल्याचे रजपूत यांनी स्पष्ट केले आहे.