ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे मुंबईतील खार येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ‘मुंबई मिरर’ या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आले. सोमवारी संध्याकाळी धर्मेंद्र हे मुलगा सनी देओलसोबत घरी परतले. गेल्या आठवड्यात त्यांना डेंग्यूची लागण झाली होती. सध्या घरी त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

धर्मेंद्र हे रुग्णालयातून लवकरच डिस्चार्च मिळवून लोणावळा येथील फार्महाऊसवर जाणार असल्याचीही चर्चा होती. ते तिथल्या घरी आराम करून तब्येत बरी झाल्यावर मुंबईला परतणार असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते सध्या मुंबईतल्यात घरी आराम करणार आहेत.

धर्मेंद्र यांनी १९६० साली ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. ५० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास २०० चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘शोले’, ‘धरमवीर’, ‘प्रतिज्ञा’, ‘यादों की बारात’ हे त्यांचे चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरले. नुकताच त्यांचा नातू अर्थात सनी देओलचा मुलगा करण देओलचा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला. ‘पल पल दिल के पास’ या चित्रपटातून करणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. धर्मेंद्र यांनीच या चित्रपटाची प्रसिद्धी केली होती.