ई टिव्हीवरील ‘झुंज मराठमोळी’ या रिअ‍ॅलिटी शोने तीन आठवडय़ांच्या कालावधीमध्ये प्रेक्षकांची उत्सूकता शिगेला पोहचवली आहे. मराठीच्या छोटय़ा पडद्यावरील पहिलावहिला रोड शो म्हणून या शोला वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. या शोच्या माध्यमातून मराठीतील काही नामवंत कलाकार विविध टास्कना सामोरे जाताना दिसताहेत. नेमून दिलेले प्रत्येक काम पूर्ण करताना त्यांचा लागलेला कस, एकमेकांशी चढाओढ करतानाच त्यांना स्वतशी सुद्धा द्यावी लागणारी झुंज, त्यातून निर्माण होणारे हेवेदावे भांडण यामुळे शोचा प्रत्येक भाग अधिक रंगत आहे. या शोच्या निमित्ताने स्पर्धकांसोबत प्रेक्षकांनाही महाराष्ट्रातील दुर्गम भागांची, तेथील चालीरितींची जवळून ओळख करुन देण्याचा शोच्या निर्मात्यांचा मानस आहे. तसेच या धाडसी प्रवासाची सांगता गणपतीपुळ्यामध्ये एका भव्यदिव्य अंतिम सोहळ्याने करण्यात येणार आहे.
  कार्यक्रमाच्या सुरवातीच्या प्रोमोज वरुन हा हिंदीतील ‘फिअर फॅक्टर’च्या धरतीचा शो असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. पण, कार्यक्रमाच्यासंकल्पनेबद्दल सांगताना ई टीव्हीचे आशय प्रमुख संजय उपाध्येय यांनी दैनंदिन आयुष्यात तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे आजचा शहरी वर्ग आणि गावातला कष्टकरी वर्ग यांच्यात एक दरी निर्माण झाली आहे. गावातल्या सामान्य माणसाला त्याच्या रोजच्या आयुष्यातील साधी कामे करतानाही खूप मेहनत घ्यावी लागते आणि या मेहनतीची जाणीव आम्हाला आजच्या तरुण पिढीला करुन द्यायची होती. त्यामुळे एखाद्या बंद स्टुडिओमध्ये काही बनावट टास्क तयार करण्याऐवजी प्रत्यक्ष गावात जाऊन तेथील स्थानिक लोकांना रोज करावी लागणारी कामे या कलाकारांना टास्क म्हणून देण्याचे ठरवल्याचे त्यांनी सांगितले. याआधी ई टीव्हीने हिंदीतील ‘कौन बनेगा मराठी करोडपती’च्या धर्तीवर ‘कोण होईल मराठी करोडपती’ हा शो यशस्वीरित्या सादर करुन दाखवला होता. त्याचेच पुढचे पाऊल म्हणून ‘झुंज’सारखा शो मराठीत आणण्याच्या धाडसी प्रयोगाबद्दल बोलताना संजय म्हणतात, आजच्या घडीला ई टीव्ही वाहिनीला मिळणारा प्रेक्षकवर्ग हा ज्येष्ठांचा आहे. आम्हाला तरुण वर्गाला पण आमच्याकडे खेचायचे होते. त्यासाठी त्यांना रुचतील अशा शोजची निर्मिती करणे आवश्यक होते. त्यातुनच ‘झुंज’ची संकल्पना समोर आली.
 विदर्भातील रामटेकपासून सुरु झालेला या शोचा प्रवास संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आहे. सुरवातीला या कार्यक्रमाची सुरवात कोठून करायची याबाबत आम्ही काहीच ठरवले नव्हते. संपूर्ण महाराष्ट्र कार्यक्रमाच्या निमित्ताने पालथा घालायचा इतकेच आमचे ठरले होते. पण, आषाढी एकादशी आणि पंढरपूर हा मुहूर्त चुकवायचा नाही आणि शेवट गणपतीपुळ्यालाच करायचा हेही आमचे नक्की होते, अशी माहिती शोचा कार्यकारी निर्माते प्रतिक कोल्हे यांनी दिली. त्यानिमित्ताने शोच्या निर्मात्या टीमने जवळजवळ एक महिना संपूर्ण महाराष्ट्राची भ्रमंती केली. कित्येक ज्ञातअज्ञात चालीरिती, पद्धती यांची माहिती मिळवली आणि त्यानुसार प्रत्येक प्रांताची खासियत लक्षात घेऊन त्यानुसार टास्क तयार करण्यात आले आहेत. कित्येक ठिकाणी आम्हाला काही बाबतीत स्थानिकांची परवानगी घेणेसुद्धा महत्त्वाचे होते. कारण, आम्हाला कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. उदारणार्थ, कोकणात पालखी उचलण्याच्या परंपरेत कधीही महिला सहभागी होत नाहीत, अशावेळी आम्हाला गावकऱ्यांची समजूत काढून त्यांचे मन वळवण्यासाठी महत्प्रयास करावे लागले, असेही प्रतीक यांनी सांगितले.  शोच्या बनावटीनुसार स्पर्धकांची निवड हीसुद्धा महत्त्वाची बाब होती. कारण, या प्रकारच्या शोला न्याय देऊ शकतील अशा स्पर्धकांची निवड करणे हे महत्त्वाचे होते. शक्यतो अशा प्रकारच्या शोजमध्ये स्पर्धकांच्या मानसिक क्षमतेचा कस लागतो. कारण, जेव्हा तुमच्या अंगावर साप टाकत असतात तेव्हा ते बिनविषारी आहेत हे तुम्हाला ठाऊक असतं पण, त्याला तुमच्या अंगावर सहन करणं यासाठी तुमचे मानसिक धैर्य महत्त्वाचे असते. पण, या शोमध्ये त्याच्या शारीरिक क्षमतेचा कसही लागणार होता. कारण, इथे तुम्हाला प्रत्यक्ष कष्टाची कामे करायची होती, असे संजय यांचे म्हणणे होते. असे असले तरी स्पर्धकांना शोमध्ये त्यांच्यासमोर काय वाढून ठेवलंय याची काहीच कल्पना दिली नव्हती. यासंबंधी बोलताना प्रतीकनी सांगितले की आम्ही स्पर्धकांना शोची संकल्पना सांगितली होती. कारण, मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत असल्यामुळे स्पर्धक त्याला कसा प्रतिसाद देतात हे पाहाणे आमच्यासाठी महत्त्वाचे होते. पण, सर्वानीच ही कल्पना उचलून धरली. या शोमध्ये कोणते टास्क असणार आहेत हे माहित नसल्यामुळे कित्येकांनी तर घरी झुरळं पकडण्यासारख्या गोष्टींचाही सराव केला होता, अशी माहिती त्यांनी दिली.