प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या बदनामीच्या दाव्याप्रकरणी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कारवाई रद्द करण्याची अभिनेत्री कंगना राणावतची मागणी सत्र न्यायालयाने सोमवारी फेटाळली.

महानगरदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेली कायदेशीर कारवाई आणि बजावलेले समन्स रद्द करण्याच्या मागणीसाठी कंगनाने सत्र न्यायालयात धाव घेतली होती. महानगरदंडाधिकाऱ्यांनी दिलेल्या कारवाईच्या निर्णयाच्या वैधतेला तसेच जामीनपात्र वॉरंटलाही कंगनाने आव्हान दिले होते. तक्रारीवर कारवाईचे आदेश देण्यापूर्वी महानगरदंडाधिकऱ्यांनी तक्रारदाराचा आणि साक्षीदारांचा जबाब नोंदवण्याची आवश्यकता आहे. मात्र महानगरदंडाधिकाऱ्यांनी असे न करताच फौजदारी कारवाईचे आदेश दिल्याचा आरोप कंगनातर्फे करण्यात आला होता. कंगनाच्या मागणीला अख्तर यांच्यातर्फे विरोध करण्यात आला. तसेच दंडाधिकाऱ्यांचा आदेश योग्यच असल्याचा दावा करण्यात आला.

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना कंगनाने बॉलिवूडमधील घराणेशाही सुशांतच्या मृत्यूला कारणीभूत असल्याचा दावा केला होता. तिने अख्तर यांच्यावरही आरोप केले होते. त्यानंतर कंगनाच्या आरोपांमुळे आपली नाहक बदनामी झाली असून सामाजिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे, असा आरोप अख्तर यांनी केला होता. तसेच कंगनाविरोधात अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांकडे बदनामी झाल्याची तक्रार केली होती.