द्वेष पसरवल्याच्या आरोपाखाली अभिनेत्री कंगना रणौतची बहीण रंगोली चंडेल हिचा ट्विटर अकाऊंट काही वेळासाठी बंद (सस्पेंड) करण्यात आला. रंगोली तिच्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असायची. यावर प्रतिक्रिया देताना, ‘आता पुन्हा ट्विटर अकाऊंट सुरू करणार नाही’ असं रंगोलीने स्पष्ट केलं. त्याचसोबत ट्विटर हे अमेरिकी प्लॅटफॉर्म आहे, ते भारताविरोधी असल्याने मीच त्याचा निषेध करते असं ती म्हणाली.

रंगोली म्हणाली, “ट्विटर हे अमेरिकी प्लॅटफॉर्म आहे. ते भारताविरोधी असून पक्षपातीपणा खूप करतं. तुम्ही हिंदू देवतांचा अपमान करू शकता, पंतप्रधान व गृहमंत्र्यांना दहशतवादी म्हणू शकता पण जर तुम्ही आरोग्य कर्मचारी व पोलिसांवरील दगडफेकीविरोधात आवाज उठवला तर तुमचा अकाऊंट सस्पेंड केला जातो. माझी प्रामाणिक मतं व विचार यापुढे मी ट्विटरवर कधीच मांडणार नाही. त्यामुळे मी माझा अकाऊंट पुन्हा सुरू करणार नाही. मी माझ्या बहिणीची प्रवक्ती होती आणि ती खूप मोठी स्टार आहे. चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी तिला अशा पक्षपात करणाऱ्या माध्यमाची काहीच गरज नाही.”

आणखी वाचा : सर्वांत पहिला यशस्वी सर्जिकल स्ट्राइक; रामायणात रावणाच्या वधानंतर मीम्सना उधाण

रिमा कागती, कुब्रा सैत, सुझान खानची बहीण फराह अली खान यांसारख्या सेलिब्रिटींनी रंगोलीच्या ट्विटर अकाऊंटची तक्रार केली होती. योग्य ती कारवाई करण्याची मागणी त्यांनी मुंबई पोलिसांकडे केली होती.