नव्वदीच्या दशकात ‘चंद्रकांता’ या मालिकेने टेलिव्हिजन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली होती. या मालिकेने बच्चे कंपनीसह कुटुंबातील थोर मोठ्यांनाही चांगलेच प्रभावित केल्याचे दिसून आले होते. लेखिका देवकी नंदन खत्री यांच्या कादंबरीच्या आधारावर ‘चंद्रकांता’ ही मालिका टीव्हीवर प्रसारित करण्यात आली होती. या मालिकेत राजकन्येसाठी दोन राज्यातील संघर्षाची कथा पाहायला मिळाली होती. नव्वदीच्या दशकातील ही कहाणी ‘लाइफ ओके’ पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. निखिल सिन्हा यांनी मालिकेसाठीची तयारी पूर्ण केली असून ४ मार्चपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

kritikach-1

या मालिकेमध्ये कृतिका कामरा  मुख्य भूमिकेत दिसणार आहे. फॅशन डिझायनर निरुशा निखट यांनी चंद्रकांतासाठीचा कृतिका कामराचा लूक सध्या समोर आणला आहे. कृतिकाच्या ‘चंद्रकांता’ मालिकेतील लूकची झलक पिंकविला या संकेतस्थळाने प्रदर्शित केली आहे. या छायाचित्रांमध्ये कृतिका कामराचा लूक लक्षवेधी असल्याचे दिसते. मालिकेमध्ये  राजकन्येची  भूमिका साकारण्यास सज्ज झालेली कृतिका या छायाचित्रांमध्ये  मोती, हिरे यांनी डिझाइन केलेल्या ड्रेसमध्ये दिसते. सोनेरी-चंदेरी ड्रेसमधील कृतिकाची अदा घायाळ करणारी अशीच आहे.

kritikach-3

तब्बल २२ वर्षांनंतर ‘चंद्रकांता’ ही मालिका आता पुन्हा नव्या रुपात सुरु होणार आहे. दूरदर्शनवर ‘चंद्रकांता’ मालिका १९९४ साली सुरु झाली होती. तब्बल तीन वर्ष दाखविण्यात आलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन सुनिल अग्निहोत्रीने केले होते. तर निरजा गुलेरी हिने मालिकेची निर्मिती केली होती. याच मालिकेला आता एका नव्या स्वरुपात दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे दोन मोठ्या वाहिन्या ही मालिका पुन्हा आणत आहेत. कलर्स आणि लाइफ ओके या दोन्ही वाहिन्यांवर ‘चंद्रकांता’ मालिका सुरु होणार आहे.

kritikach-2

काही दिवसांपूर्वीच लाइफ ओके वाहिनीवरील ‘चंद्रकांता’ मालिकेत अभिनेत्री कृतिका कामरा हिची वर्णी लागल्याचे स्पष्ट झाले होते. त्याचवेळी, टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिदेखील तिच्या ‘चंद्रकांता’ मालिकेकरिता मुख्य अभिनेत्रीचा शोध घेत असल्याचे समोर आले होते. एकता कपूरचा देखील ‘चंद्रकांता’ मालिकेसाठीच्या अभिनेत्रीचा  शोध आता संपला आहे. एकता कपूरच्या कलर्स वाहिनीवर सुरु होणा-या ‘चंद्रकांता’ मालिकेकेमध्ये अभिनेत्री निया शर्मा झळकणार आहे. लाइफ ओके वाहिनीवरील मालिकेचे ‘प्रेम या पहेली- चंद्रकाता’ असे शीर्षक ठरविण्यात आले असून, एकताच्या मालिकेचे अद्याप नाव ठरलेले नाही. चंद्रकांता या मालिकेच्या माध्यमातून लाइफ ओके आणि कलर्स या दोन्ही वाहिन्यांमध्ये  युद्धालाच सुरुवात झाली आहे असेच म्हणावे लागेल.

(छाया सौजन्यः पिंकविला)