गेले सात महिने चित्रपटगृहे बंद त्यामुळे चित्रपट पाहाणेही बंद अशी लोकांची अवस्था होती. नाही म्हणायला गेल्या चार महिन्यांत बऱ्याच छोटय़ा-मोठय़ा चित्रपटांनी ओटीटी माध्यमांची वाट पकडल्यामुळे घरच्या घरी नवीन चित्रपट पाहात प्रेक्षकही सुखावला. पण तरीही अजून त्याच्या आवडीचे चित्रपट आहेत कुठे, ते कधी आणि कसे पाहायला मिळणार, असे सगळे प्रश्न चित्रपटप्रेमींसमोर होते. अचानक केंद्र सरकारने देशभरातील चित्रपटगृहांवरची बंदी उठवली. महाराष्ट्रासह काही राज्यांनी अजून चित्रपटगृह सुरू करायचा निर्णय दिला नसला तरी अनेक शहरांतून बहुपडदा आणि एकपडदा चित्रपटगृहांच्या खेळाला सुरुवात होणार, हे कळताक्षणीच इंडस्ट्रीत वेगाने हालचाली सुरू झाल्या. आणि अगदी काही दिवसांपर्यंत चित्रपटांच्या बाबतीत आपली शोधू कुठे.. शोधू कुठे? अशी अवस्था होती. दिवाळीत मात्र चित्रपटगृहांतच नव्हे तर ओटीटीवरही नव्या चित्रपटांचा एकच धूमधडाका पाहायला मिळणार आहे.

नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये चित्रपटगृहे सुरू झाली तर आत्तापर्यंत अडकलेले ‘८३’, ‘सूर्यवंशी’सारखे मोठे चित्रपट पाहायला मिळतील, असा अंदाज लोकांनाही होता. मात्र गेल्या काही दिवसांत करोनामुळे उद्भवलेली परिस्थिती, निर्बंध यामुळे माध्यमांमध्येही अनेक बदल झाले. चित्रपटगृह सुरू होण्याची वाट न पाहाता निर्माते ओटीटीकडे वळले. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहात आणि ओटीटी माध्यमांवरही नव्या चित्रपटांच्या प्रदर्शनाची एकच झुंबड उडाली आहे. जिथे बिग बजेट चित्रपटांचीच वाट पाहिली जात होती, त्या चित्रपटगृहांमध्ये दिवाळीत छोटय़ा-मोठय़ा चित्रपटांच्या प्रदर्शनाची एकच रांग लागली आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यातल्या त्यात बिग बजेट चित्रपटांपैकी फक्त कबीर खान दिग्दर्शित ‘८३’ हा चित्रपट नाताळच्या मुहूर्तावर पाहायला मिळणार आहे. रोहित शेट्टीचा बहुचर्चित ‘सूर्यवंशी’ कदाचित नव्या वर्षांत पहिल्याच महिन्यात चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल, असे बोलले जात आहे. मात्र तरीही नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होऊ पाहाणाऱ्या चित्रपटांची संख्याही कमी नाही हे विशेष. नोव्हेंबरमध्ये चित्रपटगृहात कियारा अडवाणीचा ‘इंदु की जवानी’, मनोज वाजपेयी आणि दिलजीत दोसैनचा ‘सूरज पे मंगल भारी’ या दोन नवीन आणि महत्त्वाच्या चित्रपटांवर वितरकांचा जोर आहे. शिवाय, परिणीती चोप्रा-अर्जुन क पूर जोडीचा ‘संदीप और पिंकी फरार’, यशराजचाच ‘बंटी और बबली २’ हा सिक्वलपटही नोव्हेंबरमध्येच प्रदर्शित होणार असल्याचे सांगितले जाते. शिवाय येत्या पंधरवडय़ात मुंबई-महाराष्ट्रासह देशभरातील सगळीच चित्रपटगृहे सुरू झाली तर ख्रिस्तोफर नोलान दिग्दर्शित ‘टेनेट’ आणि डॅनियल क्रेगचा शेवटचा बॉण्डपट ‘नो टाईम टु डाय’ हे दोन्ही हॉलीवूडपटही याच दोन महिन्यांत प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे.

एकीकडे चित्रपटगृहात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांची संख्या वाढते आहे, तर दुसरीकडे ओटीटीवरही याच काळात मोठे आणि काही छोटय़ा बजेटचे चांगले चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. दिवाळीची सुरुवात तर अक्षयकुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाने डिस्ने हॉटस्टारवरून होणार आहे आणि या वर्षांला निरोप देताना वरुण धवन-सारा अली खानचा ‘कुली नं. १’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर नाताळच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. ‘लक्ष्मी बॉम्ब’ सध्या वादात सापडला असला तरी चित्रपट दिवाळीतच प्रदर्शित करण्यावर निर्माते अजूनही ठाम आहेत. या दोन चित्रपटांच्या दरम्यान बरेच वेगळे चित्रपट ओटीटीवर पाहायला मिळणार आहेत. १३ नोव्हेंबरला राजकुमार रावची मुख्य भूमिका असलेला ‘छलांग’ हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे. त्यापाठोपाठ १९ नोव्हेंबरला नेटफ्लिक्सवर राजकुमार राव, अभिषेक बच्चन अशी मोठी कलाकारांची फौज असलेला अनुराग बासू दिग्दर्शित ‘ल्युडो’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर डिसेंबरमध्ये पहिल्या आठवडय़ात भूमी पेडणेकरचा ‘दुर्गावती’ अ‍ॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार असून डिस्ने हॉटस्टारवरही अजय देवगणचा ‘भुज’ आणि अभिषेक बच्चनचा ‘द बिग बुल’ हे दोन चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, डिस्ने हॉटस्टारच्या बरोबरीने झी ५, सोनी लिव्ह यांवरही काही चांगले चित्रपट पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे सात महिन्यांच्या बंदीनंतर उघडलेल्या चित्रपटांच्या या पेटाऱ्यातून हिंदी म्हणू नका, इंग्रजी म्हणू नका, मराठी, मल्याळम, तेलुगू सगळ्या भाषेतले चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहेत. चित्रपटगृहात पाहायचे आहे तर हे पाहा आणि घरच्या घरी पाहायचे आहे तर ओटीटीवर हे पाहा अशी पर्वणीच प्रेक्षकांसमोर चालून आली आहे. ओटीटी असो वा चित्रपटगृहे सध्या चित्रपट प्रेक्षकांपर्यंत पोहोचवता येणार असल्याने इंडस्ट्रीही अंमळ सुखावली आहे हे नक्की!