चित्रपटाच्या नावाप्रमाणे त्याचा नायक ‘चीटर’ आहे. लोकोंची फसवणूक करण्यात त्याला अजब आनंद मिळतो. लोकांना गंडा लावून पैसे कमावणे ही त्याची सहजप्रवृत्ती आहे आणि तो तसाच वावरतो. अशा नायकाच्या आयुष्यात काय काय घडू शकतं?, हे पाहायलाही प्रेक्षकांना गंमत आलीच असती की.. पण, इथे आशयात खुद्द दिग्दर्शकानेच फसवणूक केली आहे. त्यामुळे हा चित्रपट ना अशा फसवणूक करणाऱ्या तरुणाचा आहे, ना मॉरिशसच्या समुद्रावर श्रीमंत प्रेमिकेबरोबर खुल्लमखुल्ला प्रेम करणाऱ्या नायकाचा आहे. तर हा चित्रपट दिग्दर्शकाच्या म्हणण्यानुसार हॉरर कॉमेडी आहे. पण शेवटपर्यंत प्रेक्षकाला आपण नेमका कुठल्या प्रकारचा चित्रपट पाहतो आहोत, याचा पत्ता लागत नाही.
खरंतर, ‘रात्र आरंभ’सारख्या चित्रपटांचा दिग्दर्शक आणि स्वत: उत्तम कलाकार असलेले अजय फणसेकर आणि वैभव तत्ववादीसारखा चांगला अभिनेता या दोनच गोष्टींनी चित्रपटाविषयीची उत्कंठा वाढवली होती. पण कथेतच घोळ असलेली ही कथा श्रीमंत निर्मितीमूल्य असूनही चांगलीच फसली आहे. पुण्यातलं अग्निहोत्री कुटुंब, त्यांचा मोठा मुलगा सीए आहे. त्यांचा धाकटा मुलगा अभय (वैभव) सगळ्यांकडून खोटं-नाटं सांगून पैसे उकळत असतो. यातला अभय सोडला तर त्याचे वडील, आई, हुश्शार बहीण, सीए असलेला भाऊ आणि त्याची पत्नी या व्यक्तिरेखा आपल्याला चित्रपटाच्या सुरुवातीलाच भेटतात. नंतर चित्रपट आपल्याला पुणं सोडून मॉरिशसमध्ये घेऊन जातो तो कायमचाच. त्यामुळे पुण्यातलं अग्निहोत्रं कुटुंबही आपल्याला लगेच सोडून जातं. तर मॉरिशसमधल्या आपल्या प्रेमिकेच्या मिमोच्या (पूजा सावंत)वडिलांनी इंग्रजाचं जुनं घर विकत घेतलं आहे. या घरात पिशाच्चबाधा असल्याची जाणीव तिच्या आजीला होते आणि तिच्या सांगण्यावरून पुण्यातला अग्निहोत्री ब्राह्मण बनून अभय मॉरिशसमध्ये दाखल होतो. त्यानंतर चित्रपटात जे घडतं ते अनाकलनीय आहे. मिमोचे वडील बॉब (हृषीकेश जोशी), आई (आसावरी जोशी) आणि आजी (सुहास जोशी) असे एकापेक्षा एक सरस कलाकार हाताशी असतानाही कथेच्या माध्यमातून त्याचं जे हसं झालं आहे ते न पेलवणारं आहे. त्यातल्या त्यात हृषीके श जोशी आपल्या अभिनयामुळे आणि सहजविनोदी संवादांमुळे लक्षात राहतात. एकतर मॉरिशसमध्ये आल्यावर ही एक हॉरर कथा आहे, असं आपल्याला नव्याने कळतं.
मॉरिशसमधल्या या घरात जे भूत भेटतं त्यातून हॉरर प्रकार घडण्याऐवजी विनोदीच प्रसंग आपल्या वाटय़ाला येतात. साहजिकच हे हॉरर आहे की कॉमेडी हे काही प्रेक्षकांना शेवटपर्यंत ठरवता येत नाही. हॉलीवुडमध्ये हॉररपटांची खिल्ली उडवणारेही विनोदी चित्रपट स्वतंत्रपणे बनले आहेत आणि ते गाजलेही आहेत. इथे मात्र हॉररला विनोदाची फोडणी देण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न फसला आहे. मॉरिशसचे सुंदर चित्रण ही चित्रपटाची एक जमेची बाजू म्हणता येऊ शकते. कित्येक प्रसंगात वैभवला केसाचा विग घालून काम करताना पाहणंही क्लेशदायी ठरतं. कारण नसताना दोन वेगवेगळ्या रूपात आलटूनपालटून वैभव आपल्यासमोर येतो आहे हे सतत जाणवत राहतं. ही गोष्ट टाळता आली असती. एक वेगळ्या प्रकारचा जॉनर आणायचा तर कथेवर थोडी मेहनत आवश्यक असते मात्र दिग्दर्शक म्हणून अजय फणसेकर यांच्या ‘चीटर’ने सगळ्याच आघाडय़ांवर घोर निराशा केली आहे.

चीटर
दिग्दर्शक – अजय फणसेकर
कलाकार – वैभव तत्ववादी, पूजा सावंत, ह्रषिकेश जोशी, सुहास जोशी, आसावरी जोशी आणि वृषाली चव्हाण

रेश्मा राईकवार