|| मितेश जोशी

मालिका असो किंवा चित्रपट.. पडद्यावर कॅमेऱ्यातून टिपलेला पाऊस नेहमीच सुंदर वाटतो. तो त्या त्या वेळी मालिकेत किंवा चित्रपटातील प्रसंगात रंगतही आणतो, मात्र प्रत्यक्षात पावसाच्या सरी जेव्हा सेटवर कोसळायला लागतात तेव्हा हे चित्र तितकंच देखणं असतं का? कॅमेऱ्यामागे आणि समोर असलेल्या दोन्ही बाजूंना काय गोंधळ उडतो, काय काय करामती घडतात त्याची ही पावसाळी गोष्ट..

ढगाळ वातावरण सरून पुढे सरसावलेले पांढरे शुभ्र ढग न्याहळत दिग्दर्शक आऊटडोअर शूट लावतो. सेट तयार होतो, कलाकार तयार होतात, कॅमेरा ते क्षण टिपण्यासाठी सज्ज होतो आणि नेमका त्या वेळी अचानक पाऊस सुरू होतो. पावसाची दूरदूपर्यंत चिन्ह दिसत नसताना दिग्दर्शकाच्या तयारीत असलेल्या आऊटडोअर शूटिंगवर वरुणराजा पाणी पसरवतो. आणि मग सुरू होते एकच दाणादाण.. पावसाच्या पाण्यापासून स्वत:ला सुरक्षित करण्यासाठी सगळेच कलाकार धावत-पळत आडोसा शोधतात. काही हौशी कलाकारांना पावसात भिजण्याचा मोह आवरत नाही खरा.. पण अंगावरचे कपडे हे शूटिंग पूर्ण होईपर्यंत काही उतरवायचे नाहीत. त्यामुळे जरा भिजलो तरी दमट हवेमुळे ते काही लवकर वाळणार नाहीत, हा व्यवहारी विचार त्यांना मन मारून आडोशातच राहायची सक्ती करतो. काही कलाकार पावसाच्या नावाने बोटं मोजत मन शांत करतात. या सगळ्यात खरे हाल होतात ते पडद्यामागच्या कलाकारांचे. कॅमेरामॅन, तंत्रज्ञ मंडळी, स्पॉटदादा, दिग्दर्शक आणि निर्माते यांची एकच तारांबळ उडते आणि यातूनच सेटवर जन्माला येतात नवनवीन किस्से.

पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पडद्यावरचे कलाकार आडोसा शोधून स्वत:ला सुरक्षित करतात, परंतु पडद्यामागच्या कलाकारांना काहीही करून सर्वप्रथम कॅमेरा आणि इतर साहित्य सुरक्षित करावं लागतं. पावसाळ्यात चित्रीकरण करणं हे सेटवरच्या तंत्रज्ञांसाठी अनेकदा जोखमीचं ठरतं. एखाद्या मालिकेचा प्रसंग रात्रीच्या वेळी मोकळ्या भागात चित्रित केला जात असेल, तर कलाकारांचा चेहरा आणि एकंदरीतच संपूर्ण दृश्य अंधारात चित्रित होऊ  नये म्हणून सेटवर लाइट्स उभारून त्यांच्यावर प्रकाश टाकण्याचं काम त्यांना करावं लागतं. अशा वेळी विजांच्या कडकडाटासह पाऊ स पडला, तर त्यांना विजेचा धक्का बसून अपघात होण्याची शक्यता असते. अशा गोष्टी लक्षात घेऊन पावसाळ्यात चित्रीकरण करताना खबरदारीच्या उपाययोजनाही कराव्या लागतात. त्यासाठी तंत्रज्ञांना पावसाळ्यात हातात रबराचे हातमोजे, पायात गमबूट किंवा रबराच्या स्लिपर, अंगावर रेनकोट, डोक्यात टोपी अशा जय्यत तयारीनिशीच चित्रीकरणात सहभागी होण्याच्या सूचना दिल्या जातात. निर्माते स्वत: यावर लक्ष ठेवतात.

मुंबईत सखल भागांत पाणी साठून नुकसान होणे, ही काही नवीन बाब नाही. मालिकांच्या सेटचं तर दर पावसाळ्यात असं नुकसान होतंच.  त्या नुकसानाशी चार हात करून मालिकेचं चित्रीकरण पूर्ण करण्याची जबाबदारी सेटवर विशेषकरून मालिकेच्या प्रॉडक्शनमध्ये काम करणाऱ्या पर्यवेक्षकाची असते. त्याचबरोबर नुकसान कस झालं? का झालं? याची उत्तरं निर्मात्यांना देत पुन्हा तसं होऊ नये यासाठीही दक्षता घ्यावी लागते. ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरच्या ‘विठूमाऊली’ मालिकेच्या सेटवरही असाच प्रसंग घडला. मुंबईत ९ आणि १० जुलैला बरसत असलेल्या पावसाच्या पाण्याने सेटवरच्या क्रोमा फ्लोअरवर शिरकाव केला. काहीच वेळात या क्रोमा फ्लोअरवर चित्रीकरण सुरू होणार होतं. परंतु त्याचं रूपांतर तळ्यात झालं होतं. मग अशा वेळी उपाय म्हणून सेटवरच्या तंत्रज्ञांनी पटकन एकत्र येऊन अंगणात दुसरा सेट तयार केला. आणि कसंबसं वेळ मारून नेत चित्रीकरण पूर्ण केलं.

झाड कोसळल्यामुळे रस्ता बंद होणं हेही नित्याचंच. ‘कलर्स मराठी’ वाहिनीच्या ‘कुंकू टिकली आणि टॅटू’ या मालिकेच्या चित्रीकरणाच्या दिवशीदेखील असंच झाड कोसळलं. त्याचं झालं असं वटपौर्णिमेचा विशेष भाग चित्रित करण्याची धावपळ सेटवर सुरू होती आणि त्याच वेळी मुख्य रस्त्यावर एक मोठं झाड पडलं. ज्यामुळे कलाकार व इतर मंडळींची वाट अडली गेली. काही वेळाने तो रस्ता मोकळा करण्यात आला आणि कलाकार आल्यावर मग तब्बल दोन तासांनंतर चित्रीकरण सुरू करण्यात आलं.

कुठल्या तरी मंगलप्रसंगी उपस्थित राहण्यासाठी नटूनथटून बाहेर पडल्यावर जर अचानक पाऊ स आला तर सामान्य माणसांची जी दाणादाण उडते तीच दाणादाण ‘झी मराठी’ वाहिनीवरच्या ‘लागीरं झालं जी’च्या सेटवर कलाकारांची उडाली. इथेही मालिकेच्या वटपौर्णिमा विशेष भागाचं चित्रीकरण सुरू होतं. मालिकेत शीतलची पहिलीच वटपौर्णिमा असल्यामुळे तिच्यासह मालिकेतील ज्येष्ठ स्त्री सहकलाकार काठापदराच्या साडय़ा नेसून, जड आभूषणं धारण करून चित्रीकरणासाठी सज्ज झाल्या होत्या. साहाय्यक दिग्दर्शकाने गावातील डेरेदार वडाचं झाड चित्रीकरणासाठी निवडलं. मुलांकडून तासभर झाडाच्या आजूबाजूचा भाग स्वच्छ करून घेतला. कॅमेरा आणि कलाकार चित्रीकरणासाठी सज्ज झाले. तेवढय़ात धो धो पाऊ स सुरू झाला व एकच तारांबळ उडली. सर्व टीम पाऊस थांबण्याची वाट पाहात एका आडोशाला उभे होते, परंतु त्या दिवशी कितीतरी तास पाऊस बरसत  होता. शेवटी मोजकेच प्रसंग कसेबसे चित्रित करून उरलेले प्रसंग दुसऱ्या दिवशी चित्रित करण्याची घोषणा साहाय्यक दिग्दर्शकाने केली आणि चित्रीकरण एक दिवस लांबलं, अशी माहिती मालिकेचे साहाय्यक दिग्दर्शक सुशांत पोळ यांनी दिली.

अचानक बरसणाऱ्या मुसळधार पावसात नानाविध कारणांनी जशी सर्वसामान्य माणसांची दाणादाण उडते अगदी तशीच दाणादाण चित्रीकरणाच्या वेळी पडद्यामागच्या कलाकारांची उडते. परंतु या कठीण परिस्थितीवर मात करत त्यावर उपाय शोधून त्याच्यावर अंमलबजावणी करत, कलाकारांच्या हव्या-नको त्या गरजा पूर्ण करत, सर्व साहित्य सुरक्षित ठेवून चित्रीकरण सहज पार पाडायची जबाबदारी पडद्यामागच्या कलाकारांवरच असते. वेळप्रसंगी त्यांना खूप धावपळदेखील करावी लागते. परंतु सरतेशेवटी ही मेहनत रसिक प्रेक्षकांकडून गोड फळ देऊन जाते यात शंका नाही!!

मी धोका पत्करत नाही!

‘फुलपाखरू’ या मालिकेचा संपूर्ण चमू हा तरुण टोळ्यांनी भरलेला आहे. मालिकेच्या सेटवर प्रवेश केल्यापासून ते घरी सुरक्षित पोहोचेपर्यंत त्यांची जबाबदारी नकळतपणे माझ्यावर असते. आमच्या मालिकेचं चित्रीकरण हे ठाण्यात होतं. बरीच मुलं ही ठाण्याच्या बाहेर राहतात. सकाळपासून सुरू झालेली पावसाची संततधार जर दुपारनंतर थांबली नाही, तर मी स्वत:हून चित्रीकरण थांबवतो आणि मुलांना घरी जायचा सल्ला देतो. याचं कारण असं की कलाकार मंडळी कपडे बदलून चटकन गाडीत बसून पटकन घरी पोहोचतात. मात्र पडद्यामागच्या कलाकारांना सर्व आवरून, सगळ्या गोष्टी जागच्या जागी ठेवून सगळ्यात शेवटी निघावं लागतं. खरी मेहनत व धावपळ त्यांची असते. ते कुठे अडकले किंवा काही विपरीत घडलं तर त्याला आपण जबाबदार ठरू! म्हणून मी पावसाळ्याच्या दिवसांत कोणताच धोका पत्करत नाही आणि त्यांनाही तसं क रू देत नाही.   – मंदार देवस्थळी, दिग्दर्शक, फुलपाखरू

उपाय शोधावे लागतात

इतर मालिकांच्या आऊटडोअर चित्रीकरणाच्या वेळी, अचानक पडलेल्या पावसामुळे चालू असलेला प्रसंग दुसऱ्या ठिकाणी चित्रित केला जाऊ  शकतो. परंतु ऐतिहासिक मालिकांमध्ये असे सोयीनुसार प्रसंग बदलू शकत नाहीत. पाऊ स थांबण्याची वाट पाहात जिथला प्रसंग तिथेच चित्रित करून चित्रीकरणाचा एकेक टप्पा पूर्ण करावा लागतो. मालिकेतील कलाकारांच्या अंगावरचे ऐतिहासिक कपडे जर पावसाच्या पाण्यात भिजले तर दमट वातावरणामुळे ते लवकर वाळत नाही. मग अशा वेळी दुसऱ्या कपडय़ांचा पर्याय समोर ठेवावा लागतो. ‘संभाजी’ मालिकेचं चित्रीकरण गोरेगावच्या चित्रनगरीत केलं जातं. चित्रनगरीत पावसाचं पाणी पटकन साचतं. परंतु पाण्याला जर योग्य ती वाट करून दिली तर मार्ग सुकर होतो. म्हणून आम्ही पावसाचे वेध लागले असतानाच सेटच्या जवळच असलेल्या नाल्याच्या दिशेला चर खणून पाण्याला वाट करून दिली. ‘नेमेची येतो पावसाळा’ त्यामुळे त्यावरचे उपाय केवळ आपल्याला शोधायचे असतात.      अमोल कोल्हे, निर्माता, अभिनेता – ‘संभाजी’