बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे शिल्पा शेट्टी. ती फिटनेससाठी विशेष ओळखली जाते. शिल्पा ही सतत सोशल मीडियावर तिचे वर्कआऊट करतानाचे व्हिडीओ शेअर करताना दिसते. आज २१ जून रोजी जागतिक योग दिवस आहे. त्यानिमित्ताने शिल्पाने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती भ्रामरी प्राणायम करताना दिसत आहे. तसेच हे आसन करोनावर प्रभावी ठरत असल्याचे शिल्पाने सांगितले आहे.

शिल्पाने जागतिक योग दिवस साजरा करताना एक व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती भ्रामरी प्राणायम करणे, ओमचे उच्चाकरण केल्याने काय फायदे होतात तसेच सध्याच्या कठीण काळात प्राणायम करणे किती महत्वाचे हे सांगताना दिसत आहे. तसेच भ्रामरी प्राणायम कसे करावे हे देखील शिल्पाने सांगितले आहे.

आणखी वाचा : सकारात्मक ऊर्जेसाठी योग उत्तम – अमृता खानविलकर

भ्रामरी प्राणायम हे चिंता, काळजी, नैराश्य आणि क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी महत्वाचे आहे. हे प्राणायम नियमित केल्याने स्मरणशक्ती व एकाग्रता वाढण्यास मदत होते.

सध्याचे तणावपूर्ण वातावरण पाहता आपण सर्वांनी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहणे खूपच गरजेचे आहे. यावर एकमेव उपाय म्हणजे योग. योग हा अनेक आजारांवरील रामबाण उपाय असून मनःशुद्धीसाठीही अतिशय उत्तम औषध आहे. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच फायदेशीर ठरणाऱ्या या योगचे महत्त्व आपल्यापैकी अनेकांना माहीत आहे. या महामारीच्या काळात अनेक जण योगाभ्यास करून मानसिकदृष्ट्या स्वस्थ राहण्याचा प्रयत्न करत आहेत. याला आपले सेलिब्रिटीही अपवाद नाहीत.