रेश्मा राईकवार

जगभरातील सिनेप्रेमींचं लक्ष ज्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्याकडे लागलेलं असतं तो सोहळा या वर्षी ९ फेब्रुवारीला त्याच दिमाखात आणि भव्यदिव्य स्वरूपात होणार आहे. मात्र याही वर्षी या सोहळ्याची सूत्रं एकहाती घेत संचालन करणारा कोणीही नसेल, अशी घोषणा या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या एबीसी एन्टरटेन्मेंटचे अध्यक्ष केरी बर्क यांनी लॉस एंजेलिस येथे केली आहे. गेल्या वर्षीचा ऑस्कर सोहळाही सूत्रसंचालकाशिवायच पार पडला होता. याही वर्षी त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा मानस केरी बर्क यांनी बोलून दाखवला आहे. खरंतर, काहीशा हलक्याफुलक्या खुमासदार शैलीतील सूत्रसंचालन आणि तो करणारा कलाकार ही वर्षांनुवर्षे ऑस्कर पुरस्कार सोहळ्याची खास ओळख राहिली आहे. दरवर्षी या सोहळ्याचं सूत्रसंचालन कोण करणार?, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. गेल्या वर्षी कॉमेडियन केविन हार्ट याची सूत्रसंचालक म्हणून निवड करण्यात आली होती. मात्र केविनने समलिंगींबद्दल के लेले वक्तव्य त्याला भोवले आणि त्याने ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतरही ‘अकॅ डमी ऑफ मोशन पिक्चर्स आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्सेस’ने केविनच्या जागी दुसऱ्या कोणाची तरी वर्णी लागावी यासाठी प्रयत्न केले होते. मात्र अंतिमत: हा सोहळा सूत्रसंचालकाविनाच पार पडला. अकॅडमी पुरस्कारांच्या इतिहासातली ही पहिलीच वेळ नसली तरी गेली तीस वर्षे हा सूत्रसंचालकाचा नित्यनेम चुकला नव्हता. गेल्या वर्षी तो परिस्थितीमुळे चुकला.. तर या वर्षी तो ठरवून चुकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या वर्षी सूत्रसंचालक नसतानाही ऑस्कर पुरस्कार सोहळा नीटनेटका आणि त्याच दिमाखात पार पडला होता. त्याला सर्वाधिक प्रेक्षकसंख्या आणि पसंती मिळाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीचा जोरदार प्रतिसाद पाहता या वर्षी अकॅ डमीशी चर्चा करून जाणीवपूर्वक हा निर्णय घेण्यात आला असल्याचे बर्क यांनी स्पष्ट केले आहे. ऑस्कर २०२० सोहळ्यात नेहमीप्रमाणे स्टारी वलय, विनोद आणि संगीताची पेरणी असं सगळं काही तितकंच भव्यदिव्य असेल फक्त सूत्रसंचालकाचं तेवढं बोलू नका.. असंच बर्क साहेबांनी अप्रत्यक्षरीत्या बजावून ठेवलं आहे.

पिटच्या प्रेमिका आणि बरंच काही..

ऑस्कर पुरस्कार सोहळा येण्याआधीच हॉलीवूडमध्ये पुरस्कारांचं वातावरण तयार होतं ते विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यांमुळे.. सध्या चर्चा आहे ती नुकत्याच पार पडलेल्या गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याची. यंदा या पुरस्कारांसाठी दिग्गज हॉलीवूड अभिनेत्यांची नावं चर्चेत होती, त्यामुळेच की काय हा सोहळा अधिक रंगतदार झाला असं म्हणता येईल. या वेळी सर्वोत्तम साहाय्यक अभिनेत्याच्या पुरस्कार स्पर्धेत टॉम हँक्स, अँथनी हॉपकिन्स, अल पसिनो, जो पेसी अशी नावं असताना या सगळ्यांना मागे टाकून अभिनेता ब्रॅड पिटने या पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. क्वेन्टिन टेरेन्टिनो दिग्दर्शित ‘वन्स अपॉन अ टाइम इन हॉलीवूड’ चित्रपटातील स्टण्ट डबलच्या भूमिकेसाठी ब्रॅडला हा पुरस्कार मिळाला. यात ब्रॅडबरोबर लिओनार्दो दी कॅप्रिओही मुख्य भूमिकेत होता. अर्थात, ब्रॅड पिटला हा पुरस्कार मिळणं ही आनंदाची गोष्ट होतीच मात्र या सोहळ्याला रंग चढला तो त्याने यानिमित्ताने केलेल्या भाषणामुळे.. जगातील सेक्सिएस्ट अभिनेता म्हणून कायम चर्चेत असलेल्या ब्रॅड पिटची प्रेमप्रकरणं आणि त्याच्या दोन्ही बायकांविषयी बोलताना जग थकत नाही. अर्थात, आधी जेनिफर अ‍ॅनिस्टन आणि नंतर अँजेलिना जोली या दोघींबरोबरचा संसार संपुष्टात आल्यानंतर सध्या तरी तो एकटाच वावरतो आहे. मात्र त्याच्याभोवती असलेल्या प्रेमप्रकरणांच्या चर्चा काही त्याची पाठ सोडत नाहीत. ज्याचा अगदी विनोदी शैलीत का होईना त्याने या सोहळ्यात समाचार घेतला. आपला पुरस्कार स्वीकारल्यानंतरच्या भाषणात त्याने या सोहळ्याला आईला आणायची फार इच्छा होती, असं सांगितलं. मात्र मी मुद्दाम तिला इथे आणलं नाही कारण सध्या मी कोणत्याही स्त्रीच्या बाजूला उभा राहिलो तरी तिच्याबरोबर माझं नाव जोडलं जातं. आई बरोबर असताना असं काही घडलं असतं तर माझ्यासाठी फार अवघड परिस्थिती झाली असती, म्हणून मी ते टाळलं, असं त्याने गमतीत सांगितलं. ब्रॅडची ही भाषणबाजी सुरू असताना कॅमेऱ्यासह उपस्थितांच्या नजरा त्याची पहिली पत्नी जेनिफरकडे वळल्या होत्या. जेनिफरही या सोहळ्याला उपस्थित होती. ब्रॅडच्या या विनोदाला जेनिफरसह सगळ्यांनीच हसतखेळत दाद दिली. जेनिफरशी घटस्फोट झाल्यानंतरही ते दोघे इंडस्ट्रीत चांगले मित्र म्हणून वावरत आले आहेत. सध्या दोघेही एके कटेच असल्याने त्या दोघांनी पुन्हा एकत्र येऊन नवं आयुष्य सुरू करावं अशी त्यांच्या चाहत्यांची खूप इच्छा आहे. मात्र आजवर दोघांनीही या कल्पेनला दाद दिलेली नाही. गोल्डन ग्लोब पुरस्कारांच्या निमित्ताने रंगलेल्या या छोटय़ाशा क्षणाने पुन्हा एकदा त्यांच्या चाहत्यांची आशा मात्र वाढवून ठेवली आहे..