‘पद्मावती’ या चित्रपटाला होणारा विरोध पाहता आता अनेकांनीच या चित्रपटाच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोणने ठणकावून सांगितल्यानंतरही राजपूत संघटनांकडून या चित्रपटाला होणारा विरोध काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याचे पाहायला मिळतेय. या क्षेत्रातील व्यापार विश्लेषकांपासून ते चित्रपट समीक्षकांपर्यंत साऱ्यांमध्येच ‘पद्मावती’ विषयीच्या चर्चा सुरु आहेत. यामध्येच आता एका गोष्टीने अनेकांचेच लक्ष वेधले आहे. ‘पद्मावती’ प्रदर्शित होण्याच्या तारखेतही बदल करण्यात आला आहे. पण, या साऱ्यामध्ये चित्रपटाच्या तांत्रिक बाबींकडेही लक्ष दिले जात आहे.

‘पद्मावती’ थ्री-डी स्वरुपातही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अफलातून वीएफएक्सने ‘चार चाँद’ लावण्याची जबाबदारी ‘प्राइम फोकस’ या कंपनीने घेतली असल्याचे वृत्त ‘स्पॉटबॉय ई’ने प्रसिद्ध केले आहे. पण, ‘पद्मावती’त देण्यात येणाऱ्या स्पेशल इफेक्ट्ससाठी ही कंपनी आणि चित्रपटाच्या निर्मात्यांमध्ये एक करार झाला असून, ‘प्राइम फोकस’ या कामासाठीचे ठराविक मानधन घेणार नसल्याचे म्हटले जात आहे.

पाहा : Throwback Thursday : कपूर कुटुंबियांचे अविस्मरणीय क्षण…

भव्य पातळीवर साकारण्यात आलेल्या या स्वप्नवत चित्रपटासाठीचे कोणतेच मानधन न घेतले जाण्याविषयी अनेकांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पण, मानधनासाठी प्राइम फोकसतर्फे वेगळ्याच अटी ठेवण्यात आल्या आहेत. यासंदर्भात प्राइम फोकसचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमित मल्होत्रा आणि भन्साळी यांच्यामध्ये चर्चा सुरु असल्याचे म्हटले जाते. त्यांच्यात झालेल्या चर्चेनुसार प्राइम फोकसने निश्चित मानधन न आकारता चित्रपटाच्या प्रत्येक तिकीटामागे १५० रुपये आकारण्याचे ठरवले आहे. चित्रपटाबाबत सुरु असणारी ही गणितं पाहून सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनात एकच प्रश्न वारंवार घर करत आहे. जर १५० रुपये फक्त वीएफएक्सचे शेअर असतील तर प्राइम फोकसच्या वाट्याला ७ ते १० कोटींचा नफा जाण्याची चिन्हं आहेत. त्यामुळे चित्रपटाच्या एका तिकीटाचे दर किती असणार हाच प्रश्न उपस्थित केला जातोय. भन्साळींचा हा बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या खिशाला कात्री तर लावणार नाही ना? हासुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तेव्हा आता वीएफएक्सची ही गणितं नेमकी यशस्वीपणे सोडवता येणार, की त्यातील गुंतागूंत आणखीनच वाढणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.