‘पद्मावत’ सिनेमा २४ जानेवारीला प्रदर्शित होत आहे. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश आणि हरियाणा या चार राज्यांमध्ये या सिनेमावर बंदी घालण्यात आली आहे. राजस्थानमध्ये संजय लीला भन्साळी यांच्या सिनेमावर बंदी असूनही अजूनही तिकडे या सिनेमाला विरोध केला जात आहे. राजस्थान येथील चित्तौडगढमध्ये राजपूत समुदायाच्या लोकांनी ‘पद्मावत’ सिनेमाला जोरदार विरोध केला. अजूनही या भागात राजपूत समुदाय सिनेमाला विरोध करताना दिसत आहेत. या विरोधाचाच एक भाग म्हणून या समुदायाच्या लोकांनी उदयपुर- अहमदाबाद हायवे येथील रिठोला क्रॉसिंग येथे प्रदर्शन करायला सुरूवात केली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजपूत संघटनांच्या लोकांनी सुमारे दीड तास हा रस्ता बंद ठेवला होता. यादरम्यान कुठेही मारामारी किंवा कोणतीही गंभीर घटना घडली नाही.

दरम्यान, ‘पद्मावत’ सिनेमाला ज्या राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली आहे, त्याविरोधात याचिका दाखल करत निर्मात्यांनी दाद मागितली आहे. गुरुवारी या याचिकेवर सुनावणी करण्यात येणार आहे. सेन्सॉरकडून प्रमाणित करण्यात आल्यानंतरही या सिनेमावर बंदी का घालण्यात येतेय, असा प्रश्न याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे.

‘पद्मावत’च्या निर्मात्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर आता सुप्रीम कोर्टातून काय निर्णय दिला जाणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिलेय. राजपूत करणी सेनेचा या सिनेमाला होणारा विरोध पाहता चित्रपटगृह मालकांमध्येही संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळतेय. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यास ‘जनता कर्फ्यू’ लावू असा इशाराही करणी सेनेने दिला आहे. त्यामुळे एकंदरच ‘पद्मावत’साठी अनुकूल वातावरण नसले तरीही प्रेक्षकांमध्ये सिनेमाविषयीची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी प्रचंड कुतूहल आहे हेच खरे.