आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून वगळल्यानंतर दिग्दर्शक रवि जाधव यांच्या ‘न्यूड’ चित्रपटाला न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ओपनिंग चित्रपटाचा सन्मान मिळाला आहे. ही माहिती रवि जाधव यांनी फेसबुकच्या माध्यमातून दिली. या महोत्सवात ओपनिंग चित्रपटाचा मान मिळवणारा न्यूड हा पहिला मराठी चित्रपट ठरल्याचंही त्यांनी म्हटलं.

‘इंडो अमेरिकन आर्ट काऊन्सिल’चा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल ७ मे ते १२ मे या कालावधीत पार पडणार आहे. गेल्या वर्षी गोव्यात पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून हा चित्रपट ऐनवेळी वगळण्यात आला होता. महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या अंतिम यादीतून ‘न्यूड’ वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला होता. विशेष म्हणजे परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर बरेच मराठी कलाकार आणि चित्रपट निर्माते रवि जाधव यांच्या समर्थनार्थ पुढे आले होते. आता न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलसाठी ‘न्यूड’ची निवड करण्यात आल्याने अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

वाचा : ‘..तर मी माझं ट्विटर अकाऊंटच डिलीट करेन’

‘न्यूड’ या चित्रपटातून चौकटीबाहेरचा विषय हाताळण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा रवी जाधवची असून, पटकथा आणि संवाद सचिन कुंडलकरने लिहिले आहेत. न्यूड मॉडेल असलेल्या एका महिलेचा जगण्यासाठीचा संघर्ष यात रेखाटण्यात आला आहे.