हिंदी चित्रपटांमध्ये गुन्हे-थरारपट अनेकदा परदेशी चित्रपटांमधील कथानक आणि मांडणीवर बेतले जातात हे एव्हाना प्रेक्षकांना चांगलेच ठाऊक झाले आहे. गुन्हेगारी आणि थरार या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या रंजक प्रकारातील कितीही चित्रपट पाहायला मिळाले आणि त्यांच्या मांडणीमध्ये थोडेफार साधम्र्य आढळले तरी नवीन कलावंत, नवीन कथानक आणि नवीन ‘ट्विस्ट’ असे काही ना काही नावीन्य त्यात पेरता येते. म्हणून आजच्या काळात प्रेमकथापटांपेक्षाही सर्वाधिक लोकप्रिय ठरणारा थरारपट हा प्रकार मानला जातो. ‘जज्बा’ या चित्रपटातही कथानक, मांडणी आणि त्यातला थरार आहे आणि तो निश्चित करमणूकही करतो. थरारपट म्हटल्यावर असलेल्या अनेक अनाकलनीय गोष्टींची संगती लावता आली नाही तरीसुद्धा करमणूक होते. मात्र तरीसुद्धा हा निव्वळ आणखी एक गुन्हे थरारपट या पलीकडे जाऊ शकत नाही. वास्तविक ऐश्वर्या राय आणि इरफान खान, शबाना आझमी यांसारखे चांगले कलावंत असूनही मध्यांतरापर्यंत फारसे काही नावीन्य पाहायला मिळत नाही.

अनुराधा वर्मा ही वकील आहे. तिला सनाया ही छोटी मुलगी आहे. नामांकित वकील आणि मुख्य म्हणजे गुन्हेगारांचे वकीलपत्र घेऊन खटला जिंकणारी वकील अशी अनुराधा वर्माची ख्याती आहे. तिचा बालपणापासूनचा मित्र योहान हा एक भ्रष्ट पोलीस अधिकारी आहे. चित्रपटाची सुरुवात अनुराधा वर्मा एका अब्बास नामक गुंडाला एका खटल्यातून निदरेष मुक्त करते असे  दाखविले आहे. ऐश्वर्या राय-बच्चनने प्रथमच रूपेरी पडद्यावर पुनरागमन करताना ‘ग्लॅमरस’ आणि तद्दन प्रेयसीची व्यक्तिरेखा न साकारता प्रतिमेला छेद देत निष्णात वकिलीणबाईंची भूमिका साकारली आहे. नामांकित वकील अशी ख्याती असलेल्या अनुराधा वर्माच्या मुलीचे सनायाचे अपहरण होते आणि अपहरणकर्ते एका नियाज नामक फाशीची शिक्षा झालेल्या गुन्हेगाराला सोडविण्यासाठी त्याच्यावतीने खटला चालवून तो जिंकून दिल्यानंतर सनायाची मुक्तता करण्याची अट घालतात. नंतरचा सगळा चित्रपट हा नियाज नामक नराधम गुन्हेगाराला सोडविण्यासाठी चालविला जाणारा खटला, त्यासाठी अनुराधा वर्माला कराव्या लागणाऱ्या खटपटी यावर बेतला आहे. नियाजच्या या खटल्याशी संबंधित अनेकांचा सुगावा लावून त्या सगळ्याचा उपयोग खटला जिंकण्यासाठी आणि खरे तर स्वत:च्या मुलीची अपहृत गुंडांकडून सुटका व्हावी यासाठी अनुराधा वर्मा करते.  इरफान खानने रंगविलेला योहान आणि अनुराधा वर्माच्या भूमिकेतील ऐश्वर्या यांचे अप्रतिम काम आणि त्याचबरोबर नियाज या अट्टल गुन्हेगाराच्या भूमिकेतील अभिनेत्याचा अभिनय या गोष्टी चित्रपटाची जमेची बाजू ठरतात.

अनेक ठिकाणी दिग्दर्शकाने चित्रपट बटबटीत केला आहे. तद्दन गुन्हे थरारपट करण्याकडे दिग्दर्शकाचा कल असल्यामुळे की काय चित्रपट प्रेक्षकाला खूप अंदाज बांधायला वाव देतो हे मात्र खरे. शबाना आझमी यांनी साकारलेली भूमिका सुरुवातीला एकदम तकलादू वाटते आणि नंतर तीच भूमिका महत्त्वाची आहे हे शेवटी लक्षात येते अशी क्लृप्ती दिग्दर्शकाने लढवली असून चित्रपट रंजक  केला असला तरी आणखी एक गुन्हे थरारपट पाहायला मिळण्याकडे चित्रपट जाऊ शकत नाही.

जज्बा

निर्माते – संजय गुप्ता, ऐश्वर्या राय, अनुराधा गुप्ता, नीतीन केणी, आकाश चावला, सचिन आर. जोशी, रैना जोशी

दिग्दर्शक – संजय गुप्ता

लेखक – संजय गुप्ता, रॉबिन भट्ट

संगीत – सचिन-जिगर, अभिषेक रम्या (एआर), आकरे

कलावंत – ऐश्वर्या राय-बच्चन, इरफान खान, शबाना आझमी, चंदन रॉय संन्याल, जॅकी श्रॉफ, अतुल कुलकर्णी, सिद्धार्थ कपूर, पिया बॅनर्जी, बालकलाकार सारा अर्जुन व अन्य.