राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा प्रक्षेपणाबाबत अनिश्चितता

मुंबई : मराठी मनोरंजन वाहिन्यांमध्ये ‘सोनी मराठी’च्या रूपाने आणखी एका नव्या वाहिनीची भर पडणार असून सोमवारी पार पडलेल्या ५५व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे प्रसारण ‘सोनी मराठी’ या वाहिनीवरून केले जाणार आहे. मात्र ही वाहिनी अद्याप सुरू  झाली नसल्याने प्रसारणाबाबत अनिश्चितता आहे. सोहळ्याच्या प्रसारणाचे हक्क ‘सोनी मराठी’ला दिलेले आहेत.

मराठीत सध्या झी मराठी, कलर्स मराठी, स्टार प्रवाह या मनोरंजनाच्या वाहिन्या असून त्यात ‘सोनी मराठी’च्या निमित्ताने आणखी एका वाहिनीची भर पडणार आहे. अजय भाळवणकर हे ‘सोनी मराठी’ वाहिनीचे मुख्य सर्जनशील संचालक (चीफ क्रिएटिव्ह डायरेक्टर) आहेत. या आधी ते झी एन्टरटेंटमेंट एन्टरप्रायजेस लिमिटेडचे उपाध्यक्ष (कार्यक्रम) होते.

सोमवारी वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब येथे पार पडलेल्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘सोनी मराठी’च्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. त्याआधी ज्येष्ठ अभिनेते आणि सोनी (हिंदी) वाहिनीवरील ‘सीआयडी’ या लोकप्रिय मालिकेतील ‘एसीपी प्रद्युम्न’ शिवाजी साटम यांनी सोनी वाहिनीबरोबर गेली २० वर्षांहून आपले जिव्हाळ्याचे नाते असल्याचे सांगून आता ‘सोनी’ आता लवकरच मराठी वाहिनी सुरू करत असल्याची घोषणा केली मात्र ती कधी सुरू होणार याची तारीख बोधचिन्ह प्रकाशनाच्या वेळीही जाहीर करण्यात आली नाही.

राज्य चित्रपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे माध्यम प्रायोजक ‘सोनी मराठी’ होते. सोमवारी पार पडलेला सोहळा तसेच पुढील दोन वर्षांच्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्याचे माध्यम प्रायोजक ‘सोनी मराठी’च असणार आहेत. त्यामुळे आता सलग तीन वर्षे हा सोहळा ‘सोनी मराठी’ वाहिनीवरूनच दाखविला जाणार आहे. मात्र असे असले तरी ‘सोनी मराठी’ वाहिनी नेमकी कधी सुरू होणार, त्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही.

अद्याप तारीख जाहीर नाही..

महाराष्ट्र दिनाचा (१ मे) मुहूर्त हुकला असल्याने आता कदाचित येत्या १५ ऑगस्टपासून ‘सोनी मराठी’च्या प्रसारणाला सुरुवात होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. राज्य मराठी चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा ‘सोनी मराठी’वरूनच दाखविण्यात येणार असल्याने आणि ही नवी वाहिनी कधी सुरू होणार त्याची तारीखही अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.