सुप्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे पार्थिव दुबईतून भारतात आणण्यास उशीर होऊ शकतो अशी शक्यता आहे. कारण त्यांच्या पार्थिवावर रासायनिक लेप लावण्यात आलेला नाही. हा लेप उद्या लावण्यात येणार आहे. फॉरेन्सिक अहवालानुसार, मद्यप्राशनामुळे श्रीदेवी यांचा तोल गेल्याने त्या बाथटबमध्ये पडल्या आणि बाथटबमधील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला, असे तपासणीतून समोर आले आहे.श्रीदेवी यांच्या रक्तात मद्याचा अंश आढळला आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने खलिज टाइम्सचा हवाला देत श्रीदेवी यांच्या पार्थिवाला रासायनिक लेप लावण्यात आला नसल्याचे म्हटले आहे.

तसेच दुबई पोलिसांनी आता हे प्रकरण सरकारी वकिलांकडे वर्ग केल्याचीही माहिती समोर येते आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव त्यांच्या कुटुंबीयांना मिळण्यासाठी सरकारी वकिलांची संमती आवश्यक असणार आहे. ही संमती मंगळवारी मिळाल्यानंतर पार्थिव भारतात आणले जाईल अशी शक्यता आहे. श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यास दुबई पोलिसांनी संमती दिली आहे. दुबईतील नियमांनुसार अशा एखाद्या प्रकरणात सरकारी वकिलांची संमती आवश्यक असते. तसेच शवविच्छेदन अहवाल आणि फॉरेन्सिक अहवालही त्यांच्याचकडे सोपवला जातो. त्याचमुळे सरकारी वकिलांची संमती मिळाल्याशिवाय श्रीदेवी यांचे पार्थिव मुंबईकडे रवाना होऊ शकणार नाही. त्याचमुळे पार्थिव भारतात आणण्यास उशीर होऊ शकतो अशी शक्यता आहे.

दरम्यान लोकसत्ता ऑनलाइनला मिळालेल्या माहितीनुसार, श्रीदेवी यांचे पार्थिव पहाटे १.३० वाजता दुबई विमानतळावरून निघून मंगळवारी सकाळी मुंबईत पोहचण्याची शक्यता आहे.