स्वप्ना वाघमारे दिग्दर्शित आणि अभिनेते सुबोध भावे, स्वप्निल जोशी, प्रार्थना बेहेरे यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘फुगे’ चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपट प्रदर्शित होण्याच्या आदल्या दिवशी ‘लोकसत्ता’ कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकसत्ता लाइव्ह चॅट’ कार्यक्रमात सुबोध आणि स्वप्निल हे दोघे सहभागी झाले होते. मुंबईसह राज्यभरातून ‘लोकसत्ता’च्या वाचकांनी या दोघांशी संवाद साधला. लोकसत्ता ऑनलाइनने आयोजित केलेल्या या गप्पांचा वृत्तान्त..

जबाबदारी पेलण्याचे भान येईल तेव्हा दिग्दर्शक होईन

सध्याचे जीवन धकाधकीचे आणि ताणतणावाचे झाले असून त्यातून जर दोन घटका  निखळ मनोरंजन झाले तर ते प्रत्येकालाच हवे आहे. ‘फुगे’ हा चित्रपट कुटुंबासह सर्वानी एकत्र पाहण्याचा आणि निखळ मनोरंजन करणारा आहे. ‘फुगे’ हा माझ्यासाठी गमतीशीर आणि आनंददायी अनुभव होता. चित्रपटातील मी आणि सुबोध आमच्या दोघांमधील प्रत्येक प्रसंग खूप छान झाला आहे. माझ्यावर ‘चॉकलेट’ हिरो असा शिक्का बसला असला तरी मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारायला नक्कीच आवडेल. ‘खलनायक’करायचीही इच्छा आहे. ‘फुगे’ चित्रपटातील एका प्रसंगात मी ‘स्त्री’ वेषात असून तो चित्रपटाच्या कथेचा आवश्यक आणि महत्त्वाचा भाग आहे. कथेच्या एका टप्प्यावर प्रेक्षकांना हा प्रसंग पाहायला मिळेल. हिंदी चित्रपटात मी कधी दिसेन ते मलाच माहिती नाही, पण प्रत्येक मराठी चित्रपटात मी दिसेनच दिसेन. रंगभूमीवर मी अलीकडेच ‘गेट वेल सून’ हे नाटक करत होतो. नाटकाचे १५० प्रयोग केले. सध्या कोणतेही नाटक करत नसलो तरी चांगली संहिता आणि भूूमिका मिळाली तर पुन्हा एकदा नाटक करायचा नक्कीच आवडेल.‘मस्तीखोर’ कलाकारांची मांदियाळीच या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. ‘दिग्दर्शक’ होणे म्हणजे ‘आई’ होण्यासारखे असून सगळ्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे पार पाडाव्या लागतात. त्यामुळे ती जबाबदारी पेलण्याचे भान जेव्हा येईल व ती चांगल्या प्रकारे पार पाडेन, असा विश्वास जेव्हा मला वाटेल तेव्हाच मी दिग्दर्शक म्हणून ते काम स्वीकारेन. – स्वप्निल जोशी

कलाकाराने वेगवेगळ्या भूमिका कराव्यात

‘फुगे’ हा चित्रपट दोन मित्रांची गोष्ट आहे. त्या दोघांच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यामुळे त्या दोघांत आणि त्यांच्या घरात मोठी उलथापालथ घडते. हृषीकेश आणि आदित्य या दोन मित्रांची ही कथा असून आदित्यची बायको आल्यानंतर काय काय घडते ते पाहायला मिळेल. मी आणि स्वप्निल पहिल्यांदाच या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम केले आहे. आमच्या दोघांची ‘केमिस्ट्री’ उत्तम जुळली असून चित्रपट पाहताना तुम्हाला त्याची प्रचीती येईल. चित्रपटात माझ्या मुलानेच माझ्या लहानपणाची भूमिका केली आहे. प्रत्येक कलाकाराने वेगवेगळ्या भूमिका केल्या पाहिजेत. त्यातून तो कलाकार घडतो आणि शिकायलाही मिळते. तसेच भारतीय भाषेतील प्रादेशिक चित्रपटांतूनही प्रत्येक कलाकाराने काम केले पाहिजे.  मी नेहमीच वेगळ्या आणि नवीन भूमिकांच्या शोधात असतो. यातून मला वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला मिळाल्या आणि मी त्या साकारल्या. ‘फुगे’मध्येही माझी वेगळी भूमिका आहे. रंगभूमीवरही मला काम करायला नक्कीच आवडेल. चांगल्या नाटकाच्या मी प्रतीक्षेत आहे. ‘फुगे’ चित्रपटाची कथा मी आणि स्वप्निल दोघांनी लिहिली असून कोणतेही गणित डोक्यात ठेवून ती कथा लिहिलेली नाही.  सामाजिक जबाबदारीचे ओझे घेऊन मराठी चित्रपट त्यात हरवतोय की काय, अशी परिस्थिती असताना ‘फुगे’च्या निमित्ताने एक वेगळ्या शैलीचा, धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच पाहायला मिळेल. हिंदीतील प्रसिद्ध फॅशन डिझायनर विक्रम फडणीस यांचा ‘हृदयांतर’ हा चित्रपट मी करतोय. झाशीची राणी, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर या व्यक्तिमत्त्वांवरील चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून काम करायला नक्कीच आवडेल. सुबोध भावे

*  ‘मनमंदिरा’ आणि ‘ओ आओ ना फिर’

गप्पांच्या ओघात दोघांच्याही चाहत्यांनी सुबोध आणि स्वप्निल यांना चित्रपटासाठी ‘सुबोध जोशी’ आणि ‘स्वप्निल भावे’ अशी नावे का बदलली याविषयी विचारले. त्यावर ते प्रत्यक्ष चित्रपटातच पाहा, असे सांगून त्यांनी नाव बदलाची उत्सुकता कायम ठेवली. चाहत्यांच्या विनंतीवरून स्वप्निल ने ‘मितवा’ चित्रपटातील  ‘ओ आओ ना फिर’ ही ओळ खास त्याच्या शैलीत म्हणून दाखविली तर सुबोधने ‘कटय़ार’मधील ‘मनमंदिरा’ या गाण्याची झलक सादर केली.

* मतदान करण्याचे आवाहन

आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर या दोघांनीही मतदानाचे कर्तव्य प्रत्येकाने पार पाडावे, असे आवाहन केले. मतदान करणे हे प्रत्येक सुजाण नागरिकाचे कर्तव्य आहे , असे स्वप्निल म्हणाला तर केवळ समाजमाध्यमांवरून ‘मत’ व्यक्त न करता प्रत्यक्ष ‘मतदान’ करावे, असे आवाहन सुबोधने केले.

(संकलन-शेखर जोशी)