मिस युनिव्हर्स हा किताब पटकावणारी अभिनेत्री सुष्मिता सेन गेल्या काही वर्षांपासून चित्रपटांपासून चार हात लांब राहत असल्याचं दिसून येत आहे. मधल्या काळामध्ये तिने २०१० मध्ये एक बॉलिवूड चित्रपट आणि २०१४ मध्ये निरबाक हा बंगाली चित्रपट केला. त्यानंतर ती चित्रपटसृष्टीत दिसेनाशी झाली. गेल्या पाच वर्षांपासून सुष्मिता कलाविश्वात दिसलेली नाही.मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे सुष्मिताला हा निर्णय घ्यावा लागल्याचं तिने सांगितलं.

२०१४ साली सुष्मिता ‘निरबाक’ या बंगाली चित्रपटाचं चित्रीकरण करत होती. या चित्रपटाचं चित्रीकरण झाल्यानंतर अचानक सुष्मिताला अस्वस्थ वाटू लागलं. नक्की तिला काय होतंय हे तिला आणि घरातल्या अन्य सदस्यांना अजिबात समजत नव्हतं. प्रकृती अस्वस्थ असतानाच एक दिवस ती अचानक बेशुद्ध पडली. यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तेथे गेल्यावर तिच्या काही तपासण्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे या तपासणीअंती तिच्या अॅड्रेनल ग्लॅण्ड्स (Adrenal Glands) या ग्रंथींमधील कोर्टिसोल (Cortisol) नावाचे हार्मोन्स तयार होणं बंद झालं होतं. त्यामुळे हळूहळू तिच्या शरीरातील अवयव निकामी होऊ लागले होते. इतकंच नाही तर यातून वाचण्यासाठी तिला स्टेरॉइड घ्यावं लागत होतं. दर आठ तासांनी तिला जीवंत राहण्यासाठी hydrocortisone हे स्टेरॉइड घ्यावं लागत होतं.

सुष्मिता सांगते, “या आजारपणानंतरची पुढील दोन वर्ष माझ्यासाठी फार कठीण होती. या स्टेरॉइडमुळे माझे केस गळू लागले होते. त्यासोबतच माझं वजनदेखील दिवसेंदिवस वाढत होतं. त्यात लोक सतत माझ्याकडे पाहायचे त्यामुळे मी माजी विश्वसुंदरी आहे आणि मला सुंदर दिसायचं आहे हा विचार सतत माझ्या डोक्यात घोळत असे”.

दरम्यान, या पाच वर्षांनंतर सुष्मिता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या संपर्कात होती. विशेष म्हणजे गेल्या काही काळापासून सुष्मिता पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे चाहत्यांना कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.