शेरोशायरी करण्याची कला आपल्याला अवगत नसेलही पण, शायरी ऐकायला आणि त्याचा अर्थ समजून घ्यायला आवडत नाही, अशी माणसे तुरळकच असतील. गालिबचे शेर असतील नाही तर कबिराचे दोहे आपण अनेकदा ऐकत आलो आहोत मात्र, त्यांचा अर्थ आपल्याला कळतोच असे नाही. ‘टाटा स्काय’ने याबाबतीत पुढाकार घेत चक्क गीतकार जावेद अख्तर यांच्यावर आपल्या प्रेक्षकांसाठी शेरोशायरीचा अर्थ उलगडून दाखवण्याची जबाबदारी सोपवली आहे.
टाटा स्कायने ‘अ‍ॅक्टिव्ह जावेद अख्तर’ ही नवी सेवा सुरू केली आहे. ज्यात जावेद अख्तर अभिजात शायरी आणि कविता लोकांना ऐकवून त्यांचा अर्थही सांगणार आहेत. याच कविता आणि शायरीला गाण्यातून पोहोचवण्याचाही प्रयत्न करण्यात आला असून तोचि रैना, रुपकुमार राठोड, श्वेता पंडित, आकृती कक्कर आणि अभिजीत पोहनकर असे आघाडीचे तरुण गायक-गायिका या शायरीला सुरेल गाण्यात पेश करणार आहेत. जावेद अख्तर यांनी ऐकवलेल्या शायरीतील अथवा दोह्यांमधील कठीण शब्द जाणून घेण्याची सुविधाही यात प्रेक्षकांना देण्यात आली आहे.
जावेद अख्तर पहिल्यांदाच छोटय़ा पडद्यावर डीटीएच सेवेच्या माध्यमातून प्रेक्षकांना शेरोशायरी ऐकवताना दिसणार आहेत. या अनोख्या उपक्रमाबद्दल आपल्याला फार उत्सुकता असल्याचे जावेद अख्तर यांनी सांगितले. कविता मला नेहमीच फार प्रिय आहेत. गालिब, कबीर, रहीम यांचे शेर आणि दोहे किती सुंदर आणि अभिजात आहेत. त्यांचा अर्थ आजच्या काळातही किती सुसंगत आहे, हे लोकांना जाणवून देण्याचा आपला प्रयत्न असेल असे अख्तर यांनी सांगितले. आपले समृध्द साहित्य थेट लोकांपर्यंत पोहोचवण्याची संधी या उपक्रमातून मिळाल्याबद्दल आपल्याला आनंद वाटत असल्याचेही अख्तर यांनी यावेळी सांगितले.