सध्या संपूर्ण देशात कांदा दरवाढीचा भडका आणि तडका याचा ‘ठसका’ सगळ्यांनाच लागत आहे. देशभरात कांद्याच्या किंमतीने शंभरी गाठली आहे. सोशल मीडियावर #OnionPrice हा हॅशटॅग ट्रेंड होत असल्याचे दिसत आहे. सतत वाढत जाणारे कांद्याचे दर हे सरकारसाठीही चिंतेचा विषय ठरत आहेत. अशातच संसदेत चर्चेदरम्यान कांद्याच्या वाढत्या दराबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना सवाल करण्यात आला. यावर निर्मला सीतारमन यांनी आपले कुटुंबीय कांदा, लसूणसारखे पदार्थ जास्त खात नसल्याचे अजब स्पष्टीकरण दिले.

सीतारमन यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियामधून मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. “मी जास्त कांदा, लसूण खात नाही त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही,” असे त्या बोलताना म्हणाल्या. त्यांच्या या विधानावर सोशल मीडियावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. पण सर्वांचे लक्ष वेधले आहे ते राजकीय विश्लेषक आणि बिग बॉस स्पर्धक तहसीन पूनावाला यांनी केलेल्या ट्विटने. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामनवर निशाणा साधत टीका केली आहे.

“माननीय अर्थमंत्री निर्मला सीतारामनने म्हटले की ‘मी कांदा खात नाही आणि मी अशा कुटुंबातून आली आहे, ज्या ठिकाणी कांदा जास्त प्रमाणात खाल्ला जात नाही’ म्हणून कांद्याच्या वाढत्या किंमतीने त्यांना काही फरक पडत नाही?” असे तहसीन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.