|| सुहास जोशी

पुढे काय वाढून ठेवलंय याची कसलीही माहिती नाही. पूर्वीच्या मोहिमांच्या कसल्याही नोंदी नाहीत. सोबत सामग्री भरपूर, पण वाट अनोळखी. किंबहुना त्या भागात जाणारे तुम्हीच पहिले असता. अशा वेळी अनेक निर्णय घ्यावे लागतात, कधी ते यशस्वी होतात, तर कधी फसतात. पण असे निर्णय घेतले जातात. त्यातून उद्भवणाऱ्या संकटाचा जमेल तितका प्रतिकार केला जातो. अनेक माणसं, त्या प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव, त्यातच निसर्गाचे संकट वेगळेच आणि अशा परिस्थितीत जीव तर वाचवायचाय आणि मोहीमदेखील यशस्वी करायची आहे. अशा कठीण प्रसंगाचे थरारक चित्रण ‘द टेरर’ या वेबसिरीजमध्ये करण्यात आलं आहे. ही सिरीज १८४५ सालच्या आर्टिक महासागरातील एका शोध मोहिमेच्या सत्यघटनेवर आधारित आहे.

आर्टिक महासागरातून वायव्येकडून जाणारा एक नवा मार्ग (नॉर्थवेस्ट पॅसेज) शोधण्याच्या उद्देशाने ब्रिटनचे शाही नौदल एक महत्त्वाकांक्षी मोहीम आखते. टेरर आणि एरेबस ही दोन तत्कालीन अत्याधुनिक जहाजं १३४  जणांना घेऊन हा पॅसेज शोधण्यासाठी रवाना होतात. सर जॉन फ्रॅन्कलिन यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम मार्गक्रमण करत असते. अपेक्षित ध्येयाच्या सुमारे २०० मैल अलीकडे असताना आर्टिक खंडाच्या हिवाळ्याचा त्यांना सामना करावा लागतो. बर्फामधून मार्ग काढला जात असतो, पण शेवटी निसर्गाचा फटका बसतो आणि ही दोन्ही जहाजं थेट गोठलेल्या सागराच्या बर्फात रुतून बसतात. तब्बल एक वर्ष सात महिने. जहाजांवर तीन वर्षे पुरेल इतके अन्नधान्य साठवलेले असते. जपून वापरले तर आणखीन एखादं वर्ष जाऊ  शकते. पण निसर्ग काही हार मानायला तयार नसतो. त्यातच त्यांना त्या प्रदेशातील अस्वलसदृश्य अत्त्वनाकलनीय पण महाकाय प्राण्याचा सामना करावा लागतो. दरम्यान मोहिमेच्या नेत्याचा मृत्यू होतो आणि उपकप्तान फ्रान्सिस क्रोजरच्या नेतृत्वाखाली सर्वजण जहाज सोडून दक्षिणेच्या दिशेने बर्फाळ प्रदेश सोडून विल्यम आयलंडच्या खडकाळ प्रदेशातून ८०० मैल चालायला सुरुवात करतात. पण त्यांना अनेक हालअपेष्टांचा सामना करावा लागतो आणि अखेरीस सर्वाचा मृत्यू होतो. या साऱ्याचे चित्रण म्हणजे ‘द टेरर’ ही वेबसिरीज.

ही सिरीज सत्यकथेवर आधारित आहे. १८४५ च्या मोहिमेची काहीच माहिती न मिळाल्यामुळे पुढे अनेक वर्षांमध्ये अनेक संस्थांनी आखलेल्या शोध मोहिमांमधून फ्रॅन्कलिनच्या मोहिमेची माहिती तुकडय़ा तुकडय़ाने हाती लागत गेली. त्याच आधारे लिहिलेल्या ‘द टेरर’ या कादंबरीवर वेबसिरीजची मांडणी करण्यात आली आहे. नंतरच्या काळातील शोध मोहिमांमधून सापडलेल्या निष्कर्षांमध्ये अस्वलसदृश्य अनाकलनीय प्राण्यांचा उल्लेख नाही. हा भाग सोडल्यास या वेबसिरीजमध्ये बहुतांशपणे शोध मोहिमांच्या निष्कर्षांचा बराच आधार दिसून येतो. अस्वलाचा भाग हा टेरर या नावाला आणखीन उठाव देण्यासाठी वापरण्याचा प्रयत्न झाला असावा (कदाचित त्यासाठी त्या भागातील एस्किमोंच्या दंतकथांची जोड मिळाली असावी). मुळातच हा विषय इतका नाटय़मयतेने भरलेला आहे की त्यात असं काही तरी घुसडायची गरज नव्हती, पण ते घुसडलं गेलंय हे सत्य आहे.

दोन्ही जहाज बर्फात अडकून पडणे आणि त्यानंतर ती सोडून खडकाळ प्रदेशातून होणारी पायपीट अशा दोन भागांत ही मालिका विभागली गेली आहे. जहाज बर्फात अडकल्यानंतरच्या नैसर्गिक अडचणी दाखवण्यापेक्षा त्या अगतिकतेतून निर्माण होणारे माणसामाणसांतील तंटे दाखवणे, अटीतटीच्या प्रसंगी माणूस कसा वागू शकतो ते मांडणे असे प्रसंग दिग्दर्शकाला अधिक प्रिय असल्याचे दिसते. एकाच पातळीवरच्या दोन अधिकाऱ्यांमधील तणाव, त्याच वेळी खालच्या फळीत होणारे बंड, स्थानिक एस्किमोंशी होणारा संघर्ष अशा घटनांवर भाष्य करण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. या मोहिमेचं काय झालं हे शोधण्यासाठी आखलेल्या मोहिमांनी मांडलेल्या काही महत्त्वाच्या शास्त्रीय निष्कर्षांंच्या आधारे अनेक प्रसंग दिग्दर्शकाने चांगल्या पद्धतीने उभे केले आहेत. मोहिमेतील लोकांना झालेल्या आजारांचे निष्कर्ष, त्यांची सापडलेली साधनसामग्री या सर्वाचा अगदी पुरेपूर वापर या प्रसंगातून होतो. अर्थातच संपूर्ण सत्य माहिती नसताना जे काही हाती आहे त्याआधारेच याची मांडणी होणार हे जरी लक्षात घेतले तरी अस्वलसदृश्य प्राण्याप्रमाणेच आणखीदेखील काही अनाकलनीय प्रसंग यात दिसून येतात.

हल्ली उत्तम दर्जाच्या कॅमेऱ्यामुळे उत्तम चित्रीकरण करता येत असले तरी या सिरीजमध्ये अनेक कठीण प्रसंगी कॅमेऱ्याचा कस लागतो. विशेषत: वादळ, बर्फातले रात्रीचे प्रसंग. या प्रदेशात हिवाळ्यात सूर्य अगदी काही क्षणापुरता उगवतो. त्या काळात क्षितिजावर होणारी रंगांची उधळण (नॉर्दन लाईट्स प्रमाणेच) इतक्या उत्कृष्टरित्या पकडली आहे की त्या कठीण प्रसंगातदेखील त्यामुळे एक प्रकारची प्रसन्नता जाणवते.

एखाद्या यशस्वी मोहिमेची थरारक कथा पाहताना अंतिमत: यश लाभणार हे माहीत असते. कथानकातील आव्हानं त्या प्रभावाखाली पाहिली जातात. पण येथे तर अयशस्वी मोहिमेतल्या काही गोष्टी तुकडय़ा तुकडय़ाने माहिती आहेत. त्यामुळे त्याचा कल्पनाविस्तार आणि त्याचा दृश्यविस्तार कसा केला हेच अधिक महत्त्वाचे ठरते. त्याआधारे विचार करायचा तर अनाकलनीय घटना घुसडणे सोडले तर बाकी मालिका यशस्वी म्हणता येईल.

  • द टेरर, सीझन पहिला
  • ऑनलाइन अ‍ॅप – अमेझॉन