अमिताभ बच्चन यांचा ‘पा’ आणि शाहरूख खानच्या ‘फॅन’ सारख्या गेल्या वर्षभरातील अनेक बॉलीवूडपटांमधून कलाकारांचा करण्यात आलेला मेकओव्हर चर्चेचा विषय ठरला होता. रामगोपाल वर्माच्या ‘वीरप्पन’ चित्रपटामुळे मेकओव्हरचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या चित्रपटात संदीप भारद्वाज वीरप्पनची मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या भूमिकेसाठी संदीपने त्याच्या लूकमध्ये कमालीचा बदल घडवून आणला आहे. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांनी संदीपचा मेकअप केला आहे. विक्रम गायकवाड यांनी संदीपसारख्या शहरी तरूणाचे थेट जंगलात राहणाऱ्या क्रुरकर्मा वीरप्पनच्या दिसण्याशी साधर्म्य साधणारे रूपांतर केले आहे.
हा चित्रपट वीरप्पनच्या जीवनावर आधारित नसून त्याला मारणाऱ्या व्यक्तीवर प्रकाशझोत टाकणारा आहे. एकेकाळी वीरप्पनने खूप मोठी दहशत निर्माण केली होती. कर्नाटक आणि तामिळनाडू शासनाला त्याने सळो की पळो करून सोडले होते. अखेर २००४ मध्ये पोलीस चकमकीत तो मारला गेला. तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटक शासनाने त्याला पकडण्यासाठी कोटय़वधी रुपये खर्च केले होते, मात्र एका व्यक्तीकडून तो मारला गेला. ‘वीरप्पन’ चित्रपटात या घटनेला महत्त्व देण्यात आले आहे.