वेगळ्या आणि धाडसी विषयांवरील नाटके सादर करण्याची परंपरा जपत लता नार्वेकर यांच्या ‘श्री चिंतामणी’ संस्थेच्या ‘ती गेली तेव्हा’ या नव्या नाटकाचा शुभारंभ येत्या २८ जुलै रोजी, रविवारी मुंबईत होत आहे. नाटकाचे लेखक, दिग्दर्शक आणि नाटकातील अभिनेते यांनी प्रायोगिक/समांतर रंगभूमीवर अनेक वर्षे काम केलेले असले तरी यापैकी कोणालाही ‘सेलिब्रेटी’ असे वलय नाही. तरीही या सर्व मंडळींना बरोबर घेऊन व्यावसायिक रंगभूमीवर हे नाटक आणण्याचे धाडस नार्वेकर यांनी केले आहे. मनोरंजन क्षेत्रातील भंपकपणावर हे नाटक कोरडे ओढणारे आहे. नाटकाचे लेखक राजीव मुळ्ये यांनी मूळ एकपात्री दीर्घाकाचा आधार या नाटकासाठी घेतला असून नाटकाला कोणताही विशिष्ट असा मूड नाही. नाटकाचे दिग्दर्शन किरण माने यांनी केले असून नाटकात स्वत: किरण माने यांच्यासह योगिनी चौक, निलिमा दामले, रोहित चव्हाण, अजिंक्य ननावरे हे कलाकार आहेत. नाटकाचे नेपथ्य प्रदीप सुळे यांचे तर संगीत अशोक पत्की यांचे आहे.
या नाटकाबद्दल ‘वृत्तान्त’शी बोलताना नार्वेकर म्हणाल्या की, मला नेहमीच वेगळे काहीतरी करायला आवडते. नाटकाची संहिता, कथा आणि काम करणारे कलाकार यांची अभिनयाची ताकद हे माझ्या दृष्टीने महत्वाचे असते. हे सगळे मला या नाटकात दिसले. त्यामुळे ही मंडळी ‘सेलिब्रेटी’नाहीत म्हणून त्यांना संधी नाकारायची, हे काही मला योग्य वाटले नाही.
नाटकाची गोष्ट मनोरंजन क्षेत्राशी आणि त्यातील भंपकपणावर कोरडे ओढणारी असली तरी आज येथे जे पाहायला मिळते ते सर्वसाधारणपणे अन्य क्षेत्रातही दिसून येते. गुणवंतांची कदर नसणे आणि तथाकथित भंपक मंडळी ‘सेलिब्रेटी’ होणे, त्यांच्यासाठी पायघडय़ा अंथरल्या जाणे पाहायला मिळते. समाधान आणि सुख म्हणजे नेमके काय, यातील फरक कळत नाहीये. सर्जनशिलता, कामातील आनंद संपला असून माणूस आपला आनंद उपभोगात शोधतोय. या सगळ्यात गुणवंतांची उपेक्षा होत आहे. यातून काही जणांना वैफल्य येते, हे सगळे या नाटकात थेटपणाने भाष्य करत मांडले असल्याचे किरण माने आणि राजीव मुळ्ये यांनी ‘वृत्तान्त’ला सांगितले.