27 May 2020

News Flash

‘काम मोजकेच, पण चांगले हवे’

दिवाळीत अंकुशची मुख्य भूमिका असलेला ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे

(संग्रहित छायाचित्र)

मानसी जोशी

‘महाराष्ट्राची लोकधारा’पासून अभिनयाच्या कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या अंकुश चौधरीने ‘ऑल द बेस्ट’सारखे नाटक, ‘बेधुंद मनाच्या लहरी’सारखी मालिका आणि नंतर विविध चित्रपट दिले. तसेच ‘साडे माडे तीन’, ‘अगंबाई अरेच्चा’ आणि ‘जत्रा’ यातून ’त्याने दिग्दर्शनही आजमावले. इतकी वर्ष या क्षेत्रात अनेक चढ-उतार अनुभवत आघाडीचा अभिनेता म्हणून लौकिक मिळवणाऱ्या अंकुशने आता एकावेळी एकाच माध्यमावर किंबहुना एकाच चित्रपटावर लक्ष केंद्रित करायचा निर्णय घेतला आहे. कारकीर्दीच्या सुरुवातीला पळापळ करत सगळ्याच माध्यमांतून काम केले आहे, मात्र एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्याने सर्जनशीलता वाढते, असे सांगत आता मोजकेच पण जास्तीत जास्त चांगले काम करण्यावर आपला भर असल्याचे अंकुश सांगतो.

या दिवाळीत अंकुशची मुख्य भूमिका असलेला ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात अंकुशबरोबर अभिनेत्री शिवानी सुर्वे आणि पल्लवी पाटील यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच आपण दोन नायिका-एक नायक अशी त्रिकोणी प्रेमाची कथा केली असल्याचे त्याने सांगितले. सध्याच्या कलाकारांसमोर अनेक माध्यमांचे प्रकार उपलब्ध आहेत. नाटक-चित्रपट-मालिका केल्यानंतर वेबसीरिजसारख्या नव्या माध्यमात त्याला यावेसे वाटते का़, यावर बोलताना तो म्हणाला, एकाच कामावर लक्ष केंद्रित केल्याने सर्जनशीलता वाढते असे माझे स्पष्ट मत आहे.

अभिनेता म्हणून सातत्याने वेगळे काही देण्याची धडपड करणाऱ्या अंकुशच्या ‘ट्रिपल सीट’मध्ये वेगळेपणा काय आहे, हे सांगताना तो म्हणाला, गेल्या वर्षी माझा ‘देवा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर पुढील चित्रपटाच्या तयारीसाठी वेळ घेतला. एक ते दोन वर्षांच्या मेहनतीनंतर ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट दिवाळीच्या दिवसांत प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. हा कौटुंबिक चित्रपट आहेच, शिवाय रॉमकॉम पद्धतीचा चित्रपट आहे. हा चित्रपट एका सत्यकथेवर आधारित असून एका मिस्ड कॉलने नायकाचे जीवन कसे बदलून जाते याची गंमत मांडणारा हा चित्रपट आहे, असे त्याने सांगितले. दुसरं म्हणजे या चित्रपटाची टीम पूर्णपणे वेगळी आहे, असं तो म्हणतो.

‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट संपूर्ण नगरचा आहे. आत्तापर्यंत अंकुशने शहरी विषयांवरचे अनेक चित्रपट केले आहेत. मात्र पहिल्यांदाच नगरचे निर्माते, लेखक, दिग्दर्शक यांच्याबरोबर त्याने काम के ले आहे. आपण जसजसे पुणे-मुंबईपासून दूर जातो तसतसं माणसांचं वेगळं जग अनुभवायला मिळत जातं. नगरच्या पट्टय़ात पोहोचल्यानंतर सहज खांद्यावर हात टाकून विश्वासाने बोलणारे, तुमचं स्वागत करणारे लोक  भेटतात, असं तो सांगतो. या चित्रपटाचे निर्माता नरेंद्र फिरोदिया स्वत: एकांकिकांमधून आले आहेत. ते नगरमध्ये गेली कित्येक वर्ष एकांकिका स्पर्धाचे आयोजन करतात. या चित्रपटाचा लेखक-दिग्दर्शक ही मंडळीही एकांकिकांमधून पुढे आलेली आहेत. त्यांच्या भाषेचा एक लहेजा आहे, विचारांची एक पद्धत आहे हे सगळं या चित्रपटातून अनुभवायला मिळेल. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण नगरला पार पडले आहे. तिथली लोक अत्यंत प्रेमळ असून त्यांच्यासोबत काम करताना मजा आली. अत्यंत खेळीमेळीत हा चित्रपट पार पडला. तिथल्या तरुण मुलांमध्ये उपजतच कौशल्य आहे. अशा छोटय़ा छोटय़ा शहरात असे अनेक गुणवान कलाकार दडले असून त्यांना योग्य दिशा मिळाल्यास ते यशस्वी होऊ शकतात असेही त्याने सांगितले.

अंकुशने आत्तापर्यंत मुक्ता बर्वे, सई ताम्हणकर आणि आता शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील अशा सहकलाकारांसोबत काम केले आहे. प्रत्येक सहकलाकाराकडून चांगल्या गोष्टी शिकण्याचा मी प्रयत्न करतो, असं अंकुश सांगतो. या चित्रपटातही शिवानी आणि पल्लवी दोघींबरोबर काम करताना मजा आली. शिवानीने ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याआधीच हा चित्रपट केला होता. ती या शोमध्ये अत्यंत रागीट,आक्रमक स्वभावाची दिसली. मात्र, प्रत्यक्षात ती अत्यंत मेहनती असून सगळ्यांची काळजी घेते. कदाचित या शोच्या स्वरूपामुळे माणूस तसा व्यक्त होत असावा, असेही तो म्हणाला.

नायकाला आलेल्या एका मिसकॉलने आयुष्य बदलते, अशी चित्रपटाची कथा आहे.अंकुशने त्याला वास्तवात आलेल्या मिसकॉलचा गमतीदार किस्सा यावेळी सांगितला. मुंबईत चाळीत राहात असताना खूप कमी लोकांकडे दूरध्वनी होता. दररोज अकरा-बाराच्या दरम्यान मिस्ड कॉल माझ्या नावाने येत होता. फोन घेतल्यावर समोरून कोणीच बोलायचे नाही. हा प्रकार दहा ते पंधरा दिवस सुरू होता. नंतर या घटनेबद्दल मी विसरून गेलो होतो. काही वर्षांनंतर एका समारंभात एक तरुणी नवऱ्यासह आली होती. त्या वेळेस तिने सांगितले की, अकराच्या सुमारास मीच मिस कॉल देत होते. मी अशाच माणसाशी लग्न केलं ज्याची उंची तुमच्याएवढी आहे. असे अनेक गमतीदार किस्से घडत असतात, मात्र हा मिस कॉल माझ्या कायम स्मरणात राहील, असं अंकुश म्हणतो.

‘महाराष्ट्राची लोकधारा’पासून झालेल्या अभिनयाच्या प्रवासाची गोष्टही त्याने सांगितली. मी ठरवून अभिनय क्षेत्राकडे वळलो नाही. मी आणि केदार शिंदे शाळेपासूनचे मित्र आहोत. केदार अनेक सांस्कृ तिक कार्यक्रमात सहभाग घेत होता. एकदा केदारने ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यक्रमात नाचायला येशील का, असे विचारले. हा माझ्या दृष्टीने आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. ‘महाराष्ट्राची लोकधारा’ करता करता अभिनयाविषयी आवड निर्माण झाली आणि त्यामुळे याच क्षेत्रात कारकीर्द घडवायचे ठरवले, असं तो सांगतो.

‘ऑल द बेस्ट’ या नाटकातून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या अंकुशला भविष्यात जागतिक स्तरावरील ब्रॉडवेसारखे नाटक करायचे आहे. इंग्लड, अमेरिका आणि युरोपमध्ये प्रेक्षक जगभरातून नाटक पाहण्यास हजेरी लावतात. त्याप्रमाणे पुणे, मुंबई, नाशिक या शहरांत जागतिक स्तरावर नाटक करायचे आहे. यासाठी अनेक नाटय़कर्मीना या संदर्भात विचारणा केली होती. परंतु काही कारणाने हा प्रयोग पूर्णत्वास येऊ शकला नाही. रोज नाटक करण्यापेक्षा शनिवार-रविवारी प्रयोग करणे आवडेल. मात्र दीर्घकाळ चालणारे ऑपेरासारखे नाटक करायला मिळाल्यास उत्तमच. सध्या नाटकासाठी द्यावा लागणारा वेळ माझ्याकडे नाही, परंतु भविष्यात संधी मिळाल्यास नक्की नाटक करेन, असं त्याने सांगितलं.

त्याचा हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होत असल्याने त्याने दिवाळीच्या आठवणींना उजाळा दिला. दरवर्षी मी कुटुंबासोबत दिवाळी साजरी करतो. परंतु यंदा ‘ट्रिपल सीट’ हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या कामात व्यग्र असेन. दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपट प्रदर्शित होण्याचा आनंदच वेगळा आहे. यंदा माझ्या मुलाने प्रिन्सने फटाक्यांमुळे प्रदूषण होत असल्याने फटाके उडवणार नसल्याचे सांगितले. लहान वयात त्याला आलेली समज पाहून अभिमान वाटला. फटाके उडवल्याने मोठय़ा प्रमाणावर प्रदूषण होते. त्यामुळे यंदा पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचे ठरवले असल्याचे त्याने सांगितले. ‘दगडी चाळ’ ही त्याची भूमिका असलेला चित्रपट चांगला गाजला होता, आता या चित्रपटाच्या सिक्वलचीही घोषणा झाली आहे. त्यामुळेही तो आनंदात आहे.

कलाकार म्हणून मराठी चित्रपट, मालिका, नाटक आणि आता वेबसीरिज या माध्यमांमध्ये आशय आणि तंत्राच्या दृष्टीने जे बदल झाले आहेत, त्याचे तो स्वागत करतो. अमेय वाघ, निपुण धर्माधिकारीसारखी तरुण कलाकार मंडळी आशयाच्या दृष्टीने जे प्रयोग करत आहेत ते वाखाणण्याजोगे असून आपल्यालाही त्यांच्याबरोबर काम करायला आवडते, असं तो सांगतो. एकेकाळी अंकुश-केदारसारख्या तरुण कलाकारांनी एकत्र येऊन ‘घडलंय बिघडलंय’, ‘टिकल ते पॉलिटिकल’सारखे प्रयोग केले होते, आज ही तरुण कलाकार मंडळी असेच प्रयोग करत आहेत, केवळ माध्यम बदललेले आहे, याकडेही त्याने लक्ष वेधले. माध्यम कोणतेही असो यापुढेही कलाकार म्हणून सातत्याने सर्जनशील आणि प्रेक्षकांना काही देऊ करणारे काम करायचे आहे, असा निर्धारही त्याने यावेळी व्यक्त केला.

‘मराठी गाणी जास्त ऐकवली पाहिजेत’

‘ट्रिपल सीट’ या  चित्रपटात गायिका बेला शेंडे हिने ‘रोज वाटे’ हे गाणे गायले आहे. मराठी चित्रपटातील गाणी ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्तीत जास्त माध्यमांची गरज आहे. आज एक पिढी ही शास्त्रीय संगीताच्या प्रेमात आहे. शिवाय, तरुण पिढीलाही शास्त्रीय संगीताची ओढ आहे. शास्त्रीय संगीत हा आपल्या संगीताचा पाया असल्याने तो मजबूत करणे गरजेचे आहेच. मात्र या दर्दी रसिकांबरोबरच सध्या हिंदी संगीतावरच ठेका धरणाऱ्या लोकांनाही मराठी गाण्यांकडे वळवणे हे संगीतकार आणि गायकांसाठी आव्हान आहे. सर्व गाण्यांचा शास्त्रीय संगीत हा पाया आहे. त्यामुळे चित्रपट संगीत असो किंवा रागदारीवर सादर होणारे गाणे ज्या गाण्यात चाल आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचणारच. जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी म्हणूनच प्रेक्षकांच्या अजूनही स्मरणात आहेत, असे मत बेला शेंडे यांनी व्यक्त केले.

तर या चित्रपटाला संगीत देणाऱ्या संगीतकार विश्वजीत यांच्या मते, एफएम मराठीवर सध्या मराठी गाण्यांच्या वेळा वाढवणे आवश्यक आहे, कारण हिंदी चित्रपट प्रदर्शित होण्याआधी त्याची गाणी रेडिओ, यूटय़ूबच्या माध्यमातून सातत्याने वाजवली जातात. त्यामुळे ती लोकांच्या लक्षात राहतात. तुलनेने मराठी चित्रपटाची गाणी ही कमी वाजवली जातात. सध्या समाजमाध्यमांमुळे मराठी गाणी प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत, असे त्यांनी सांगितले. सध्या हिंदीबरोबरच मराठी गाण्यांचेही रिमेक केले जात आहे. सध्या गाण्यांच्या रिमेकची लाट आहे. रिमेक करणे ही वाईट गोष्ट नाही. गाण्याच्या मूळ गाभ्याला धक्का न लावता केल्यास लोकांना ते आवडते. परंतु ते गाणे कशा पद्धतीने आणि कोण रिमेक करते आहे यावर त्याची लोकप्रियता अवलंबून असते. प्रत्येक रिमेक गाणे हे यशस्वी होईल असे नाही, असेही विश्वजीत यांनी स्पष्ट केले. या चित्रपटातून नवोदित गायिका हरगुन कौर हिनेही ‘नाते हे कोणते’ गाणे गात पाशर्वगायिका म्हणून पदार्पण केले आहे.

सध्या माध्यमांचे प्रकार वाढल्याने अनेक कलाकार नाटक, वेब सीरिज, चित्रपट आणि मालिका यात काम करत आहेत. अनेक कामे स्वीकारल्याने एक ना धड भाराभर चिंध्या अशी अवस्था होते. मला असं करायला आवडत नाही. एकच काम करण्यास मी प्राधान्य देतो. एक नाटक अथवा चित्रपट करण्यासाठी किमान वर्षभराचा वेळ लागतो. सध्या चित्रपट करत असल्याने संहिता वाचण्यापासून ते प्रसिद्धीपर्यंतच्या सगळ्या कामात मी सक्रिय सहभाग घेतो. वेबसीरिजमध्ये काम करण्यासारखा चांगला विषय मिळेल, तेव्हा निश्चित काम करीन.  एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित केल्याने सर्जनशीलता वाढते.

-अंकुश चौधरी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:35 am

Web Title: triple seat marathi movie ankush chaudhari interview abn 97
Next Stories
1 हिरकणी..
2 चित्रचाहूल : ‘लगीनघाई’ आणि ‘मांडव खोडय़ा’
3 पाप्याच्या पितराचा पवित्रा..
Just Now!
X