मुंबई : ‘बाहुबली २’नंतर व्हीएफएक्सचा मोठय़ा प्रमाणावर वापर करत दोन वेगळ्या संस्कृ तींची गोष्ट सांगणारा ‘राब्ता’ हा आजचा चर्चेतला चित्रपट आहे. हिंदी चित्रपटांमध्ये व्हीएफएक्सचा वापर करू न वेगळी कथा घडवण्याचं शिवधनुष्य फारसे कोणी पेलताना दिसत नाही. ‘बाहुबली’च्या माध्यमातून एस. एस. राजामौली यांनी ते धाडस पहिल्यांदा केले आणि त्यांच्या चित्रपटला यश मिळाल्यानंतर अशा पद्धतीचा आलेला ‘राब्ता’ हा पहिलाच हिंदी चित्रपट असेल. हिंदीत ‘राब्ता’ आणि हॉलीवूडच्या पडद्यावर ‘द ममी’च्या नव्या अवतारात अभिनेता टॉम क्रुझला पाहणे ही या आठवडय़ाची पर्वणी ठरेल.

राब्ता

बिछडे प्रेमी, पुनर्जन्म आणि पुन्हा त्यांचे मीलन ही बॉलीवूडच्या भाषेत सांगायचे तर लंबे अरसोंसे चालत आलेली गोष्ट आहे. त्याला व्हीएफएक्स आणि आजच्या काळाचे संदर्भ जोडत ‘राब्ता’ साकारण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दिनेश विजन आणि होमी अडजानिया ही जोडगोळी हिंदी चित्रपटप्रेमींना नवीन नाही. ‘कॉकटेल’, ‘फाईंडिंग फॅनी’सारखे आजच्या तरुणाईची भाषा बोलणाऱ्या या चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून होमी हे नाव परिचित आहे आणि याच चित्रपटांचा निर्माता म्हणून दिनेश विजनने काम पाहिले होते. ‘राब्ता’साठी या दोघांनीही आपल्या भूमिका बदलल्या असून दिनेशचा हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच प्रयत्न आहे. क्रिती सनन आणि सुशांत सिंग राजपूत ही जोडी या चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र आली आहे. चित्रपटाची गाणी आधीच लोकप्रिय झाली आहेत. आता ‘बाहुबली’प्रमाणे व्हीएफएक्सचा मंत्र या चित्रपटालाही यशाची मात्रा लागू करतोय की नाही याचे उत्तर आजच मिळेल.

बहेन होगी तेरी

या चित्रपटातही राजकुमार यादव आणि श्रुती हसन अशी वेगळीच जोडी एकत्र दिसणार आहे. चित्रपटाच्या प्रोमोजवरून तरी हा रॉमकॉम आहे आणि वेगळ्या धाटणीचा आहे हे लक्षात येते. इथेही या चित्रपटाचे दिग्दर्शन नवोदित अजय पन्नालाल यांनी केले आहे. चित्रपटाच्या मुख्य जोडीबरोबर दर्शन झरीवाला ते गुलशन ग्रोवर, रणजीत अशी नवी-जुनी कलाकार मंडळी या चित्रपटात एकत्र आली आहेत.

द ममी

एक संकल्पना यशस्वी ठरल्यानंतर तिला किती वेळा आणि किती वेगवेगळ्या प्रकारे पुनर्जन्म द्यायचा हे हॉलीवूडकडून शिकायला हवे. ‘द ममी’ ही या यशस्वी सिक्वलपट मालिकोंमधली एक चित्रपट मालिका आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. चौथ्यांदा या चित्रपट मालिकेचा पुनर्जन्म झाला असून याआधीची ‘द ममी’ ही चित्रत्रयी तितकीच गाजली होती. नव्या चित्रपटात टॉम क्रुझची मुख्य भूमिका आहे. इजिप्तच्या वाळवंटात उभ्या असलेल्या अनेक पिरॅमिडमध्ये कित्येक शतकांपासून दफन असलेल्या ममीपैकी आणखी एका प्राचीन राजकन्येची ममी जागृत झाली आहे. तिने घातलेला गोंधळ टॉम क्रु झ, रसेल क्रोसारखे अभिनेते निस्तरताना दिसणार आहेत.

झरी

कुमारी मातांच्या प्रश्नांचा वेध ‘झरी’ या चित्रपटातून घेण्यात आला आहे. राजू मेश्राम दिग्दर्शित या चित्रपटात वऱ्हाडी, तेलुगू, छत्तीसगढी अशा तीन भाषांचा संगम यात पाहायला मिळणार असून अभिनेत्री नम्रता गायकवाड यात मुख्य भूमिकेत आहे.

बॉक्स ऑफिस

  • वंडर वुमन – १२.०४ कोटी
  • बेवॉच – ६.९५ कोटी
  • हिंदी मीडियम – ५० कोटी
  • सचिन : अ बिलियन ड्रीम – ४५.७५ कोटी
  • पायरेट्स ऑफ कॅरेबिअन ५ – २१.६ कोटी
  • हाफ गर्लफ्रेंड – ५४.५ कोटी