25 February 2021

News Flash

फिरुनी पुन्हा परतेन मी!

‘बेवफा ब्युटी’ या गाण्यासाठी दिग्दर्शक अभिनय देवने मला संपर्क केला तेव्हा खरं म्हणजे आयटम साँग करायचं की नाही?

एक-दोन नाही दहा वर्षांनी ती प्रेक्षकांसमोर पडद्यावर आली. ज्या अदांसाठी ती ओळखली जात होती त्याच अदा, तेच नखरे, ठुमके दाखवत ती थिरकली आणि ‘बेवफा ब्युटी’ म्हणून ती गाजतेय. एकीकडे ऊर्मिला मातोंडकरच्या अदा पुन्हा एकदा पहायला मिळाल्या म्हणून तिचे चाहते भलतेच खूश आहेत तर दुसरीकडे हिंदी-मराठी चित्रपटांचा मार्ग न चोखाळता अचानक एका आयटम साँगमधून तिने लोकांसमोर यावं हे मा६ तिच्या चाहत्यांना रुचलेलं नाही. पण आपण जे निवडू आणि जे करू त्यावर ठाम असणारी अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर मात्र आपल्या या गाण्यावर, नृत्यावर आणि लोकांनी दिलेल्या प्रतिसादावर खूश आहे. चित्रपटांपलीकडेही एक जग आहे आणि ते सुंदर असायला हवं यासाठी माझी कायम धडपड होती आजही मी त्यालाच प्राधान्य देते आहे, असे तिने स्पष्ट केले.

‘बेवफा ब्युटी’ या गाण्यासाठी दिग्दर्शक अभिनय देवने मला संपर्क केला तेव्हा खरं म्हणजे आयटम साँग करायचं की नाही?, असा काहीच विचार माझ्या डोक्यात नव्हता. अभिनयला मी इतकी वर्ष ओळखते आहे. तो रमेश देव आणि सीमा देव यांचा मुलगा आहे. दिग्दर्शक म्हणूनही तो खूप वेगळा आहे. त्याच्यासारखा दिग्दर्शक जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट करायला सांगतो तेव्हा निश्चितच त्याचा त्यामागचा विचार महत्त्वाचा असतो. माझंही तसंच झालं, असं ती सांगते. अभिनयने मला आधीच स्पष्ट केलं होतं की त्याला आणखी एक आयटम नंबर म्हणून हे गाणं नको आहे. ऊर्मिलाने तिच्या कारकीर्दीत अशी अनेक गाणी गाजवली आहेत. ‘छम्मा छम्मा’ असेल नाहीतर अगदी सुरुवातीला ‘रंगीला’मधून केलेलं ‘तनहा तनहा’ असेल. ऊर्मिलाने तिच्या अदाकारीने ही गाणी गाजवली आहेत. तुझे लटके-झटकेही लोकांनी पाहिलेले आहेत. त्यामुळे मला या गाण्यात एक वेगळेपण हवं आहे, असं त्याने आपल्याला सांगितल्याचं ती म्हणते. अभिनयशी बोलणं झाल्यानंतर तिने जेव्हा पहिल्यांदा ‘बेवफा ब्युटी’ हे गाणे ऐकलं तेव्हा त्यातला वेगळेपणा तिच्या लक्षात आला. आधीच्या चित्रपटांमध्ये अशी गाणी असायची. ज्यात नायक-नायिकांबरोबरच आणखी एक तिसरी व्यक्ती असायची जी तिच्या गाण्यातून त्या चित्रपटाची कथा, व्यक्तिरेखा लोकांसमोर मांडायची. ‘बेवफा ब्युटी’ हे गाणं त्या पठडीतलं आहे. या गाण्यातून इरफानची आणि मग त्याच्या गोष्टीची ओळख होते. शिवाय, या गाण्यासाठी वापरले गेलेले स्थानिक शब्द, त्याचं संगीत ज्यात एकप्रकारचा नखराही आहे आणि सौंदर्यही आहे. या सगळ्या गोष्टी गाण्यात एकत्र आल्याने त्याला नकार देणं अशक्यच होतं’, असं तिने सांगितलं.

या गाण्याला लोकांचा जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्यामुळे ती खूप आनंदी आहे, असं ती म्हणते. आपण जे काही वेगळं करायचा प्रयत्न करतो ते लोकांपर्यंत पोहोचतं आणि ते त्याला दाद देतात त्यावेळी जास्त आनंद होतो. एकतर लोकांना आवडतील इतके चांगले आयटम साँग पहायला मिळणं दुरापास्त झालं आहे. आयटम साँगची व्याख्याच बदलून गेली आहे. ज्या अदाकारीसाठी तिला प्रेक्षकांकडून वाहवा मिळतेय ती या गाण्यांमधून हरवली आहे असं वाटतं का?, याबद्दल बोलताना ती म्हणते, ‘मी कधीच माझ्या कामाशिवाय कोणाच्या कामात लक्ष घातलेलं नाही. मी अभिनेत्री आहे, माझं काम उत्तम करणं यावर माझा भर असतो; पण दुसऱ्यांच्या कामावर टीका करणं हा प्रकार मी तेव्हाही माझ्या कारकीर्दीत कधी केला नाही. त्यामुळे आता तर ते करण्याचा प्रश्नच येत नाही.’ ऊर्मिलाने हिंदी चित्रपटांमध्ये कोम करून बराच काळ लोटला आहे. २०१४ साली तिने ‘आजोबा’ या मराठी चित्रपटात काम केले होते. त्यानंतर ती पुन्हा कधी मराठी चित्रपटातही दिसली नाही. त्यामागचे कारण स्पष्ट करताना हिंदी काय मराठीतही फार चांगल्या ऑफर आल्या नाहीत, असं तिने सांगितलं.

तिच्या वेळच्या अभिनेत्री आता पुन्हा हिंदी चित्रपटांमधून काम करतायेत. तिचा मात्र पुनरागमन या शब्दावर विश्वास नाही. एकदा तुम्ही कलाकार म्हणून सुरुवात केली की तुम्ही आयुष्यभर कलाकारच असता, असं ती म्हणते. पण एकतर ती मराठी आहे आणि फिल्मी पाश्र्वभूमी नसलेल्या घरात जन्माला आली, लहानाची मोठी झाली त्यामुळे तिला फिल्मी झगमगाटा विषयी आकर्षण नाही, असं ती म्हणते. मी स्वत:ला नशीबवान समजते की चित्रपटाशी कुठलाही संबंध नसलेल्या घरात आणि संस्कारात मी मोठी झाले. त्यामुळे फक्त चित्रपट हे माझं विश्व कधीच नव्हतं. चित्रपटाचं जग खूप सुंदर आहे पण ते सुंदर चित्रपट म्हणजेच जग असं कुठेच नाही आहे, हे ती विश्वासाने सांगते. मी आजही खूप काही करतेय आणि त्या कामांमध्ये इतकी व्यग्र आहे की त्यातून सवडच होत नाही. माझ्यासाठी वाचणं, फिरणं, योगा करणं अशा कित्येक गोष्टी दैनंदिन गरजेच्या आहेत. रोजचं आपलं एक धावपळीचं आयुष्य असतं त्यातून तुम्हाला या नवीन गोष्टी शिकण्यासाठी वेळ काढावा लागतो. आताही मी स्पॅनिश शिकते आहे. सायकलिंग करते आहे. इतक्या गोष्टी करायच्या आहेत, शिकायच्या आहेत की एक जन्म अपुरा पडावा. हे माझं जग आहे आणि त्यात आपण खूप रमलो आहे, हेही ती आनंदाने सांगते. तिच्या वैवाहिक जीवनालाही आता दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. त्याबद्दलही खूप समाधानी असल्याचं तिने सांगितलं. ‘माझं नेहमी हेच म्हणणं होतं की लग्न योग्य वेळी, योग्य व्यक्तीशी आणि योग्य कारणासाठी व्हायला हवं. माझ्याबाबतीत ते झालं. लग्नानंतर तुमचं आयुष्य बदललं का?, असा प्रश्न अनेकजण मला विचारतात. पण एकदा तुम्ही आपल्या मनाजोगत्या व्यक्तीला तुमच्या आयुष्यात बरोबरीचं स्थान दिल्यावर साहजिकपणे काही गोष्टी बदलतात. मात्र लग्न झालं म्हणजे तुम्ही पूर्ण बदलायला हवं किंवा तुमच्या जोडीदाराने तुमच्या अपेक्षांनुसार बदलायला हवं हे चुकीचं आहे. तुम्ही जसे आहात तसंच राहून एकमेकांना समजून घेत पुढे गेलं पाहिजे, असं मत तिने व्यक्त केलं. अभिनेत्री म्हणून रुपेरी पडद्यावर सतत दिसण्याचा मोह न बाळगता, जे आपल्याला पटेल त्याच भूमिकांमधून, चित्रपटांमधून काम करणारी ऊर्मिला म्हणूनच गर्दीतही वेगळी ठरते.

‘आजोबा’चा माझा अनुभव फारसा चांगला ठरला नाही. त्याची संकल्पना खूपच चांगली होती. पण मला वाटतं त्यावेळी दिग्दर्शक सुजय डहाके भलतीकडेच वहावत गेला. त्यामुळे ज्या पद्धतीने तो चित्रपट पडद्यावर यायला हवा होता तसा तो दिसला नाही. पण तरीही त्यावेळी मराठीतला तो एक वेगळा प्रयोग होता. त्यामुळे त्या चित्रपटात काम केल्याबद्दल मला समाधान वाटते. मराठीत खूप दर्जेदार चित्रपट येत आहेत. बरं ही आजची गोष्ट नाही. ‘श्वास’ प्रमाणेच खूप चांगले मराठी चित्रपट मी पाहिलेले आहेत. ‘नटरंग’सारखा चित्रपट त्यात होता, आणखीही बरेच चित्रपट होते. मी स्वत: मराठी चित्रपट पुरस्कारांसाठी परीक्षक म्हणून काम पाहिलेलं असल्याने सलग चांगले मराठी चित्रपट मी पाहिलेले आहेत. त्यांचा आशय, मांडणी, अभिनय सगळंच आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन यश मिळवू शकेल असं दर्जेदार आहे. अशा वेळी मी मराठी सिनेमा करायचाच या हट्टापायी टुकार भूमिका करून प्रेक्षकांची निराशा करणं हे मला पटत नाही.  तितकीच चांगली पटकथा असेल तर मला काम करायला नक्कीच आवडेल.    – ऊर्मिला मातोंडकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2018 2:56 am

Web Title: urmila matondkar bewafa beauty
Next Stories
1 सेक्सी दुर्गा चित्रपटाच्या दिग्दर्शकाचे अन्यायाविरोधात पंतप्रधानांना पत्र
2 चर्चेतील ‘शिकारी’ २० एप्रिलला दिसणार..
3 ‘ट्रिपल एक्स’ विन डिझेलचा ‘ब्लडशॉट’
Just Now!
X