ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांचा सल्ला

आधुनिक काळात संगणक, मोबाइल अशा विषयातील तंत्रज्ञान विकसित होत असून त्याचा स्वीकार करणे अपरिहार्य आहे. भविष्यात या गोष्टींवर विकास अवलंबून असेल. तथापि या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार आवश्यकतेनुसारच करायला हवा. त्याच्या आहारी गेल्यास दुष्परिणामाना तोंड द्यावे लागेल. हे दुष्परिणाम टाळण्यासाठी युवकांनी साहित्य आणि संगीत अशा कलांमध्ये रस घ्यायला हवा, असा सल्ला ज्येष्ठ संगीतकार-गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला.

आंबी येथे साकारलेल्या हेरिटेज आर्ट अँड  म्युझिक अकादमीचे उद्घाटन मंगेशकर यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की अध्यक्षस्थानी होते. संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, कथक नृत्यकार पं. नंदकिशोर कपोते, प्रभाकर भंडारे, माजी आमदार दिगंबर भेगडे, कृष्णराव भेगडे, अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर, बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे सुरेश साखवळकर, चित्रा जगनाडे, अंजलीराजे दाभाडे, रामदास काकडे, नंदा घोजगे, गणेश काकडे, विश्वास देशपांडे, अकादमीचे मुख्य कार्यवाह हरिश्चंद्र गडसिंग, नाटय़ परिषदेच्या तळेगाव शाखेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे, प्रणाली जोशी या वेळी उपस्थित होत्या.

मंगेशकर म्हणाले, ‘सध्या वृत्तपत्र वाचून आणि वाहिन्यांवरील बातम्या बघून मन उद्विग्न होते. लहान मुलीवर बलात्कार करून तिला मारून टाकण्याच्या घटना वारंवार घडताना पाहून समाजाचे अध:पतन झाले आहे याची खात्री पटते. अशा विकृतीपासून वाचविण्यासाठी बालवयापासूनच संगीतासारख्या कलेचे संस्कार उपयोगी ठरू शकतील.’

पाच एकर परिसरात निसर्गरम्य वातावरणात साकारलेल्या हेरिटेज आर्ट अँड म्युझिक अकादमीला अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाची मान्यता असून येथे शास्त्रीय संगीत, सुगम संगीत, तबलावादन, संवादिनीवादन, गिटार व सिंथेसायझर वादन तसेच भरतनाटय़म नृत्य आणिअभिनयाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यास अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेची मान्यता लाभली आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम युवा कलाकारांनी सादर केला.