घराघरांत ठाण मांडून बसलेल्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील मालिकांमधली नेमके  कोणकोणती कुटुंबं खरोखरच प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत, याचा कौल घेण्याचा प्रयत्न नुकताच ‘झी मराठी अ‍ॅवॉर्ड २०१५’च्या निमित्ताने करण्यात आला आहे. आणि या स्पर्धेत गेली काही वर्षे सातत्याने अग्रेसर असलेल्या ‘होणार सून मी या घरची’ मालिकेला मागे टाकत अदिती आणि जयच्या ‘का रे दुरावा’ या मालिकेने बाजी मारली आहे. यंदा या मालिकेने एकूण नऊ पुरस्कार पटकावत आघाडी घेतली आहे.

‘झी मराठी’ वाहिनीवर सध्या ‘नांदा सौख्य भरे’ आणि ‘माझे पती सौभाग्यवती’ या दोन मालिका अगदीच नव्याने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या मालिका वगळता अन्य मालिकांमध्ये यंदाच्या पुरस्कारांसाठी एकदम चुरशीची स्पर्धा होती. गेली दोन वर्षे असलेली श्री आणि जान्हवीची मक्तेदारी मोडून काढत या वेळी प्रेक्षकांनी जय आणि आदितीच्या जोडीला सर्वाधिक पसंती दिली असल्याने यंदाचा ‘बेस्ट कपल’ पुरस्कार या जोडीला मिळाला आहे. मात्र ‘बेस्ट सासू’चा पुरस्कार ‘होणार सून मी या घरची’ मालिकेतील सहा सासवांनी यावर्षीही आपल्याकडेच ठेवला आहे. ‘जय मल्हार’ या मालिकेतील खंडोबा अभिनेता देवदत्त नागे याला सवरेत्कृष्ट नायकाचा तर म्हाळसा आणि बानूच्या भूमिका करणाऱ्या सुरभी हांडे व ईशा केसकर यांना सवरेत्कृष्ट नायिकांचा पुरस्कार मिळाला आहे.

‘दिल दोस्ती दुनियादारी’ मालिकेतील कैवल्य आणि आशू यांनी या वेळी त्यांच्या धम्माल विनोदी शैलीत पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले आहे. मालिकेतील कुटुंब हा प्रेक्षकांच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. मात्र या वेळी सवरेत्कृष्ट कुटुंबांची प्रेक्षकांनी केलेली निवडही अनेकांना धक्का देणारी ठरली आहे. ‘होणार सून मी या घरची’चे गोखले कुटुंब, ‘का रे दुरावा’चे खानोलकर कुटुंब, ‘नांदा सौख्य भरे’चे जहागिरदार आणि देशपांडे कुटुंब, ‘चला हवा येऊ द्या’चे कुटुंब या सगळ्यांना बाजूला सारून प्रेक्षकांनी माजघरातील मित्रांच्या ‘दिल दोस्ती दुनियादारी’च्या कुटुंबाला ‘सवरेत्कृष्ट’ची पावती दिली आहे. ‘नॉन फिक्शन शो’मध्ये सवरेत्कृष्ट बहुमान यावर्षीही ‘चला हवा येऊ द्या’ टीमकडेच राहिला असून ‘का रे दुरावा’ ही सर्वोत्तम मालिका ठरली आहे. स्पर्धा आणि बक्षिसांच्या या गमतीजमती, ‘शांताबाई’-‘कल्लूळाचं पाणी’सारख्या गाण्यांवरची नृत्ये, ‘झी मराठी’ परिवाराच्या प्रत्येक कलाकाराने केलेलं सादरीकरण आणि आशू-कैवल्यची धम्माल मस्ती असलेला हा सोहळा १ नोव्हेंबरला ‘झी मराठी’ वाहिनीवर संध्याकाळी ७ वाजता प्रसारित करण्यात येणार आहे.