23 January 2021

News Flash

जगणे शिकवणारा चित्रपट

मुले रेल्वे फलाटांवरून गायब झाली असली तरी त्यांच्यासारख्या मुलांची परिस्थिती मात्र बदललेली नाही.

झिपऱ्या

झिपऱ्या

कादंबरी ते चित्रपट हा प्रवासच तसा अवघड आहे. कादंबरी जर काही वर्षांपूर्वीची असेल तर त्यातला विषय पेलतानाची आव्हाने वेगळी असतात. कित्येकदा त्याचा गाभा हा कु ठल्याही काळाशी जोडून घेणारा असल्या कारणाने समाजातील स्थित्यंतराचे प्रतिबिंबही त्यात उमटते. म्हणूनच असे चित्रपट महत्त्वाचे ठरतात. ज्येष्ठ साहित्यिक अरुण साधू यांच्या ‘झिपऱ्या’ या कादंबरीवरील चित्रपटाच्या बाबतीतही तेच म्हणता येईल. रेल्वे फलाटांवर बूटपॉलिश करून उदरनिर्वाह करणाऱ्या मुलांच्या आयुष्याचे चित्रण साधूंनी आपल्या कादंबरीत केले होते. आताशा ही मुले रेल्वे फलाटांवरून गायब झाली असली तरी त्यांच्यासारख्या मुलांची परिस्थिती मात्र बदललेली नाही. काळाच्या बदलाचा हा तुकडा बरोबरीने घेत साधूंनी त्यांच्या परिस्थितीचे जे वर्णन  केले आहे त्याच्याशी प्रामाणिक राहत सकारात्मकतेने बदल घडू शकतो, हा विचार ‘झिपऱ्या’ चित्रपट म्हणून अधोरेखित करतो.

‘झिपऱ्या’ कादंबरीतील काळ वेगळा असला तरी चित्रपट मात्र बऱ्यापैकी आजच्या काळात वावरतो. रेल्वे फलाटावर बूटपॉलिश करणारा झिपऱ्या (चिन्मय कांबळी), नाऱ्या (सक्षम कुलकर्णी), अस्लम (प्रथमेश परब) यांची गँग आणि त्यांचा उस्ताद पिंगळ्या (नचिकेत पूर्णपात्रे) यांची रोजची कथा. ही मुलं मेहनतीने कमावतात आणि त्यांचा उस्ताद म्हणून पिंगळ्या ही कमाई खातो, त्यांना मारतो, जास्त पैसे कमावण्यासाठी दबाव आणतो.. हा ताण झिपऱ्यालाच काय खरे म्हटले तर कोणालाच सहन होत नाही. पण पिंगळ्याची आणि लीलाची (अमृता सुभाष) आपल्या बहिणीची लगट झिपऱ्याला आणखीन त्रास देते. अखेर त्याच्या रागाचा पारा फुटतो आणि त्यात पिंगळ्याचा चुकून बळी जातो. योगायोगाने का होईना झिपऱ्यासाठी सगळ्याच गोष्टी बदलतात. तो गँगचा नवा उस्ताद होतो खरा.. मात्र त्यामुळे त्यांच्या आयुष्यात फारसा बदल होणार नसतो. झिपऱ्याच काय त्याच्यासारखी अनेक मुले मुंबईच्या गरीब वस्त्यांमधून वावरतायेत. रोजच्या जगण्यासाठी पैसे कसे मिळवायचे?, हा त्यांच्यासमोरचा मोठा प्रश्न आहे. संस्कार, चांगले-वाईट वागणे, शिक्षण या त्यानंतर येणाऱ्या गोष्टी. जिथे अरेला कारेचेच उत्तर मिळते तिथे त्यांची वागणूक त्या पलीकडे कशी जाणार? मग त्यांचे जगणे योग्य मार्गावर ठेवण्याची जबाबदारी अखेर त्यांच्या घरच्यांवर आहे. इथे झिपऱ्याची आई आणि बहीण दोघीही त्याचे आयुष्य वाया जाऊ नये म्हणून प्रयत्न करताना दिसतात. तरीही रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या एकापाठोपाठ एक घटनांनी झिपऱ्या वाईट मार्गावर येतोही. त्याच्या आयुष्यात कीर्तने मास्तरांमुळे (दीपक करंजीकर) शिक्षणही येते आणि अस्लममुळे गुन्हेगारीही येते. परिस्थितीच्या या दोन टोकांवरच्या कसरतीतून वाट काढण्याचा प्रयत्न करणारी अनेक मुले-मुली आजही आजूबाजूला आहेत त्यामुळे हा चित्रपट महत्त्वाचा ठरतो.

चित्रपट करताना झिपऱ्याचा आणि त्याच्या मित्रांचा प्रवास मध्यवर्ती ठेवत त्याच्या जगण्यातील सकारात्मकतेला दिग्दर्शक केदार वैद्य यांनी केंद्रस्थानी ठेवले आहे. झोपडपट्टीत राहणारी, आपल्या आजूबाजूला रेल्वेत काही विकण्यापासून छोटय़ा-मोठय़ा हॉटेलमध्ये काम करणारी अशी अनेक मुले पांढरपेशा समाजाच्या दृष्टीने चोरच ठरतात. आईवडिलांनी जन्माला घालून वाऱ्यावर सोडून दिलीत, अशाच विचारांनी भिकारी म्हणूनच त्यांची हेटाळणी केली जाते. ही हेटाळणी सातत्याने त्यांच्या वाटय़ाला येत राहिली तर त्यांना चांगल्या मार्गाने पुढे जावेसे वाटणारच नाही. त्यांचा हेतू कितीही चांगला असला तरी त्याला अशा अनेक कृतींमधून हरताळच फासला जातो. अशा वेळी कीर्तने मास्तरांसारखी एखादीच व्यक्ती त्यांना आधार देऊन जाते, त्यांच्या आयुष्याला दिशा देऊ शकते. आपल्या विचारांमधला, दृष्टिकोनातला एक बदल अशा अनेकांचे आयुष्य बदलू शकतो, इतका सहज विचार या चित्रपटातून पोहोचतो. अर्थात, बूटपॉलिश करणारी मुले आता आजूबाजूला तितकीशी दिसत नाही त्यामुळे आताच्या पिढीला त्यांचे संदर्भ सहज पटणार नाहीत मात्र बूटपॉलिशचा धंदा चालत नाही म्हणून मग रेल्वेत वस्तू वीक, पुस्तके वीक.. असा पर्याय ते स्वीकारतात. हा बदल दिग्दर्शकाने चित्रपटातून ठळकपणे जाणवून देत तो आजच्या काळाशी जोडून घेतला आहे. अ‍ॅक्शन, गाणी-नृत्य अशी व्यावसायिक फोडणी देत दिग्दर्शकाने ‘झिपऱ्या’ सर्वसमावेशक केला असल्याने कधीकधी त्यातले वास्तव त्याचत्याचपणात मोडते आहे की काय असे वाटते. चिन्मय कांबळी, सक्षम कुलकर्णी या दोघांनीही अप्रतिम काम केले आहे. तीच सहजता अमृता सुभाष यांच्या अभिनयात असल्याने लीला चित्रपटात भाव खाऊन जाते हे वेगळे सांगायला नको. प्रथमेशनेही आपल्या नेहमीच्या शैलीत अस्लमची भूमिका साकारली आहे. चांगले कलाकार, साधूंची कथा याला नेमक्या मांडणीची जोड देत दिग्दर्शक केदार वैद्य यांनी ‘झिपऱ्या’ प्रेक्षकांसमोर आणला आहे.

’ दिग्दर्शक – केदार वैद्य

’ कलाकार – चिन्मय कांबळी, सक्षम कुलकर्णी, अमृता सुभाष, प्रथमेश परब,  नचिकेत पूर्णपात्रे, दीपक करंजीकर, मीना नाईक.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 23, 2018 3:56 am

Web Title: ziprya marathi movie review by reshma raikwar
Next Stories
1 Top 10 : ‘बिग बॉस’च्या घरातील वादापासून १५ वर्षांनंतर परतलेल्या मुन्नाभाईपर्यंत, सर्वकाही एका क्लिकवर
2 बॉक्स ऑफिसला आजही माधुरीच्या ‘बकेट लिस्ट’ची मोहिनी…
3 VIDEO : आजोबा म्हणजे नातवाचा पहिला दोस्त… म्हणत ‘पुष्पक विमान’ प्रेक्षकांच्या भेटीला
Just Now!
X