अभिनेता टायगर श्रॉफ आणि अॅक्शन सीन हे जणू समीकरणचं झालं आहे. त्यामुळे आतापर्यंतच्या अनेक चित्रपटांमधील त्याचे अॅक्शन सीन चर्चिले गेले आहेत. टायगर लवकरच ‘बागी 3’ या चित्रपटात झळकणार आहे. अलिकडेच या चित्रपटाचा धमाकेदार अॅक्शन सीन्सने भरलेला ट्रेलर प्रदर्शित झाला. हा ट्रेलर पाहिल्यानंतर यातील काही सीन हे व्हीएफएक्सद्वारे तयार केल्याचं म्हटलं जात आहे. परंतु या चित्रपटात व्हीएफएक्सचा भरणा केला नसून चित्रपटातील दृश्य खरी वाटावित यासाठी तब्बल ४०० स्फोटकांचा वापर केला आहे.

या चित्रपटामध्ये तब्बल ४०० स्फोटकांचा वापर करण्यात आला असून टायगरने काही अॅक्शन सीन स्वत: केले आहेत. यात त्याने कोणताही बॉडी डबलचा वापर केलेला नाही. मात्र या दृश्यांचं चित्रीकरण सुरु असताना चित्रपटाच्या टीमने सुरक्षेची पुरेपूर खबरदारी घेतली होती.

“चित्रपटातील सीन खरे वाटावेत म्हणून आम्ही व्हीएफएक्सचा वापर केला नव्हता. तर त्याऐवजी खरे स्फोटके वापरली होती. यात एका सीनसाठी आम्हाला ९० ते ९५ बॉम्बचा वापर करावा लागला होता. परंतु हे सीन करताना मनात एक भीती आणि चिंता कायम होती. कारण हे सगळे सीन टायगर स्वत: करत होता”, असं चित्रपटाच्या दिग्दर्शकांनी सांगितलं.

पाहा : Dabboo Ratnani 2020 Calendar : अभिनेत्रींचे बोल्ड फोटोशूट

 आमच्या संपूर्ण टीममध्ये जवळपास ४०० स्फोट करण्यात आले. तसंच या साऱ्या सीनचं लाइव्ह चित्रीकरण करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे टायगरने उणे तापमानात हे सारं चित्रीकरण केलं आहे, असं श्रद्धा म्हणाली.

दरम्यान, ‘बागी’ हा चित्रपट २०१६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात श्रद्धा कपूर आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन सब्बीर खानने केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बागी २’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर २५३ कोटींची कमाई केली होती. या भागात दिशा पटाणी आणि टायगर मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटालाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे साहजिकच टायगरच्या आगामी ‘बागी ३’कडूनही प्रेक्षकांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. ‘बागी ३’मध्ये पुन्हा श्रद्धा आणि टायगरची केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे. ‘बागी ३’ हा चित्रपट ६ मार्च २०२० ला प्रदर्शित होणार आहे.