‘हा माझा नाही, माझ्यातल्या सरस्वतीच्या अंशाचा सन्मान!’, अशी भावना ज्येष्ठ नाटककार सुरेश खरे यांनी मानाचि या मालिका-नाटक-चित्रपट लेखक संघटनेच्या नवव्या वर्धापनदिन सोहळ्यात व्यक्त केली. या वर्धापनदिनाच्या निमित्ताने आयोजित ‘लेखक सन्मान संध्या’ सोहळ्यात लेखन कारकिर्दीतील योगदानासाठी सुरेश खरे यांना सन्मानित करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतवर्षीचे कारकीर्द सन्मान विजेते ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर, अॅड-गुरू भरत दाभोळकर, ‘मानाचि’चे अध्यक्ष विवेक आपटे आणि पुरुषोत्तम बेर्डे यांच्या हस्ते सुरेश खरे यांना शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. शिवाजी मंदिर नाट्यगृहात मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या सोहळ्यात मालिका, नाटक, चित्रपटांच्या प्रशंसनीय लेखनासाठी राकेश सारंग, अनिल पवार, अदिती मारणकर, कौस्तुभ देशपांडे, स्वप्निल जाधव, सचिन जाधव, क्षितिज पटवर्धन आणि नितीन सुपेकर यांचा सन्मान करण्यात आला. त्याबरोबरच अन्य क्षेत्रातल्या प्रशंसनीय लेखनाबद्दल, ज्येष्ठ नाट्यसमीक्षक रवींद्र पाथरे, गेली २५ हून अधिक वर्षे ‘अर्थ आणि बँकिंग’ सदर लिहिणारे राजीव जोशी, गणेशोत्सव देखाव्यांच्या लेखनासाठी विजय कदम यांनाही सन्मानित करण्यात आले. मानाचिच्या वाटचालीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गणेश गारगोटे आणि उमेश ओमाशे यांचाही सन्मान करण्यात आला. आशिष पाथरे यांच्या खुसखुशीत निवेदनाने ही सन्मान संध्या रंगली.

हेही वाचा >>>बेपत्ता गुरुचरण सिंगच्या आर्थिक परिस्थितीबद्दल त्याचे वडील म्हणाले, “माझं वय झालं आहे, त्यामुळे…”

मानाचि लेखक संघटनेने आयोजित केलेल्या उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीतील पाच एकांकिकांचं सादरीकरणही यावेळी करण्यात आलं. नवीन लेखकांना प्रोत्साहन मिळावं, नवनवीन लेखक लिहिते व्हावेत या उद्देशाने मानाचि गेली नऊ वर्ष विविध शिबिरं, परिसंवाद, आणि मार्गदर्शक चर्चासत्रांचे आयोजन करत आली आहे. त्याच उद्देशाने यंदा उत्स्फूर्त एकांकिका स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. महाराष्ट्रभरातून १४ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. संहिता क्रिएशन्स मुंबईच्या, ‘१४ इंचाचा वनवास’ या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत लेखन, दिग्दर्शन, अभिनेता, संगीत व सर्वोत्कृष्ट कथाविस्तार या पारितोषिकांवर मोहर उमटवली. तर बीएमसीसी पुणे यांनी सादर केलेल्या ‘अ टेल ऑफ टू’ या एकांकिकेने दुसरा क्रमांक पटकावत, लेखन, दिग्दर्शन, प्रकाश योजना, नेपथ्य, रंगभूषा अशी पारितोषिकं पटकावली. गिरीश ओक, ईला भाटे, विश्वास सोहनी, हेमंत भालेकर व शिल्पा नवलकर यांनी परीक्षक म्हणून जबाबदारी सांभाळली. या वेळी उत्स्फूर्त एकांकिका या नाट्यप्रकाराचे जनक सुहास कामत, आणि ज्येष्ठ रंगकर्मी प्रकाश बुद्धीसागर व प्रमोद लिमये यांचा प्रदीर्घ नाट्यसेवेबद्दल कृतज्ञता सत्कार करण्यात आला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 9th anniversary of manachi organization amy