रेश्मा राईकवार
चरित्रपटातून नेमके काय सांगायचे आहे हा उद्देश स्पष्ट असला की ती कोण्या एका व्यक्तीची गाथा उरत नाही. त्या व्यक्तीच्या वैयक्तिक संघर्षांबरोबरच इतिहासाची पानेही नव्याने चाळली जातात. एखाद्या व्यक्तीचे कर्तृत्व मांडताना त्याच्यातील माणूसपणही दुर्लक्षित करून चालत नाही. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा आयुष्यपट उलगडताना त्यांच्या व्यक्तित्वाचा सर्वंकष वेध घेण्याचा प्रयत्न लेखक – दिग्दर्शक – अभिनेता रणदीप हुडा याने ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ या चित्रपटातून केला आहे. ते करत असतानाच आजच्या काळातील संदर्भ लक्षात घेत त्यांचा हिंदुत्वाचा विचार नेमका काय होता हे ठाशीवपणे समोर ठेवण्याचे त्याचे धाडसही कौतुकास्पद म्हणायला हवे. 

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा आयुष्यपट लक्षात घेता तो तीन तासांच्या चित्रपटांतून उलगडणे हे प्रचंड मोठे आव्हान आहे. पण वर म्हटल्याप्रमाणे आपल्याला या चरित्रपटातून लोकांपर्यंत त्यांच्या व्यक्तित्वाचे पदर उलगडून दाखवत असतानाच नेमकेपणाने काय सांगायचे आहे याची कल्पना लेखक – दिग्दर्शकाला असेल तर हे आव्हान काही प्रमाणात सुकर होते. इथे लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही जबाबदाऱ्या रणदीप हुडा यानेच घेतल्या असल्याने पटकथा आणि त्याची पडद्यावरची मांडणी यात सुसूत्रताही आहे आणि स्पष्टताही आहे. देशाला स्वातंत्र्य मिळायला हवे, ब्रिटिशांच्या गुलामीतून आपल्या लोकांची सुटका व्हायला हवी हा विचार त्याकाळी अनेक घराघरांतून तेवत होता. तो सावरकर बंधूंच्या मनातही होताच. सातत्याने ब्रिटिश अधिकाऱ्यांकडून लोकांवर होणारे जुलूम या विचाराला अधिक धारदार करत होते. छोटय़ा विनायकाच्या मनातही तो विचार तळपत होता. त्यात गावागावांत आलेली प्लेगची साथ आणि त्याकाळी ब्रिटिशांनी ज्या अमानुष पद्धतीने या साथीतही लोकांना नागवले ते पाहता स्वातंत्र्याचा आणि त्यातही सशस्त्र क्रांतीचा विचार छोटय़ा विनायकच्या मनात अगदी दृढ होत गेला. सशस्त्र क्रांतीसाठी लहानपणीच थोरले बंधू बाबाराव यांच्या मदतीने केलेली अभिनव भारतची स्थापना, शिष्यवृत्ती मिळवत फग्र्युसन महाविद्यालयात घेतलेला प्रवेश आणि तिथून विलायतेला वकिलीचे पदवी शिक्षण घेण्यासाठी धडपडणाऱ्या सावरकरांपासून ही गोष्ट सुरू होते. मग लोकमान्य टिळकांची भेट, लंडनमध्ये शिक्षणासाठी पोहोचल्यानंतर श्यामजी वर्माबरोबर इंडिया हाऊसच्या कार्यात घेतलेला सहभाग, मदनलाल धिंग्रांबरोबर झालेली भेट हे सगळे दाखवत असताना त्यांची मूलभूत विचारबैठक किती पक्की होती आणि स्वातंत्र्याच्या कार्यासाठी धर्म-नीतीनियम यांची चौकट पक्की ठेवतानाच करावे लागलेले अनेक बदल अशा बारीकसारीक गोष्टी दिग्दर्शकाने यात मांडल्या आहेत. इथे त्यांचा धर्माचा विचार आपल्याला समजतो. गांधीजींबरोबरच्या पहिल्या भेटीतच देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीवरच आपला विश्वास असल्याचे त्यांनी ठणकावून सांगणे याची मांडणी करतानाच आज सावरकर विरुद्ध गांधी हे रंगवले जाणारे चित्र कसे एकांगी आहे  हेही दिग्दर्शकाने दाखवून दिले आहे.

What Mahesh Manjrekar Said About Veer Savarkar Film
Exclusive : ‘वीर सावरकर’ चित्रपट का सोडला? अखेर महेश मांजरेकरांनी सांगितलं कारण, म्हणाले, “रणदीप हुड्डाने…”
raj thackeray amit shah (
भाजपाने मनसेला नेमकी काय ऑफर दिलेली? राज ठाकरे म्हणाले, “त्यांनी मला सांगितलं…”
Mukta Barve danced with Laxmikant berde in the film Khatyal Sasu Nathal Sun
लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर जबरदस्त नाचली होती मुक्ता बर्वे, अवघ्या चार वर्षांची असताना झळकली होती ‘या’ लोकप्रिय चित्रपटात
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’

हेही वाचा >>>पाच वर्षांपूर्वी चार्टर्ड अकाउंटंटशी केलं अरेंज मॅरेज, गर्भपातानंतर आता ४१ व्या वर्षी आई झाली अभिनेत्री; बाळाचं नाव सांगत म्हणाली…

एकाच वेळी अनेक गोष्टी सांगण्याच्या प्रयत्नांत चित्रपट लांबलचकही झाला आहे आणि तो कुठल्याही एका विचारावर स्थिर होऊ देत नाही हेही तितकेच खरे. वर उल्लेख केल्याप्रमाणे सावरकरांचा संघर्ष, त्यांची जडणघडण मांडतानाच देशभरात आजूबाजूला क्रांतीचा विचार कसा बळकट होत गेला याचे चित्रण करतानाच चाफेकर बंधू, खुदीराम बोस अशा कित्येक क्रांतिकारकांच्या उपकथा, त्यांचे चेहरे आपल्यासमोर येत जातात. पूर्वार्धातील बराचसा भाग हा अनेकानेक व्यक्तिरेखा, संदर्भाचे मिश्रण यांची गुंतागुंत असलेला आहे. काही प्रमाणात त्यातूनही प्रत्येक घटनेतून सावरकरांचे विचार सातत्याने मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केलेला असला तरी काळ-घटना यांची सांगड घालत वेगाने पुढे जाणारे चित्रण पाहताना आपली दमछाक होते. त्यामुळे अनेकदा सावरकरांचे म्हणणे समजून घेतानाही अडथळे येतात. जे दिसते ते समजून घेण्याआधीच पुढचे दृश्य आपल्यासमोर येते. त्या तुलनेत उत्तरार्धात काळय़ा पाण्याची शिक्षा व्यतीत करतानाचा त्यांचा संघर्ष, वैयक्तिक कुटुंबाला झालेला त्रास, एकाच तुरुंगात राहूनही थोरल्या भावाची भेट घेण्यासाठी करावी लागलेली धडपड, तत्कालीन बंगाल प्रांताचे अधिकारी रेजिनाल्ड क्रॅडॉक यांच्याशी भेट झाल्यानंतर तुरुंगातील कैद्यांची दैनावस्था, तुरुंगाधिकारी बॅरीने चालवलेला जुलूम त्यांच्या लक्षात आणून देत सुधारणेसाठी केलेले प्रयत्न या सगळय़ा घटना एकेक आणि तपशीलवार पाहायला मिळतात. त्यांचा बुद्धिवाद, तर्कवादावरचा त्यांचा दृढ विश्वास आणि त्यांच्या तात्त्विक-वैचारिक बैठकीतून त्यांनी केलेला स्वातंत्र्य संग्राम मांडण्याच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या व्यक्तित्वाचे वरकरणी न दिसणारे पैलू उलगडत जातात. 

हेही वाचा >>>Video : “अतिशय घृणास्पद, लाजिरवाणा प्रकार”, खासगी कारचालकावर ‘वादळवाट’ फेम अदिती सारंगधर संतापली, म्हणाली…

सावरकरांचे साहित्य हा स्वतंत्र विषय आहे. त्यांच्या ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या पुस्तकाच्या जन्माची कथा, त्या पुस्तकाच्या प्रती भारतात पोहोचवून त्याच्या प्रसारासाठी केलेले प्रयत्न, भगतसिंगांना त्या पुस्तकातून मिळालेली प्रेरणा अशा कित्येक ज्ञात-अज्ञात गोष्टी आणि त्यांचे संदर्भ या चित्रपटात आहेत. अर्थात, हा चित्रपट पूर्णपणे वास्तव घटनांवर आधारित नाही, काही प्रमाणात लेखक-दिग्दर्शक म्हणून यात स्वातंत्र्यही घेण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यातील सत्यासत्यता तपासण्यावर जोर देण्याचा प्रयत्न करण्यात काहीच हशील उरत नाही. त्यापेक्षा एका वेगळय़ा दृष्टिकोनातून मांडलेला हा अभ्यासपूर्ण प्रयत्न म्हणून त्याकडे पाहणे अधिक उचित ठरेल. दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणूनही काही प्रसंग खूप सुंदर पद्धतीने चित्रपटात आले आहेत. मूल गेल्याचे समजल्यानंतरची तळमळ, मायभूमीत परतण्याची लागलेली आस, अंदमानच्या तुरुंगातील प्रसंग, घरी परतल्यावर जेवणाचे ताट पाहून मनात उठलेला कल्लोळ असे काही प्रसंग उत्तम जमले आहेत. त्याचबरोबर आत्ताच्या काळात सावरकरांवरून सुरू झालेला वाद, माफीवीर म्हणून त्यांची झालेली अवहेलना हे सगळे संदर्भ लक्षात घेऊन माफीनामा लिहिण्याचा निर्णय कुठल्या परिस्थितीत झाला त्याचे सविस्तर चित्रण चित्रपटात आहे. त्याचबरोबर जो या हिंदवी देशाची कदर करतो आहे तो हिंदू. जात-पात, धर्म या हिंदुत्वाच्या आड येऊ शकत नाही हा त्यांचा विचारही यात व्यापक पद्धतीने मांडला आहे. अभिनयाच्या बाबतीत हा चित्रपट सावरकरांवर बेतलेला असल्याने त्याचा मुख्य भार हा त्यांची भूमिका करणाऱ्या रणदीप हुडावरच होता. तो ती भूमिका तन-मनाने जगला आहे याची प्रचीती प्रत्येक दृश्यचौकट पाहताना येते. एका दूरदृष्टी लाभलेला विचारवेत्ता, स्वातंत्र्याची मशाल घेऊन त्यासाठी जगलेल्या क्रांतिवीराची धगधगती गोष्ट मांडताना सर्वसमावेशक दृष्टिकोनातून केलेली मांडणी यामुळे एकांगी आणि प्रचारकी चरित्रपटांच्या लाटेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ हा चित्रपट उजवा ठरतो.

स्वातंत्र्यवीर सावरकर

दिग्दर्शक – रणदीप हुडा, कलाकार – रणदीप हुडा, अमित सियाल, अंकिता लोखंडे, राजेश खेरा.