अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांची मुलगी आराध्याचा नुकताच सहावा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला सिनेसृष्टीतील अनेक कलाकार आपल्या मुलांना घेऊन पोहोचले होते. बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुखसुद्धा या पार्टीला अब्रामसोबत उपस्थित होता. या पार्टीचे काही फोटो अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यातूनच एक गमतीशीर बाब समोर आली आहे. अब्राम हा जेव्हा कधी बिग बींना टीव्हीवर पाहतो तेव्हा त्यांना शाहरुखचे बाबा असल्याचे समजतो, असं खुद्द किंग खानने सांगितलं.

बिग बींनी अब्रामसोबतचा एक फोटो पोस्ट करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘यांना भेटा..हा आहे जुनिअर शाहरुख खान..अबराम खान. आराध्याच्या पार्टीमध्ये त्याला बुड्ढी के बाल खायला हवं होतं. ‘बुड्ढी के बाल’ तयार होत असताना अब्राम एकटक पाहत होता आणि त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मी पाहत होते.’

बिग बींच्या या पोस्टला उत्तर देत शाहरुखने लिहिलं की, ‘धन्यवाद सर, हे क्षण अविस्मरणीय आहेत. तुम्हीच माझे बाबा आहात असंच अब्रामला वाटतं.’ अमिताभ बच्चन हेच आपले आजोबा आहेत असं अब्रामला वाटण्याचे कारण म्हणजे ‘कभी खुशी कभी गम’ हा चित्रपट. या चित्रपटात बिग बींनी शाहरुखच्या वडिलांची भूमिका साकारलेली. हा चित्रपट पाहिल्यापासून अब्राम त्यांनाच आजोबा असल्याचं समजू लागला आहे. अब्रामच्या या निरागसपणाचं बिग बींनाही नक्कीच अप्रूप वाटलं असावं.