दिग्दर्शकाच्या खुर्चीत बसावं ही महत्त्वाकांक्षा प्रत्येक रंगकर्मीला असतेच. खूप कमी जण या स्वप्नांचा पाठलाग करीत ‘कॅप्टन ऑफ द शिप’ होतात. नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तीनही माध्यमांत लिलया वावर असणारे हरहुन्नरी ज्येष्ठ अभिनेते अरुण नलावडे यांनी केवळ अभिनयापुरते सीमित न राहता दिग्दर्शनातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या दिग्दर्शनाचा अनोखा पैलू ‘शरयु आर्ट प्रॉडक्शन’ निर्मित ‘ताटवा’ या आगामी मराठी चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. अरुण नलावडे ‘ताटवा’ चित्रपटाच्या दिग्दर्शनासोबत यात शिल्पकाराची वेगळी भूमिका साकारत आहेत. त्यामुळे ते प्रेक्षकांना अभिनेता आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिकेत दिसतील.

डॉ. शरयु पाझारे निर्मित ‘ताटवा’ या चित्रपटाची कथा समाजातील विषमतेवर भाष्य करत पाथरवट समाजातील होतकरू मुलीचा जीवनप्रवास रेखाटणारी आहे. या मुलीला शिल्पकलेचे प्रशिक्षण देणाऱ्या शिल्पकाराच्या भूमिकेत अरुण नलावडे दिसतील. संजय शेजवळ व गौरी कोंगे ही नवी जोडी या चित्रपटातून पदार्पण करतेय.

Riteish Deshmukh post for brother father in law
आमदार भावाच्या सासऱ्यांसाठी रितेश देशमुखची खास पोस्ट, वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा
Crew actor Trupti Khamkar says was not given any lines
१२ तासांचं काम अर्ध्या तासात…, मराठमोळ्या तृप्ती खामकरने सांगितला ‘क्रू’च्या सेटवरचा अनुभव; म्हणाली, “बाजूला उभे राहून…”
amruta khanvilkar
‘नवनव्या भूमिकांचे आव्हान स्वीकारण्यात आनंद’
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर

या चित्रपटाविषयी अरुण नलावडे म्हणाले की, सुरुवातीला मी या चित्रपटात फक्त अभिनय करणार होतो. परंतु निर्मात्या डॉ. शरयु पाझारे यांनी, ‘तुम्हीच या सिनेमाचे दिग्दर्शन करणार का?’ असे विचारले. विषयात नाविन्य असल्याने मी ‘ताटवा’चे दिग्दर्शन करण्यास होकार दिला. ‘ताटवा’ म्हणजे कुंपण भेदून जाणे’, शीर्षकाप्रमाणे या चित्रपटात पाथरवट समाजातील मुलगी तिच्या हुशारीने पुढे जात समाजासाठी आदर्श निर्माण करते. मनाशी ठरवलं तर एखादी व्यक्ती आकाशाला गवसणी घालू शकते, असा प्रेरणादायी संदेश या चित्रपटातून देण्यात आला आहे. ‘ताटवा’ चित्रपटाचे आणखी एक वेगळेपण म्हणजे अनेक स्थानिक कलाकारांनी यात भूमिका केल्या आहेत. या चित्रपटात अभिनयासोबत दिग्दर्शनाचा अनुभव खूप छान होता, या शब्दांत अरुण नलावडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

व्यक्तिरेखा छोटी असो वा मोठी, भूमिकेत वेगळेपण आणून ती लक्षवेधी करण्यात अरुण यांची ख्याती आहे. आपल्या सशक्त अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या अरुण नलावडे यांना आता दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहणे नक्कीच उत्सुकतेचे ठरेल.