मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून श्रेयस तळपदे ओळखला जातो. आपल्या अभिनयाच्या जोरावर श्रेयसने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सध्या श्रेयस त्याचा आगामी चित्रपट ‘ही अनोखी गाठ’मुळे चर्चेत आहे. सध्या तो या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. मराठी बरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये श्रेयसने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.

सोशल मीडियावर श्रेयस मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो. दरम्यान, नुकतेच श्रेयसने लोकमत फिल्मीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने त्याच्या करिअरबरोबरच वैयक्तिक आय़ुष्याबाबतही अनेक खुलासे केले आहेत. मराठी आणि हिंदीनंतर लवकरच श्रेयस दाक्षिणात्य चित्रपटातही पदार्पण कणार आहे. या मुलाखतीत त्याने याबाबतचा मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा- “गेल्या ३३ वर्षांत मी कधीच…” कतरिनाबरोबरच्या नात्याबाबत विकी कौशलने पहिल्यांदाच केले भाष्य, म्हणाला, “आता पहिल्यासारखं…”

श्रेयस म्हणाला, मी सध्या साऊथचा चित्रपट करत आहे. कन्नडा प्रोडक्शन अंतर्गत हा चित्रपट तयार होत आहे. या चित्रपटात काही तेलगू, कन्नड व काही तमिळ कलाकार आहेत. येत्या पावसाळ्यात हा चित्रपट प्रदर्शित होईल. श्रेयसने ‘पुष्पा’ चित्रपटातील अल्लू अर्जुनने साकारलेल्या ‘पुष्पा’ या भूमिकेला हिंदी व्हर्जनसाठी आवाज दिला होता. श्रेयसच्या या कामाचे खूप कौतुक झाले होते. आता लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दुसऱ्या भागामध्येही पुष्पा या भूमिकेसाठी आपल्याला श्रेयस तळपदेचा आवाज ऐकू येणार आहे.

श्रेयसच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आतापर्यंत मालिका, नाटक, चित्रपट यांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचे मनोरंजन करीत आला आहे. मराठी बरोबरच बॉलीवूडमध्येही त्याने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘ओम शांती ओम’, ‘हाऊसफुल्ल २’, ‘इक्बाल’ यांसारख्या हिंदी चित्रपटांमधील त्याच्या भूमिका चांगल्याच गाजल्या.

हेही वाचा- जेव्हा संजय दत्त व सलमान खान यांना घेऊन बनणार होती एक गे लव्हस्टोरी…; किस्सा जाणून घ्या

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून त्याने मराठी टेलिव्हिजनसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. आता त्याचा ‘ ही अनोखी गाठ’ हा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात श्रेयसबरोबर गौरी इंगवले, ऋषी सक्सेना, शरद पोंक्षे, सुहास जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.