सोनी मराठी वाहिनीवरील ‘कोण होणार करोडपती’ हा बहुचर्चित कार्यक्रम ६ जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमातून सामान्य माणसाला आपल्या ज्ञानाच्या जोरावर करोडपती होण्याची संधी मिळत असते. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाला संपूर्ण महाराष्ट्रातून चांगला प्रतिसाद मिळतो. गेल्यावर्षी या कार्यक्रमाच्या पर्वात अनेक ज्ञानी स्पर्धक सहभागी झाले होते आणि मोठी रक्कम त्यांनी जिंकली होती. यावर्षी देखील संपूर्ण महाराष्ट्रातून उत्तम स्पर्धक सहभागी होणार आहेत.

‘आता आली आहे आपली वेळ, ज्ञान आणि मनोरंजन यांचा अद्भुत खेळ’, असे या वेळच्या पर्वाचं ब्रीदवाक्य आहे. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाच्या पर्वात यंदा ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा, प्रसिद्ध अभिनेत्री काजोल, प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्यासारखे अनेक मान्यवर उपस्थितीत राहणार आहेत. सामान्य माणसानं आपल्या ज्ञानाच्या बळावर पैसे जिंकून आपली स्वप्नपूर्ती करावी, हाच या कार्यक्रमाचा हेतू आहे. विविध क्षेत्रातले आणि वेगवेगळ्या वयोगटातले स्पर्धक यंदा या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यावेळी ज्ञान आणि मनोरंजनाचा अनोखा मेळ पाहता येणार आहे.

“स्पॉटलाइट बंद करा, मला त्रास…” गायक ‘केके’ अखेरच्या क्षणी नेमकं काय म्हणाला होता?

‘कोण होणार करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुन्हा एकदा प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. या पर्वात बहुमताचा कौल, व्हिडिओ अ फ्रेंड आणि बदली प्रश्न या तीन लाइफलाइन्स असणार आहेत. बदली प्रश्न या लाइफलाइनमध्ये एखाद्या प्रश्नाच्या उत्तराबाबत स्पर्धकाला आत्मविश्वास नसेल तर बदली प्रश्न ही लाईफलाईन वापरून प्रश्न बदलू शकतो.

या कार्यक्रमाची घोषणा झाल्यापासून ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाविषयी प्रेक्षकांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे. यंदा संपूर्ण महाराष्ट्रातून ६ लाखांपेक्षा अधिक नोंदणी झाल्या आहेत. या वेळी प्रेक्षकांच्या ज्ञानवृद्धीबरोबरच त्यांचं दर्जेदार मनोरंजन करण्याचाही कार्यक्रमाचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर यंदाही समाजाच्या कल्याणासाठी झटणाऱ्या सामान्यांमधल्या असामान्य व्यक्तींची भेट ‘कोण होणार करोडपती’मध्ये होणार आहे. दर शनिवारच्या भागात ही मंडळी सहभागी होणार आहेत.

‘कोण होणार करोडपती’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला, तारीखही ठरली

गेल्यावर्षी नाना पाटेकर, आनंद शिंदे, यजुर्वेंद्र महाजन, मनोज वाजपेयी, सयाजी शिंदे , मेधा पाटकर, सोनाली कुलकर्णी, कनिका राणे यांसारखी मंडळी कर्मवीर विशेष भागात सहभागी झाली होती. या पर्वातही निरनिराळ्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना बोलवण्यात येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना दर आठवड्याला रंगतदार भाग बघायला मिळणार आहेत. त्याचबरोबर या पर्वात १८ वर्षांची एक तरुण मुलगी आणि ७० वर्षांची एक व्यक्ती देखील सहभागी झाली आहे. त्यासोबतच डॉक्टर , पोलीस उपनिरीक्षक ,महिला बस चालक, स्टँडअप कॉमेडियन , एमपीएसी किंवा यूपीएससी पास झालेले विद्यार्थी, आर्मी ऑफिसर , फॉरेस्ट ऑफिसर आणि अगदी रेडिओ अनाऊन्सरप्रमाणे इतर स्पर्धकही सहभागी होणार आहेत.