‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाला दिवसेंदिवस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून (मनसे) होणारा वाढता विरोध पाहता निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने मुंबई पोलिसांकडे धाव घेतली आहे. करणने मंगळवारी बॉलीवूडमधील काही मंडळींसह मुंबई पोलिस उपायुक्त अशोक दुधे यांची भेट घेऊन सुरक्षा पुरविण्याची मागणी केली. मुंबई पोलिसांनीही करण जोहरची ही मागणी मान्य केली आहे. यावेळी फिल्म अँड टेलिव्हिजन प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष मुकेश भट्ट, फॉक्स स्टार इंडियाचे सीईओ विजय सिंह, मामि फिल्म फेस्टिव्हलच्या अनुपमा चोप्रा, निर्माते सिद्धार्थ रॉय कपूरही यावेळी उपस्थित होते. दरम्यान, या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना मुकेश भट्ट यांनी मनसेला शांततेच्या मार्गाने जाण्याचे आवाहन केले. मनसे मला भावासारखी आहे. मी माझ्या भावाला विनंती करतो की, त्याने शांततेच्या मार्गाने जावे, असे भट्ट यांनी म्हटले.

पाकिस्तानी कलाकाराला चित्रपटात स्थान दिल्याने गेल्या काही दिवसांपासून वादाच्या भोव-यात सापडलेल्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाला प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईलमध्ये उत्तर देण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना दिला आहे. सिनेनिर्माता करण जोहर याच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटाला ‘सेन्ट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन’ने यू/ए प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे हा चित्रपट २८ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. उरी हल्ल्यानंतर मनसेने पाकिस्तान आणि पाकिस्तानी कलाकारांविरोधात कठोर भूमिका स्वीकारली आहे. मनसेने मल्टिप्लेक्स चालकांकडे  ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट प्रदर्शित न करण्याची मागणी केली आहे. असे न केल्यास मनसे स्टाईलमध्ये विरोधाला सामोरे जाण्याचाही इशारा देण्यात आला आहे. तसेच,‘मल्टिप्लेक्सच्या काचा खूप महागड्या असतात हे विसरु नका’ या शब्दांमध्ये अमेय खोपकर यांनी मल्टिप्लेक्स चालकांना इशारा दिला.