आपल्या आवडत्या कलाकाराशी, सेलिब्रिटीशी भेटण्याची, बोलण्याची, एक झलक पाहण्याची इच्छा प्रत्येक चाहत्याची असते. सोशल मीडियामुळे हे सेलिब्रिटी त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात सहजपणे राहू शकतात. पण अचानक जर एखाद्या सेलिब्रिटीचा मोबाईल नंबरच तुम्हाला मिळाला तर? तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल ना? अभिनेता अजय देवगणने त्याची पत्नी आणि अभिनेत्री काजोलचा मोबाईल नंबर ट्विटरवर शेअर केला आहे.

‘काजोल देशाबाहेर आहे. तिच्या या व्हॉट्स अॅप क्रमांवरून तिच्याशी समन्वय साधा,’ असं ट्विट अजयने केलं. या ट्विटमध्ये त्याने एक मोबाईल नंबरसुद्धा लिहिला आहे. अजयने चक्क काजोलचा नंबर शेअर केल्याने सर्वचजण अवाक् झाले आहेत. काहींनी तर काजोलला मेसेज केल्याचा स्क्रिनशॉटसुद्धा अजयला रिप्लाय देताना टाकला आहे.

अजयच्या या ट्विटवरून अनेकांनी तर त्याचीच खिल्ली उडवली आहे. त्याने केलेल्या ‘विमल पान मसाला’च्या जाहिरातीवरूनही त्याला चिडवण्यात येत आहे. तर अजय झोपेत आहेस का, असा सवाल एका युजरने केला आहे. दरम्यान अजयने शेअर केलेला काजोलचा हा नंबर ट्रू कॉलर आणि व्हॉट्सअॅप या अॅपवर तपासल्यास तो नंबर खरा असल्याचं आढळलं आहे. त्यामुळे आता अजयचं ट्विटर अकाऊंट हॅक झाला की त्याने चुकून हा नंबर शेअर केला की यामागे एखादा पब्लिसिटी स्टंट आहे असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरं आता स्वत: अजयच देऊ शकेल.