बॉलीवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी वोडाफोन एसएमएस सर्व्हिसमध्ये समस्या येत असल्याचे ट्विट केले होते. यामुळे टेलिकॉम ऑपरेटर वोडाफोन कंपनीवर लाजिरवाणी परिस्थिती ओढावल्यासारखे झाले होते. अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर वोडाफोनवरून एसएमएस जात नसल्याचे  सांगितले. पण, यात मजेशीर गोष्ट तेव्हा घडली जेव्हा बिग बींचे ट्विट वाचून रिलायन्स जिओने त्यांना सिम डिलीव्हरी करण्याची आणि लगेच ते अॅक्टिवेट करण्याचीही ऑफर दिली.

[jwplayer xR0aWhOb]

अमिताभ बच्चन यांनी सोमवारी संध्याकाळी ट्विट केले की, वोडाफोन सर्विसमध्ये अडथळा येत आहे. पाठवलेले सर्व मेसेज समोरच्यापर्यंत पोहचत नाही आहेत. मला मेसेज येत आहेत पण माझ्याकडून कोणालाच मेसेज जात नाहीये. वोडाफोनची प्रतिस्पर्धी असलेल्या जिओने लगेचच या संधीचा फायदा घेतला. त्यांनी अमिताभ यांना जिओ सिमची ऑफर दिली. रिलायन्स जिओने लिहले की, सर, तुमच्या घरी जिओ सिम पाठवण्यास आम्हाला आवडेल. या सिमला आधार कार्डवर अवलंबून असलेल्या eKYC सर्विस अंतर्गत लगेच अॅक्टिवेट करण्यात येईल.

दरम्यान, अमिताभ यांनी ट्विट केल्यानंतर अर्ध्या तासातच त्यांना वोडाफोनमधून मेसेज पाठवण्यात येत असलेला अडथळा दूर झाला. त्यांनी याची माहिती ट्विट करून दिली. अमिताभ यांनी ट्विटवर लिहिले की, वोडाफोन प्रोब्लेम सोल्व्हड…. धन्यवाद…. आता एसएमएस जात आहेत. काही महिन्यांपूर्वीच मुकेश अंबांनी यांची मालकी असलेल्या रिलायन्स जिओने या कंपनीचे सिमकार्ड घरपोच केले जातील अशी घोषणा केली होती. रिलायन्स जिओ सध्या ३१ मार्च २०१७ पर्यंत जिओ हॅप्पी न्यू ईयर ऑफर अंतर्गत मोफत सुविधा देत आहे. या सुविधेअंतर्गत वॉइस कॉलिंग, व्हिडिओ कॉलिंग, एसएमएस, ४जी आणि जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन विनामूल्य उपलब्ध आहेत.