नीलेश अडसूळ

महाराष्ट्रातील बहुतांशी लोककला किंवा लोकगीते हे लोकांच्या रंजन आणि प्रबोधनासाठी असल्याने त्याला बंदिस्तता नसते. जे सादर करायचे ते अगदी पारावर, शेतात, रस्त्यात, कुठेही. थोडक्यात मुक्तांगणात. शहरी माणसांना फार सोस नसेल लोककलेचा, परंतु ग्रामीण भागात आजही रसिकांचे मन रिझवण्याचे काम या लोककलाच करत आहेत. म्हणूनच चित्रपट आणि मालिका घराघरात पोहोचलेल्या असतानाही तमाशा, कीर्तन, भारुड यांसारखे कलाप्रकार अनुभवण्यासाठी लोक हजारोंच्या संख्येने जमतात आणि तासन्तास त्याची मजा घेतात कोणत्याही जाहिरातीविना.

हीच शेकडो वर्षांची परंपरा असलेली महाराष्ट्राची लोककला आणि ती प्रसवणारे लोककलावंत गेले आठ महिने उपासमारीचे जीवन जगत आहेत. हातातली कला बाजूला सारून अनेकांनी मोलमजुरी पत्करली. काहींनी घरदार गहाण ठेवले. हा तिढा आज सुटेल उद्या सुटेल या आशेवर बराच काळ काढला. ‘धरणीवानी सरकार माईला पाझर फुटेल’ असा अंधुकसा प्रकाश इथल्या प्रत्येकाच्या मनात होता. अखेर सरकारने मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. आता सगळं सुरळीत होणार म्हणून कलावंत सुखावले. पण बंद पाकिटाआड दडलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून सादरीकरण शक्य होणार नाही, असे समजताच त्यांच्या आशा पुन्हा मावळल्या आहेत. निम्म्याहून अधिक कलावंतांना असा काही मार्गदर्शक तत्त्वांचा फतवा निघाल्याचेही माहिती नाही. त्याच धारदारपणे आपली कला मांडण्याचे स्वप्न पाहणाऱ्या या कलावंतांनी आपले वास्तव मांडत एकच विनवणी केली ‘सरकारनं आता आमच्याकडं आईच्या नजरेनं पाहावं.. नाही तर जीव देण्याखेरीच पर्याय उरायचा नाही.’

बंदिस्त जागेत आणि मुक्त पटांगणात होणाऱ्या कार्यक्रमांबाबत मार्गदर्शक तत्त्वे सरकारने जाहीर केली खरी, पण त्यातून ना नाटक सुरू झाले ना लोककला. मिळाला तो केवळ दिलासा तोही क्षणाचा. जेजुरीत खंडोबाच्या पायरीवर बसून लोकांचे दु:ख हरावे यासाठी जागरण गोंधळ घालून देवाला विनवणी करणारे कैलास आणि रेणुका गेली कित्येक वर्ष याच व्यवसायावर उपजीविका करत आहेत. देवाच्या पायरीसोबतच दारोदारी जाऊन ते जागरण गोंधळ करतात. यासाठी त्यांना कुणी फारसे मानधन देत नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालेल इतकेच. परंतु गेल्या आठ महिन्यांत ते जेजुरीच्या बाहेरही पडलेले नाहीत. आज मंदिर सुरू झाले असले तरी अद्याप अशा विधींना आणि कार्यक्रमांना मज्जाव असल्याने देवाच्या दारात बसून कमावण्याचा मार्गही बंद आहे. रेणुका जेजुरीकर यांच्या आवाजाला गोडवा असल्याने ग्रामीण भागातून त्यांना रेकॉर्डिगच्या काही संधी येतात, पण एकूणच सगळीकडे ठणठण गोपाळ असल्याने सगळीच दारे बंद आहेत. ‘सरकारने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा मागमूसही आमच्यापर्यंत नाही. मुळात ग्रामीण भागात काय पोहोचते आणि काय नाही हाच चर्चेचा विषय ठरेल. जागरण गोंधळात जेमतेम पैसे घेऊन आम्ही कला सादर करतो. संपूर्ण ताफ्याचे पोट आम्हाला भरायचे असते. करोनामुळे आयुष्यात आलेली ही सगळ्यात वाईट वेळ आहे. मुलांचे पोट भरण्यासाठी गवंडीकाम, मजुरी, हमाली अशा नाना मार्गाकडे आम्ही वळलो. रोज घरी येताना उद्याची चिंता लागलेली असते. आमच्यावर आलेली ही बंदी उठेपर्यंत आम्ही राहतोय की जातोय अशी अवस्था आहे, असे वास्तव कैलास शेडगे मांडतात. राज्यातील विविध शक्तिपीठांच्या ठिकाणी असे हजारो कलावंत आज अन्नान्नदशेत जगत आहेत.

तमाशा ही केवळ लोककलेची पुस्तकी ओळख म्हणून पाहातो. प्रत्यक्षात आमच्या कलेविषयी आणि आमच्याविषयी कुणालाही आदर वाटत नाही, असे विधान तमाशासम्राट रघुवीर खेडकर यांनी केले. ‘मुळात मार्गदर्शक तत्त्वे सादर करताना सरकारने आम्हाला विश्वासात घेतले का, आमचे प्रश्न ऐकले का, लोककलेची रचना, आर्थिक स्थिती समजून घेतली का, मग कोणत्या अनुषंगाने नियम केले. तमाशा हा जत्रा-यात्रेत चालणारा कलाप्रकार आहे. अजून जत्रांनाच परवानगी नाही तर तमाशा कसा सुरू होईल. लोक तमाशाला येताना आनंद लुटायला येतात. ग्रामीण भागातील लोकांसाठी तो उत्सव असतो अशा वेळी आजूबाजूला खाद्यपदार्थाच्या गाडय़ा नको, गर्दी नको असे नियम केले तर कोण फिरकेल आमच्याकडे. व्यसनी पदार्थावरही बंदी आहे. परंतु गावाकडे अजून साक्षरता नाही, कष्टाची कामे करतात लोक त्यामुळे व्यसने सर्रास होतात. दारू, तंबाखू खाऊनच लोक आमच्यापुढे बसतात. आता ते खाऊन आलेत हे तपासत बसलो तर त्यातच दिवस सरून जाईल. अशा नियमात तमाशा सुरू केला तर लोक गोंधळ घालतील, राडे करतील. इथला रसिक याचा कधीही स्वीकार करणार नाही. आज एका वेळी हजारो माणसे जमतात. प्रत्येकात सहा फुटांचे अंतर ठेवण्याइतकी जागा उपलब्ध होणे शक्य नाही. मग परवानगी देऊन उपयोग काय झाला,’ असे अनेक प्रश्न आमच्यापुढे असल्याचे खेडकर सांगतात. शिवाय सरकार दाद देत नाही, भेटीगाठी घेतल्या तरी त्याचे निरसन होत नाही. मुळात इथल्या राजकारणी माणसांना केवळ सोयीनुसार लोककलावंत हवे असतात त्यामुळे आमच्या प्रश्नांवर ते काय मार्ग काढणार? आठ महिन्यांच्या काळात एका तरी नेत्याने लोककलावंतांचा उल्लेख केला नाही. पण उद्या जेव्हा कलाकार आत्महत्येचा पर्याय स्वीकारतील तेव्हा हेच राजकारणी त्यांच्या दारात मदत घेऊन येतील. पण त्या मदतीचा काहीही अर्थ उरणार नाही, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त के ल्या.

भक्ती परंपरेतून अध्यात्म आणि प्रबोधन यांचा मेळ साधणारे भारुड आणि कीर्तन हे दोन कलाप्रकार. पण दुर्दैवाने संप्रदायातल्या कलाकारांना कोणतीही शासन मदत मिळत नाही. कारण त्यांच्यापुढे कलाकार नाही तर संप्रदायाचा शिक्का लागलेला आहे. भारुड हा कलाप्रकार संप्रदायापलीकडे जाऊन देशभरात पोहोचवणारे भारुडकार निरंजन भाकरेही या करोनाच्या विळख्यात सापडलेले आहेत. दहा लोकांची उपजीविका ते याच व्यवसायातून भागवत असत. पण आज दारातली गाडी विकून उदरनिर्वाह करायची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. ‘गेल्या आठ महिन्यांत विविध ठिकाणांहून मदतीसाठी आमची नोंद घेतली, कुणी अर्ज आणले, कुणी सह्य़ा घेतल्या पण मदत काही कुणाची आली नाही. अनेकांकडे आज औषधाला पैसे नाहीत. त्यात असे जाचक नियम काढले तर आम्हाला आहे त्यापेक्षा चार पावले मागे जावे लागेल. मंडप, वस्तू यांचे निर्जंतुकीकरण करा हे म्हणणे सरकारला सोपे आहे, पण त्यासाठी लागणारा पैसा आणायचा कुठून. इथे कलावंतांची आवक मूठभर आहे. ग्रामीण जनजीवनही तसे हलाखीचेच त्यामुळे ते लक्षात घेऊन सरकारने नियम करायला हवे होते. जनजागृती व्हावी अशी अपेक्षा सरकार आमच्याकडून करते आहे, पण आम्हाला काय हवे हे कधी विचारले का,’ असा सवाल भाकरे यांनी केला आहे.

कीर्तनकार जरी प्रत्यक्ष कीर्तनातून मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून नसले तरी गायक, वादक आणि काही अंशी कीर्तनकारही कीर्तन करून आपली उपजीविका करत आहेत. गेल्या आठ महिन्यांत कीर्तन सेवा बंद झाली आणि कलावंतांपुढे पोटापाण्याचा प्रश्न भेडसावू लागला. याविषयी वारकरी संप्रदाय युवा मंचाचे अध्यक्ष अक्षयमहाराज भोसले सांगतात, ‘सरकारने लागू केलेले नियम पाहाता सध्या घडणाऱ्या शासकीय कार्यक्रमात ते पाळले जात आहेत का याचा आधी सरकारने विचार करावा. राजकारणी माणसांना नियमांचे बंधन नाही मग जे प्रबोधन करून लोकांना जागृत करत आहेत अशा सेवेकऱ्यांना मज्जाव का? सहा फुटांचे सामाजिक अंतर रस्त्यांवर, मॉलमध्ये राखले जात आहे का? नाहीच. मग जिथे लोकांच्या भावनेचा, श्रद्धेचा आणि प्रबोधनाचा प्रश्न आहे तिथे ही सक्ती कशासाठी? याउलट लोक अशा लोककलांना अधिक जाणीवपूर्वक ऐकतात, अनुभवतात. आम्ही जनजागृती केली तर करोनाकाळातील परिवर्तनाला गती येईल.’

कोकणात शंभरहून अधिक दशावतारी नाटक मंडळी आहेत. ज्यात हजारो कलाकार काम करतात. आधी करोनामुळे लागू झालेली टाळेबंदी आणि नंतर चक्रीवादळ यामुळे तुळशीच्या लग्नापासून सुरू होणारा दशावताराचा हंगाम पूर्णच थंडावला. करोनामुळे गावातील जत्रा स्थगित केल्याने तोही पर्याय बंद झाला. काहींनी शेतमजुरी तर काहींनी गणेशमूर्तीच्या कारखान्याची कास धरली. सध्या या कलाकारांना दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठीही वणवण फिरावे लागत आहे. यात ज्येष्ठ लोककलावंतांची आर्थिक स्थिती तर त्याहून बिकट आहे. सांस्कृतिक संचलनालयाकडून पेन्शन मिळण्यास विलंब लागत असल्याने त्यांना औषधपाणी तसेच दैनंदिन गरज भागवणे कठीण झाले आहे. प्राप्त परिस्थितीवर मार्ग काढत जून महिन्यात कोकणातील काही कलावंतांनी एकत्र येत ‘पेटारो दशावतरो’ हा ऑनलाइन दशावताराचा प्रयोग केला होता. यातून संकलित झालेल्या निधीतून कलाकारांना अर्थसाहाय्य करण्यात आले, मात्र असे ऑनलाइन प्रयोग करताना कमाईपेक्षा खर्चच जास्त होत असल्याने आयोजक प्रयोग करण्यास  कचरत आहेत. त्यात ग्रामीत भागात वारंवार वीज खंडित होणे, इंटरनेटचा कमी वेग अशा अनेक कारणांमुळे ऑनलाइन प्रयोग करणे खर्चीक असल्याचे लोक कलावंत दिनेश गोरे यांनी स्पष्ट केले.

नुकतेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिल्यावर सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात पावशी येथे ‘शंभुचे लग्न’ हा दशावतारी नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. अंतरनियमांचे पालन तसेच मुखपट्टय़ांचा वापर, त्या परिसराचे निर्जंतुकीकरण हे सुरक्षेचे उपाय योजत हा प्रयोग पार पडला. गेल्या महिन्याभरात कोकणात दशावतारी नाटकांचे दोन ते तीन प्रयोग झाले. मात्र त्यांना पाहिजे तसा प्रेक्षकवर्ग लाभला नसल्याचे ‘भवानी दशावतारा’चे ओमप्रकाश चव्हाण यांनी सांगितले. गावोगावी जत्रा सुरू होत नाही तोपर्यंत दशावताराचे प्रयोग पूर्ववत होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यात प्रत्यक्ष दशावताराचे प्रयोग करताना प्रेक्षक आणि कलाकार यांच्यात सामाजिक अंतर राखणे अडचणीचे ठरत आहे.या केवळ निवडक लोककला झाल्या. याउपर मराठवाडा, चंद्रपूर आणि राज्यातील नाना ठिकाणी सादर केल्या जाणाऱ्या शेकडो लोककला आणि त्यावर अवलंबून असणारी ३० हजारांहून अधिक कुटुंबं आहेत. ज्यांना पोट कसे भरायचे, हा प्रश्न सतावतो आहे. यातून मार्ग कधी निघेल हे सांगणे तसे कठीणच पण किमान त्यांची दखल सरकारदरबारी घेतली जावी एवढीच त्यांची आशा आहे.