सुट्टी आणि बालनाटय़ किंवा बालचित्रपट यांचं अतूट समीकरण पूर्वी पाहायला मिळायचं. त्या तुलनेत आता बालचित्रपटांची संख्या कमी झाली आहे. विशेषत: सुट्टीच्या काळात लहान मुलांना खास त्यांची कथा असलेले चित्रपट पाहायला मिळणं ही सध्या पर्वणी ठरते आहे. या पाश्र्वभूमीवर बाहेरगावहून मुंबईत येणाऱ्या एका खोडकर मुलाची अफलातून गोष्ट सांगणारा विजू माने दिग्दर्शित ‘मंकी बात’ हा चित्रपट या आठवडय़ात प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात गायक-संगीतकार अवधूत गुप्ते अभिनेता म्हणून लोकांसमोर येणार असून सहा वेगवेगळ्या रूपात ते पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने अवधूत गुप्ते आणि चित्रपटाचे दिग्दर्शक विजू माने यांनी ‘लोकसत्ता’कडे चित्रपटामागची भूमिका विशद केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘मंकी बात’ या चित्रपटात कृष्णासमान असलेल्या व्यक्तीच्या भूमिकेत अवधूत गुप्ते दिसणार आहेत. ही व्यक्ती या चित्रपटातील खोडकर नायक आर्यनच्या मागे सतत मार्गदर्शक म्हणून वावरत असते. अभिनय हा खरं म्हणजे माझा व्यवसाय नाही त्यामुळे मला अनेकदा अभिनयासाठी विचारणा होऊनही मी त्या नाकारल्या होत्या. ‘मंकी बात’साठी विजू मानेंनीही विचारणा केली तेव्हा त्यांनाही मी नकारच दिला होता. मात्र या चित्रपटाची कथा आणि ती भूमिका ऐकल्यानंतर कुठेतरी ज्या लहान मुलांनी मला आजवर इतकं प्रेम दिलं आहे त्यांच्यासाठी का होईना हे काम करावंसं वाटलं. खरं म्हणजे चित्रपट म्हटल्यावर टिपिकल एखादा नायक साकारण्याची माझी हौस काही यात पूर्ण झालेली नाही, असं अवधूत गुप्ते गमतीने सांगतात. कृष्णाची किंवा देवाची भूमिका म्हणून ती जास्त आकर्षक वाटली का? यावर भूमिकाही भूमिका असते. ती देवाची आहे किंवा काय असा विचार मी केला नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं. यातला जो मुलगा आहे आर्यन तो अतिशय खोडकर आहे. मुलं म्हटल्यावर ती खोडकर असतातच. त्यामुळे त्यांच्या खोडय़ांनी कितीही त्रास होत असला तरी त्या आपल्याला हव्याहव्याशा वाटतात. मात्र खटय़ाळपणा आणि दुसऱ्याला त्रासदायक ठरेल असा खोडकरपणा यातील सीमारेषा बऱ्याचदा धूसर असते. दुसऱ्याला जीवघेणा ठरेल असा प्रकार खोडय़ांच्या नावाखाली एखादा मुलगा करायला लागला तर त्याला लगाम घालावाच लागतो. अशा प्रसंगात तर देवही असेल तर तो गोंधळणारच.. आर्यनचा प्रवासही यात असाच दाखवला गेला आहे. त्याला लगाम घालण्याचं, त्याची चूक दाखवून देण्याचं काम मी या चित्रपटात माझ्या भूमिकेतून केलं आहे, असं त्यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Avadhoot gupte
First published on: 13-05-2018 at 01:58 IST