बॉलीवूडमधील नव्या दमाच्या कलाकारांना पुरस्कारांनी सन्मानित करायला हवे, त्यांना संधी द्यायला हवी. माझ्या आयुष्यात पुरस्कारांना काहीच महत्त्व उरलेलं नाही, असं मत बॉलीवूडचा दबंग सलमान खान याने व्यक्त केलं. ‘द इंडियन एक्स्प्रेस डॉट कॉम’शी बोलताना सलमान म्हणाला, जेव्हा दुसऱयांना पुरस्कार मिळतात तेव्हा मला खरंच खूप छान वाटतं. पण माझ्या आयुष्यात पुरस्कारांना मी महत्त्व देत नाही. मात्र, पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहायला मला आवडते कारण, अशा सोहळ्यांमुळे संपूर्ण इंडस्ट्री एकत्र येते. आपल्या वैयक्तिक आयुष्यात नेहमी व्यस्त असणाऱया आपल्या मित्रपरिवाराशी यानिमित्ताने भेट होते, असेही सलमान पुढे म्हणाला.

यापुढे एकाही पुरस्कार सोहळ्यात माझे नाव नामांकित केले जाऊ नये, अशी इच्छा देखील सलमान यावेळी व्यक्त केली. मला पुरस्कारासाठी नामांकित केले जाऊ नये. गेली २५ वर्षे मी या इंडस्ट्रीत आहे आणि आता नव्या पिढीला संधी देण्याची वेळ आली आहे. नव्या दमाच्या कलाकारांना इंडस्ट्रीतील जुन्या जाणत्यांनी प्रोत्साहन द्यायला हवे. मी पुरस्कार सोहळ्याला येईन, सादरीकरण करीन पण मला कोणताही पुरस्कार दिला जाऊ नये, अशी माझी मनापासून इच्छा असल्याचे सलमान यावेळी म्हणाला.