‘हाऊसफुल ४’मध्ये नाना पाटेकरांची जागा घेणार ‘बाहुबली’ फेम अभिनेता?

नानांच्या जागी कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.

nana patekar
'हाऊसफुल ४'मध्ये नाना पाटेकरांची जागा घेणार 'बाहुबली' फेम अभिनेता?

लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपांनंतर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना आगामी ‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातून काढता पाय घ्यावा लागला होता. २००८ साली ‘हॉर्न ओके प्लीज’ या चित्रपटाच्या सेटवर नानांनी असभ्य वर्तन केल्याचा आरोप अभिनेत्री तनुश्री दत्ताने केला. या आरोपांनंतर चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेल्या अक्षय कुमारनं ट्विट करत लैंगिक गैरवर्तणुकीसारखे गंभीर आरोप असलेल्या कोणत्याही व्यक्तीसोबत आपण काम करणार नसल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यामुळे नानांच्या जागी कोणत्या अभिनेत्याची वर्णी लागणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. ‘पिंकविला’ या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार नाना पाटेकर यांच्या जागी ‘बाहुबली’ फेम अभिनेता राणा डगुबत्ती झळकणार असल्याचं समजतंय.

‘हाऊसफुल ४’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी राणाशी यासंदर्भात चर्चा केली असून त्याने भूमिकेला होकार दिल्याचं कळतंय. राणाने सध्या फक्त तोंडी होकार कळवला असून चित्रपटाच्या करारावर अद्याप स्वाक्षरी करणे बाकी आहे. ही औपचारिकता पूर्ण होताच निर्मात्यांकडून राणाच्या भूमिकेबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल.

वाचा : हर्षवर्धन करतोय युवराज सिंगच्या एक्स गर्लफ्रेंडला डेट?

नाना पाटेकर यांच्या भूमिकेसाठी निर्मात्यांनी आधी अनिल कपूर आणि संजय दत्त यांचाही विचार केला होता. पण अखेर राणाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती समोर येत आहे. #MeToo मोहिमेअंतर्गत झालेल्या आरोपांनंतर ‘हाऊसफुल ४’च्या दिग्दर्शकपदावरून साजिद खाननेही माघार घेतली. त्यानंतर फरहाद सामजी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Bahubali fame rana daggubati replaces nana patekar in akshay kumar housefull

ताज्या बातम्या