बॉलीवूडच्या रुपेरी पडद्यावरील किंवा बॉलीवूड आणि दाक्षिणात्य चित्रपटांच्या जाहिरातीमधील ‘बोल्ड’नेस प्रेक्षकांना सवयीचा आणि सरावाचा झाला आहे. आता हे ‘बोल्ड’जाहिरातींचे वारे मराठी रंगभूमीवरही वाहू लागले आहेत. काही मराठी नाटकांच्या जाहिरातींमधून हा बोल्डपणा याआधीही व्यक्त झाला होता. आता आगामी ‘स्ट्रॉबेरी’ या नाटकाच्या जाहिरातीमधून ‘गूज ओठांनी ओठांना सांगायचे’ हा फंडा वापरण्यात आला असून ‘फेसबुक’, ‘यु टय़ूब’ या सोशल मीडियावरही नाटकाची ‘बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफूल’ जाहिरात करण्यात येत आहे.

मराठी रंगभूमीवर काही वर्षांपूर्वी सादर झालेल्या ‘काचेचा चंद्र’ या नाटकाच्या जाहिरातीची तेव्हा ‘बोल्ड’म्हणून प्रसिद्धी झाली होती. भावना आणि डॉ. श्रीराम लागू यांच्या नाटकात मुख्य भूमिका होत्या. डॉ. लागू यांनी भावना यांना खांद्यावर उचलून घेतले आहे अशी या नाटकाची जाहिरात करण्यात आली होती. त्या काळात मराठी नाटकाची ही जाहिरात नाटय़सृष्टीत चर्चेचा विषय ठरली होती. ‘सखाराम बाईंडर’ या नाटकाच्या जाहिरातीत निळू फुले यांनी लालन सारंग यांना आपल्या मांडीवर खेचून घेतले असून ते लालन सारंग यांच्या घशात दारू ओतत आहेत, असे दाखविण्यात आले होते. ‘प्रपोजल’, पांढरपेशी वेश्या’, ‘अ‍ॅग्रेसिव्ह’ या नाटकांच्या जाहिरातीही ‘बोल्ड’ठरल्या. ‘प्रपोजल’ नाटकामुळे नाटकांच्या जाहिरातीचा ‘पदर’ढळला असल्याची चर्चा तेव्हा नाटय़सृष्टीत रंगली होती.

case filed in Actor Aamir Khan deep fake tape case
अभिनेता आमिर खान डीपफेक चित्रफीतीप्रकरणी गुन्हा दाखल
Cyber cheater arrested from Madhya Pradesh who cheat music director
संगीत दिग्दर्शकाची सायबर फसवणूक करणाऱ्याला मध्य प्रदेशातून अटक, सायबर पोलिसांची कारवाई
The Kerala Story screening in church
‘लव्ह जिहाद’चं कारण देत विद्यार्थ्यांना दाखवला ‘द केरला स्टोरी’ चित्रपट; केरळच्या चर्चमधला प्रकार!
Loksatta Lokrang A Journey into Documentary Creation movies dramatist
 आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: ‘मला खूप भूक लागली होती…’

आता ‘स्ट्रॉबेरी’ या आगामी नाटकाच्या जाहिरातीमुळे हा ‘बोल्ड’ आणि ‘ब्युटिफूल’पणा पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘का रे दुरावा’ मालिकेतील सुयश टिळक (जय) आणि आदिती (सुरुची आडारकर) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘स्ट्रॉबेरी’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग १४ एप्रिल रोजी होत आहे. ‘गुढी पाडव्याची गोडी तोंड गोड करणारी’ अशी कॅचलाइन घेऊन नाटकाची जाहिरात करण्यात आली. सुयश आणि सुरुची या दोघांचेही चेहरे एकमेकांच्या अगदी जवळ असून दोघांच्या ओठांत ‘स्ट्रॉबेरी’ आहे. तसेच ‘लव्ह स्टोरीतल्या लव्हची स्टोरी’ अशीही या नाटकाची जाहिरात करण्यात आली असून त्या जाहिराती ‘फेसबुक’, ‘यु टय़ूब’वर पाहायला मिळत आहेत. बॉलीवूड किंवा हॉलीवूड चित्रपटाची जाहिरात पाहतोय का, असा प्रश्न पडावा अशी ही जाहिरात आहे.

नाटकांचे विषय वेगळे असल्याने त्याची जाहिरात वेगळ्या पद्धतीने करण्यासाठी असा ‘बोल्ड’पणा दाखविण्यात येतो. मराठी प्रेक्षकांसाठी हा ‘धक्का’ असला तरी बदलत्या काळानुसार प्रेक्षकांना नाटकाकडे आकृष्ट करून घेण्यासाठी अशा काही क्लृप्त्या लढविणे आवश्यक असल्याने अशा प्रकारे जाहिरात करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र मराठी नाटकाची जाहिरात ‘बोल्ड’झाली तरी तिने आपली ‘पातळी’ ओलांडून आणखी ‘खाली’ येऊ नये, अशी अपेक्षा सुजाण व सुसंस्कृत प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

 

मला असे वाटते.. 

कलाकारांची नावे ही दाखवावीत

दूरचित्रवाहिन्यांवरील विविध मनोरंजन वाहिन्यांवर अखंडपणे मालिकांचा रतीब घातला जात असतो. एकामागोमाग एक मालिका सुरू असतात. या मालिकांमधून अनेक कलाकार काम करतात. त्यातील प्रमुख कलाकारांची नावे प्रेक्षकांना माहिती असतात. पण अन्य छोटय़ा-मोठय़ा भूमिकांमधून काम करणाऱ्या कलाकारांची नावे प्रेक्षकांना माहिती असतात असे नाही. मालिकेच्या सुरुवातीला शीर्षक गीताच्या वेळेस मालिकेशी संबंधित अन्य व्यक्तींची नावे (गीतकार, गायक, संगीतकार, दिग्दर्शक) दाखवतात त्याप्रमाणे मालिकेतील कलाकार आणि त्यांची भूमिका हेही दाखविले जावे. त्यामुळे त्या त्या कलाकारांनाही त्यांच्या कामाचे श्रेय मिळेल आणि प्रेक्षकांनाही कलाकारांची नावे कळतील.
 – मृणाल जोशी, डोंबिवली (पश्चिम)

 

 ‘काहे दिया परदेस’चा वेगळा विषय

झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ या नव्या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळविले आहे. मुंबईत नोकरीसाठी परराज्यातून आलेला हिंदी भाषिक तरुण, त्याला मुंबईत राहाताना येणाऱ्या अडचणी, येथील माणसांचे आलेले अनुभव आणि शेजारील मराठी कुटुंब अशा वेगळ्या विषयांमुळे मालिकेने पकड घेतली आहे. ‘शिवप्रसाद’ ही भूमिका करणारा अभिनेता सध्या तरुणींचा आवडता झाला आहे. मोहन जोशी, शुभांगी गोखले यांचे काम पाहायला मजा येते. ऋषी सक्सेना (शिवप्रसाद)आणि गौरी (सायली संजीव) ही नवी जोडीही छान आहे. हिंदी आणि मराठी संस्कृतीचे दर्शन या मालिकेतून पुढे घडेल असे वाटते आहे.
-अनघा सहस्रबुद्धे, कांदिवली (पश्चिम)