मानसी जोशी

एकविसाव्या शतकात व्यक्त होण्याचे सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे समाजमाध्यम. फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यासारख्या आघाडीच्या समाजमाध्यमांचा प्रभावी पद्धतीने वापर करत कलाकार एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आपली मते व्यक्त करतात. तसेच चाहत्यांना हे कलाकार सध्या काय करत आहेत या गोष्टींचीही माहिती मिळते. मात्र, हीच समाजमाध्यमे सध्या कलाकारांना नकोशी झाली आहेत. कलाकारांनी केलेले एखादे वक्तव्य, छायाचित्रे, चित्रफिती यामुळे ते बऱ्याचदा ट्रोलिंगचे शिकार होतात. या सततच्या ट्रोलिंगला कं टाळून हिंदी तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांनी समाजमाध्यमांना रामराम ठोकला. तर काही काळासाठी समाजमाध्यमापासून चार हात लांब राहण्याचा निर्णय घेणाऱ्या कलाकारांची संख्याही वाढते आहे.

जून महिन्यात अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या अचानक जाण्याने समाजमाध्यमावर विविध तर्कवितर्काना उधाण आले होते. पुरेशा पुराव्याअभावी नेटिझन्सनी अनेक कलाकारांवर टीका केली. कलाकारांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी चित्रफीत, मीम्स, विनोदाच्या माध्यमातून करण जोहर, रिया चक्रवर्ती यांच्यावर निशाणा साधला. ‘ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर जास्त नकारात्मकता दिसून आल्याने मी काही काळासाठी समाजमाध्यमापासून दूर जात आहे, असा संदेश देत २० जूनला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने चाहत्यांचा निरोप घेतला. तिच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेता साकीब सालेम यानेही आपले ट्विटर अकाऊंट बंद केले. ‘लव्हरात्री’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारा अभिनेता आयुष शर्मा, झहीर इक्बाल आणि स्नेहा उल्लाल यांनीही अनेक महिन्यांपासून ट्विटर वापरले नाही. समाजमाध्यमांमुळे नकारात्मक वाढत असल्याचे सांगत निर्माता शशांक खैतान यांनीही ट्विटरवरून काढता पाय घेतला आहे. नुकतेच गायिका नेहा भसीन हिने काही काळ समाजमाध्यमांचा वापर करणार नसल्याचे स्पष्ट के ले आहे. स्वत:ची मते व्यक्त करणे, लोकांशी जोडून घेणे, यासाठी ट्विटर हे अतिशय चांगले माध्यम आहे. मात्र, आता ट्रोलिंग आणि नकारात्मकता पसरत असल्याने मी काही काळ माझे ट्विटर खाते बंद करत आहे, असे सांगत लेखक आणि दिग्दर्शक मिलाप झवेरी याने समाजमाध्यमांवरून काढता पाय घेतला आहे. तर नुकतेच आपले ट्विटर खाते बंद करत अभिनेता सुबोध भावेही या मांदियाळीत सामील झाला आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलीवूडमध्ये घराणेशाहीवरून सुरू झालेला वादही समाजमाध्यमांवरील वाढत्या नकारात्मकतेला कारणीभूत ठरला आहे. घराणेशाहीच्या मुद्दय़ावरून सोनम कपूर, आलिया भट, महेश भट हे अनेकदा टीके चे धनी करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या समाजमाध्यमांवरील पाठीराख्यांमध्येही मोठय़ा प्रमाणावर घट झाली. या वादाचा परिणाम कलाकारांवर आणि एकू णच त्यांच्या समाजमाध्यमांवर असलेल्या प्रेमावर विविध पद्धतीने घडून आलेला दिसतो. अलिया भट्टची बहीण शाहीन, क्रिती सनन सारख्यांनी या ट्रोलर्सचा कडक शब्दांत समाचार घेतला. ‘तुम्ही समाजमाध्यमांवर काही लिहिले नसले तरी तुम्ही टीकेचे धनी होता. थोडक्यात समाजमाध्यमावरील जीवन वास्तव झाले असून, वास्तवातील जीवन आभासी,’ असे क्रितीने ट्रोलर्सना सुनावले. हिंदी चित्रपटसृष्टीतील घराणेशाहीबद्दल टीकेचे लक्ष्य बनलेल्या प्रसिद्ध निर्माता करण जोहर याने या ट्रोलिंगला कंटाळून आपले फॉलोअर्स कमी केले आहेत. सध्या तो फक्त आठच व्यक्तींना फॉलो करतो. अभिनेत्री कंगना राणावतशी झालेल्या शाब्दिक चकमकीमुळे अभिनेत्री कुब्रा सैतही काही काळ समाजमाध्यमांपासून दूर गेली आहे.

समाजमाध्यमावरील ट्रोलिंगला किती महत्त्व द्यायचे हे त्या कलाकाराने ठरवायचे, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सागर मुंदडा देतात. ‘प्रसिद्ध व्यक्तींना समाजमाध्यमावर ट्रोलिंग करणे कधीही थांबणार नाही. मात्र, या टीके ला आपल्या आयुष्यात किती स्थान द्यायचे हा त्या कलाकाराचा वैयक्तिक प्रश्न आहे. मानसिक स्थैर्य नसल्यास मनात नकारात्मक विचार येतात. त्यात सध्याच्या परिस्थितीमुळे असे विचार मनात येण्याची जास्त शक्यता आहे. दुसरा मुद्दा असा की, काही कलाकारांना स्वत:बद्दल नकारात्मक चर्चा के लेली आवडत नाही. सतत समाजमाध्यमावर होणारी चर्चा आणि टीके मुळे त्यांचे लक्ष विचलित होऊन कामावरही त्याचा परिणाम होतो. यामुळेही कलाकारांनी समाजमाध्यमापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला असावा, असेही मत ते व्यक्त करतात. लोकप्रिय व्यक्तींवर ट्रोलिंग हे होणारच. हे ट्रोलिंग जास्त झाल्यास कायदेशीर मार्गाचा अवलंब ते करू शकतात, असे ‘रिस्पॉन्सिबल नेटिझम’चे उन्मेष जोशी यांनी सांगितले.

हॉलीवूडमध्येही नेटिझन्सनी केलेल्या टीकेमुळे हैराण होऊन गायिका मायली सायरसने २०१८ मध्ये आपली सर्व छायाचित्रे काढून टाकली होती. प्रेयसी एरियाना ग्रेनॅडशी असलेल्या प्रेमप्रकरणामुळे पेटे डेव्हिडसन याने दोन वर्षांपूवी आपले इन्स्टाग्राम अकाऊंट बंद केले होते. ‘स्ट्रेंजर थिंग्स’ या मालिकेतील अभिनेत्री मिली बॉबी समलैंगिक  आहे, अशा आशयाचे मीम्स बनल्याने तिने आपले अकाऊंट बंद केले. तर कायली मायरी, कार्डी बी, ब्लेक लाईव्हली, केनये व्हेस्ट, मेघन मार्केल यांनीही समाजमाध्यमांवरची आपली खाती बंद के ल्याची उदाहरणं आहेत.

ट्रोलिंगचे  पडसाद

या ट्रोलिंगचे नकारात्मक पडसादही दिसून येतात. यामुळे कलाकारांची समाजात असलेली लोकप्रिय प्रतिमा मलीन होते. आगामी चित्रपट प्रदर्शनाच्या वेळेस ट्रोलिंग झाल्यास त्याचा परिणाम व्यवसायावरही होतो. दीपिका पदुकोणच्या ‘छपाक’ चित्रपटाच्या वेळेस तिने दिल्लीला जेएनयूममध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट दिल्याने तिच्यावर समाजमाध्यमांवरून खूप टीका झाली. त्याचा परिणाम चित्रपटाच्या व्यवसायावर झाला होता.

नकारात्मकतेविषयी चळवळ

प्रसिद्ध व्यक्तींने चालू घडामोडींविषयी व्यक्त के लेले मत, आक्षेपार्ह विधान यामुळे त्यांना समाजमाध्यमावर ट्रोल करण्याचा प्रकार नवीन नाही. चित्रफिती, मीम्स कधी नुसतीच शिवराळ भाषा याद्वारे ट्रोलिंग होते. यामुळे एखाद्या सामाजिक-राजकीय विषयांवर आपली मतं व्यक्त करण्यास कलाकार मंडळी कचरतात. समाजमाध्यमावरील सततच्या टीके मुळे कलाकारांची प्रतिमाही मलीन होते. समाजमाध्यमावर स्टॉपहेटफॉरप्रॉफिट या हॅशटॅगखाली अनेक कलाकारांनी समाजमाध्यमातील नकारात्मकतेविषयी आपली मते व्यक्त केली आहेत.

ठोस कायद्याची आवश्यकता

आपल्या देशात परदेशाप्रमाणे ट्रोलिंगविषयी कायदा अस्तित्वात नाही. कलाकाराने पोलिसांकडे याबद्दल तक्रार केल्यास पुढे काही निष्पन्न होत नाही. त्यामुळे ट्रोलिंगविषयी तक्रारही सहसा के ली जात नाही. कलाकार हे लोकप्रिय असल्याने त्यांनी केलेली कृती, एखादे वक्तव्य, छायाचित्रे यामुळे ते बऱ्याचदा ट्रोल होताना दिसून येतात. यासाठी माहिती-तंत्रज्ञान कायद्यामध्ये ट्रोलिंगविषयी तरतूद करणे आवश्यक आहे. २००८ पासून हा निर्णय सरकारकडे प्रतीक्षेत आहे. देशातील चित्रपटसृष्टी मोठय़ा प्रमाणावर मुंबईत आहे. तसेच बहुतांश कलाकार येथेच वास्तव्यास आहेत. त्यामुळे याविषयी राज्य शासनाने ठोस पावले उचलली पाहिजेत, असे मत अ‍ॅड. डॉ. प्रशांत माळी यांनी व्यक्त केले.