ऐतिहासिक कथानकांची मोठ्या रंजकतेने मांडणी करण्यासाठी ओळखला जाणारा चित्रपट दिग्दर्शक आशुतोष गोवारिकर पुन्हा एकदा अशाच एका कथानकासह सज्ज झाला आहे. ‘मोहेंजोदारो’ या चित्रपटाच्या वाट्याला आलेलं अपयश पचवत आशुतोष आता आणखी एका ऐतिहासिक कथानकावर काम करत आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचा टीझर पोस्ट नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. पानिपतच्या तिसऱ्या युद्धावर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाचा टीझर पोस्टर फारच लक्षवेधी ठरत आहे.

‘पानिपत- द ग्रेट बेट्रेयल’, असं या चित्रपटाचं नाव असून, त्याच्या पोस्टवर बरेच बारकावे टीपण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. लाल आणि केशरी रंगाचा अधिकाधिक वापर करण्यात आलेल्या या पोस्टरमधून युद्धभूमीत तलवार घेऊन सज्ज असलेल्या एका योद्ध्याचा हात दिसत आहे. तर युद्धभूमितील लढवैय्यांची झलकही या पोस्टवर पाहायला मिळत आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पानिपतच्या युद्धाचा थरार पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार असं म्हणायल हरकत नाही. तेव्हा आता हा चित्रपट साकारण्यासाठी आशुतोष, नेमकं कोणतं तंत्र अवलंबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा : अठराव्या वर्षीच तिने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ‘हा’ अनोखा विक्रम आपल्या नावावर नोंदवला

आशुतोषने चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर अवघ्या काही क्षणांतच अनेकांनी तो आपल्या अकाऊंटवरुन शेअर केल्याचे पाहायला मिळाले. त्याच्या या चित्रपटातून अभिनेता संजय दत्त, अर्जुन कपूर आणि अभिनेत्री क्रिती सनॉन झळकणार आहेत. तेव्हा आता ही स्टारकास्ट चित्रपटासाठी कितपत फायद्याची ठरते हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे. असा हा चित्रपट ६ डिसेंबर २०१९ ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.