काही असामान्य कथांना चित्रपटांच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात बॉलिवूडकरांना यश येत आहे. गेल्या काही काळापासून प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांमध्ये साचेबद्ध प्रेमकहाण्या किंवा नेहमीचे कौटुंबिक वाद यांवर आधारित कथानक नसून आता त्यापलीकडे जात वैविध्यपूर्ण अशा कथा हाताळण्याचा दिग्दर्शक पसंती देत आहेत. याचंच एक उदाहरण म्हणजे ‘राजी’.

मेघना गुलजार दिग्दर्शित ‘राजी’ या चित्रपचाने सध्या सर्वांचंच लक्ष वेधलं असून देशप्रेमाची एक वेगळी परिभाषा या चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्यात आली आहे. आलिया भट्ट, विकी कौशल, शिशीर शर्मा, सोनी राजदान यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणाऱ्या या चित्रपटातून भारतातून थेट पाकिस्तानात जात एक युवती कशा प्रकारे आपल्या देशासाठी हेरगिरी करते यावरुन पडदा उचलला आहे. चित्रपटाच्या प्रत्येक वळणावर आलियाने साकारलेली ‘सहमत’ बऱ्याच गोष्टी आपल्या मनावर बिंबवून जाते, ज्या प्रेक्षकांना पटतही असल्याचं मत दिग्दर्शिका मेघना गुलजारने मांडलं आहे.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत तिने या चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाबद्दल आपलं मत मांडलं. त्याशिवाय आपण जो संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू इच्छित होतो, तो त्यांच्यापर्यंत पोहोचला असल्याचंही ती म्हणाली, ‘मला सर्वांना एकच संदेश द्यायचा होता की, आपल्या देशावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही दुसऱ्या देशाचा द्वेष केलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही. कारण या गोष्टीच मुळात परस्पर विरोधी आहेत. मी पाकिस्तानचा द्वेष करत नाही याचा अर्थ असाही होत नाही की माझं भारतावर, माझ्या देशावर प्रेम नाही. दुसऱ्या देशाचा द्वेष न करताही मी माझ्या देशावरील प्रेम व्यक्त व्यक्त करुच शकते त्यात वावगं काय?’

वाचा : ‘who added whom first?’- फेसबुकने जुळवलेल्या एका लग्नाची गोष्ट

दोन देशांमध्ये असणारी दरी लक्षात घेत मेघनाने ‘राजी’च्या निमित्ताने एका अतिशय संवेदनशील अशा विषयावर भाष्य करणारा चित्रपट साकारला. ज्याला सध्या प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. मेघना व्यतिरिक्त आलिया आणि विकीनेही या मुद्द्यावर आपली मतं मांडली. ”पाकिस्तानला कमी लेखण्यासाठी ‘राजी’ साकारण्यात आलेला नाही. ‘हिंदुस्तान के आगे कुछ नही’ असं आम्ही मुळीच म्हणत नाही आहोत. ‘वतन के आगे कुछ नही’, असंच आम्ही म्हणज आलो आहोत. वतन म्हणजेच देश हा आमचाही असू शकतो आणि तुमचाही”, असं आलिया म्हणाली. तर, चित्रपटातील आपल्या भूमिकेविषयी सांगत विकी म्हणाला, ‘आतापर्यंच्या चित्रपटांमधून दाखवण्यात आलेल्या पाकिस्तानी अधिकाऱ्यांची प्रतिमाच मी साकारलेल्या पात्राने बदलली आहे. इक्बाल हा एक चांगल्या घरातील मुलगा असून, त्याच्या मनातील भावनांना चित्रपटातून वाट मोकळी करुन देण्यात आलीये.’