– उदय गंगाधर सप्रे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

लावण्यवती मधुबाला हिने वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत ७ सिनेमांत बालकलाकार म्हणून काम केलं हे आपण कालच्या भागात पाहिलं. यापैकी विशेष उल्लेखनीय गोष्ट म्हणजे १९४६ सालच्या ‘पुजारी’ या चित्रपटात वलीसाहेबांनी लिहिलेलं व हंसराज बहलनी यांनी संगीतबद्ध केलेलं ‘भगवान मेरे ग्यानके दीपक को जला दे’ हे गीत मधुबालाने गायलंय!

रणजित स्टुडिओमधे मधुबाला काम करत असताना जो पहिला सिनेमा बालकलाकार म्हणून तिला मिळाला (जो ‘बसंत’ नंतरचा असल्याने तिचा दुसरा सिनेमा!) त्या ‘मुमताज महल’चा दिग्दर्शक होता केदार शर्मा! केदार कलकत्त्याच्या ‘न्यू थिएटर्स’मधे काम करत असताना तिथल्या एका शिल्पकाराशी त्याची ओळख झाली ज्याच्या अनेक मूर्ती तिथल्या गोदामात होत्या. जरुरीप्रमाणे सिनेमासाठी त्या वापरातही येत असत. त्याच्या जीवनाची कथा केदारने एक पटकथा म्हणून ‘बेचारा भगवान’ या नावाने लिहिली. नंतर तो ‘न्यू थिएटर्स’ सोडून मुंबईला रणजित स्टुडिओला आला. १९४६ साली जयराज हा नायक व आपली पत्नी कमला चटर्जी नायिका म्हणून केदारनं ‘बेचारा भगवान’ फ्लोअरवर आणला. एका दिवसाचं शूटिंग झालं आणि त्याच दिवशी कमला चटर्जी हृदयविकाराच्या झटक्याने गेली आणि केदारला भगवानने बेचारा करून टाकला! त्या दु:खातून बाहेर येईस्तोवर एक वर्ष गेलं. या मधल्या काळात अताउल्ला खानने केदार शर्माचे उंबरठे झिजवले आणि त्याला ‘बेचारा भगवान’ची कथा ‘नीलकमल’ या नावाने वापरत सिनेमा काढायला राजी केला. पृथ्वीराज कपूरचा मोठा मुलगा २२ वर्षीय रणबीर राज कपूर याचं राज कपूर असं नामकरण करत त्याला नायक म्हणून व १४ वर्षांची उफाड्याची मधुबाला नायिका म्हणून घेतली. सिनेमासाठी भांडवल मागायला केदार रणजित स्टुडिओचे सर्वेसर्वा चंदूलाल शहांकडे गेला. चंदूलाल हा तसा कदरदान पण छंदीफंदी माणूस ! त्यादिवशी ३ पत्तीत ३५ हजार रुपये हरला होता. तशातच केदारनं नवोदित कलाकारांच्या ‘नीलकमल’साठी ५० हजार रुपयांची आवश्यकता असल्याचं सांगताच चंदूलालनं त्याची खिल्ली उडवली आणि पैसे देण्याचं ‘नव्या घोड्यांवर पैसे लावायला मी मूर्ख नाहि’, असं सागत नाकारलं. केदार आणि कमला रणजितसाठी खूप राबले होते. चंदूलालचं बोलणं केदारच्या जिव्हारी लागलं. कलकत्ता सोडून मुंबईला आल्यावर शिल्लक पैशातून घेऊन ठेवलेली जमीन केदारनं विकली, कमलाचे दागिने गहाण ठेवले आणि त्या पैशातून ‘नीलकमल’ सुरु केला. त्यासाठी संवाद छोटे छोटे लिहायला हवे होते आणि मनोरंजनाचा भाग अधिक हवा होता. पण पत्नीवियोगातून पुरता न सावरलेल्या केदरसारख्या मुरब्बी दिग्दर्शकाचं याकडे दुर्लक्ष झालं.

सहाजिकच नवख्या नायक — नायिकेला हे आव्हान पेलताना पुन्हा पुन्हा टेक्स घ्यावे लागले, चित्रिकरण लांबलं, बजेट वाढलं आणि परिणामत: ‘नीलकमल’ अपेक्षेप्रमाणे चालला नाही. पण मधुबालाच्या लावण्याची दखल मात्र लोकांनी घेतली. हे आरस्पानी सौंदर्य ‘नीलकमल’मध्ये नायिकेच्या रूपात प्रथमच अवतरलं.

मध्यंतरी एकदा केदार शर्मा अताउल्ला खान आणि मधुबालाला घेऊन मिनर्व्हा मूव्हिटोनच्या सोहराब मोदींना भेटला होता. तेव्हा मधुबालाचं सौंदर्य आणि तिच्या लाघवी बोलण्यानं प्रभावीत झालेल्या सोहराबनी ‘दौलत’ नावाचा सिनेमा मधुबालाला नायिका म्हणून घेत ‘नीलकमल’ सोबतच सुरु केला. पण, तो बराच लांबला आणि अखेर १९४९ला प्रदर्शित झाला.

‘नीलकमल’चं शूटिंग चालू असताना कथा, पटकथा, संवाद, निर्माता, गीतकार सबकुछ असलेल्या केदार शर्मानं ‘राधाको न तरसा शाम पछताएगा, नैन छलक आए तो ब्रिज बह जाएगा’ या गाण्याची रेकॉर्ड लावली आणि बी. वासुदेव ऊर्फ स्नेहल भाटकर यांच्या सुरेल संगीताप्रमाणे अभिनय करायला मधुबालाला समजावलं. पण त्या अपरिपक्व वयात तिला ते जमेचना. तेव्हा रागावून ते गाणंच काढून टाकण्याची धमकी त्यानं मधुबालाला दिली. तिचे डोळे भरून आले आणि याचाच फायदा घेत केदारनं गाणं शूट केलं. पण दुर्दैवाने संकलनामधे हे गाणंच काढून टाकण्यात आलं. (हे गाणं लक्षात ठेवावं असंच ठरलं — का आणि कसं ते शेवटच्या लेखामधे कळेल)

ऑगस्ट १९४७ ला प्रदर्शित झालेला ‘नीलकमल’ चालला नाही. पण, मधुबाला नामक सोन्याचं अंड देणारी मुर्गी खानला सापडली. केदार शर्मासारख्या दिग्दर्शकानं २५ हजार रुपये दिलेत, या गोष्टीचं भांडवल करत अताउल्ला खाननं प्रत्येकी ३० हजार रुपये अशा बोलीवर दुय्यम सिनेमांचा दिग्दर्शक मोहन सिन्हा याच्याशी करार केला. मधुबालाच्या सौंदर्यावर आपले चित्रपट चालतील, अशा व्यवहार्य तत्वावर करार करून मोहन सिन्हानं ११ महिन्यांत मुरारी पिक्चर्सतर्फे ‘चितोड विजय’, ‘खूबसूरत दुनिया’, ‘दिल की रानी’ असे चित्रपट १९४७ सालात पूर्ण करत ते प्रदर्शिताही केले. तो आणखी एक चित्रपटही काढू इच्छित होता. पण वर्षभरात त्याच्याकडून १ लाख २० हजार रुपये मिळाल्यावर खानाने मधुबालाचं मानधन ५० हजारांवर नेऊन ठेवलं. कराराप्रमाणे वर्षभरात ४ चित्रपट या मुद्द्यावर बोट ठेवलं आणि मोहन सिन्हाचा नाइलाज झाला. पदार्पणातंच एका वर्षात ५ चित्रपट नायिका म्हणून हा मधुबालाचा विक्रम आजपर्यंत कुणीही मोडू शकलं नाही.

सिनेमा मासिकं, वृत्तपत्र आणि रसिक यांनी मधुबालाला प्रेमदेवता अशी उपाधी बहाल केली, काही मासिकांनी तर तिला ‘व्हीनस’ म्हणजे सौंदर्याची देवता म्हटलं.  बाबूराव पाटील हा एक मराठी माणूस . त्याकाळी सिनेमावर इंग्रजी मासिक काढायचं त्यानं ठरवलं. पण, ‘मराठी माणसाचं इंग्रजी मासिक’, लोकांना अजीर्ण होईल याची कल्पना असल्याने त्यानं बाबूराव पटेल या नावानं ‘फिल्म इंडियान नावाचं इंग्रजी सिने मासिक सुरु केलं आणि ते अल्पावधीतंच उच्चभ्रू लोकांच्या पसंतीस उतरवत जनमानसात लोकप्रिय केलं. आपल्या १९४७ च्या एका अंकात ५ सिनेमच्या नायिकेबाबत ते म्हणाले, ‘तुम्ही तिला स्वर्गातून अवतरलेली सौंदर्यवती म्हटलं तर ती अतिशयोक्ती आहे असं म्हणण्याचं धाडस कुणी करू शकणार नाही!’.

वाचा : दास्तान- ए- मधुबाला भाग-१

या सगळ्याचा परिणाम मधुबालाला वाढती मागणी होण्यात झाला. अत्यंत कोवळ्या वयात ‘बेशुमार पैसा कमावण्याचं साधन’, म्हणून अताउल्ला खान म्हणजे आपले अब्बा आपल्याकडे पाहतायत हे कळण्याएवढं वय आणि वेळही त्या कोवळ्या सुकुमार लावण्यलतिकेकडे म्हणजेच मधुबालाकडे नव्हता.

१९४८ साली परत तिचे ‘पराई आग’, ‘लाल दुपट्टा’ आणि ‘अमर प्रेम’ असे ३ चित्रपट आले. जाणकार असूनही आपल्या ऐषारामी जीवनासाठी निव्वळ पैशांकडे बघून चित्रपट स्वीकारत सुटलेल्या आपल्या लालची बापाच्या हाती मधुबाला नावाचं निष्पाप लावण्याचं वारू सापडलं होतं. येणार्‍या कितीही मोठ्या लाटेला पार करत आपल्या कुटुंबाची जीवननैय्या सावरणार्‍या साहिल ऊर्फ मधुबाला नामक नावाड्याची जीवननैय्या मात्र लालची बापाच्या हाती हेलकावे खात होती. बेशुमार कष्टांसह कुटुंबाविषयीची अपार प्रेमपूर्ण जाणीव घेत मधुबाला वयाच्या १५ व्या वर्षी अकाली प्रौढ होत होती आणि परमेश्वराची अगाध लीला पहा, या सगळ्याचं तिच्या कोवळ्या सकुमार अप्रतिम सालस चेहेर्‍यावर जराही प्रतिबिंब पडलं नव्हतं.

सुप्रसिद्ध गीतकार जगदीश खेबूडकर याच्या ‘तरूणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं गं सोळावं वरीस धोक्याचं, या लावणीतील ध्रूवपदातील शेवटची ओळ खोटी ठरवत ‘सोळावं वरीस मोक्याचं गं सोळावं वरीस मोक्याचं’ आयुष्यातलं अत्यंत नाजूक स्थान १६ वं वर्ष अर्थात सन १९४९ मधुबालानं कसं गाजवलं हे आपण बघूया उद्याच्या भागात….

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bollywood old movies veteran actress madhubala 85th birth anniversary today story news in marathi part
First published on: 15-02-2018 at 10:14 IST