अभिनेता शेखर सुमनने त्याच्या आयुष्यातल्या घटनेबाबत वक्तव्य केलं आहे. जे चांगलंच चर्चेत आहे. शेखर सुमन सध्या हिरामंडी या वेबसीरिजच्या प्रमोशनमध्ये आहे. या दरम्यान त्याने त्याच्या मुलाबाबत घडलेली घटना सांगितली आहे. त्याच्या ११ वर्षांच्या मुलाचं निधन झालं आहे. मुलगा आयुषच्या निधनाबाबत सांगताना शेखर सुमन भावूक झाला त्याच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

काय म्हटलं आहे शेखर सुमनने?

शेखर सुमन आणि त्याची पत्नी अल्काने त्यांचा मुला आयुषला गमावलं. आयुष सुमनला एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस या आजाराने त्रस्त होता. हा आजार हृदयासंबंधी आहे. जो नवजात लहान मुलांमध्ये आणि बालकांमध्ये आढळतो. शेखर सुमन म्हणाला, “एंडोमायोकार्डियल फाइब्रोसिस हा दुर्मिळ आजार आहे. हा आजार असंख्य लोकांमध्ये एकाला होतो. भारतात तीन ते चार मुलं या आजाराचा सामना करत असतील. या आजारावर कुठलाही उपचार नाही. एकच उपाय आहे तो म्हणजे हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. जेव्हा हा आजार आयुषला झाला हे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं तेव्हा तो फक्त ८ महिने जगेल असं डॉक्टरांनी सांगितलं होतं.”

हे पण वाचा- ४० वर्षांपूर्वी शेखर सुमन यांनी रेखाबरोबर केले होते इंटिमेट सीन; आठवण सांगत म्हणाले, “मला त्या दृश्यांचे शूटिंग करताना…”

आयुषचे प्राण वाचावेत म्हणून प्रयत्न केले

“आयुषचे आजोबा पानी भूषण प्रसाद हे स्वतः एक हायप्रोफाईल डॉक्टर होते. ते देखील आयुषचे प्राण वाचवू शकले नाहीत. जी घटना घडली त्यामुळे आमच्यावरही दुःखाचा डोंगर कोसळला होता. जगभरातील डॉक्टरांचा सल्ला आम्ही घेतला. पण काहीही उपयोग झाला नाही. आयुषवर सगळ्या प्रकारे उपचार केले, अध्यात्माकडे वळलो. त्याचा जीव वाचावा म्हणून प्रार्थना करत होतो. पण नशिबात जे लिहिलेलं असतं ते होणारच होतं, ते तसं घडलं.” असं शेखर सुमनने म्हटलं आहे.

अखेर तो दिवस आलाच

शेखर सुमन पुढे म्हणाला, “अखेर तो दिवस आला. आम्ही आयुषला रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं की त्याची प्राणज्योत मालवली आहे. मी रात्रभर त्याच्या मृतदेहाजवळ पडून होतो. तो संपूर्ण दिवस, त्यानंतरचे कित्येक दिवस रडत होतो. अखेर आम्ही स्वतःला सावरलं. आपल्या डोळ्यांसमोर मुलाला शेवटचा निरोप देणं किती कठीण असतं. मुलाच्या पार्थिवाला अग्नी देण्यापेक्षा मोठं दुःख कुठलं?” हे म्हणताना शेखर सुमन यांचा कंठ दाटून आला आणि त्यांना अश्रू अनावर झाले होते. शेखर सुमनने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत ही बाब सांगितली.